२०२४ मध्ये भाजपची मतांची टक्केवारी फक्त अर्ध्या टक्क्याने घसरूनही जागा मात्र ६३ नी कमी झाल्या आहेत. १९७७, १९८०, १९८९, २०१४ मध्ये काँग्रेसला मतदारांनी नाकारले, तसे झालेले नाही. महाराष्ट्रात कोणत्या विधानसभा मतदारसंघांनी साथ दिली नाही, याचा अभ्यास भाजप करत आहे…

यावेळची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. महाराष्ट्रातल्या काही मंडळींनी या निकालाच्या आधारे भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदारांनी नाकारले असल्याचा डंका पिटणे सुरू केले आहे. केशवसुत म्हणतात, ‘‘जग केवढं, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढं’’, त्याप्रमाणे या मंडळींच्या गर्जनांकडे लक्ष देण्याचे कारण नाही. नऊ जागा जिंकलेल्या मंडळींनी ९०० जागा मिळाल्यासारखा जल्लोष चालू केला आहे. या निकालाचा अनेक बाजूंनी आणि मुख्यत: आकडेवारीच्या आधारे अभ्यास केल्यावर मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट जनादेश दिला आहे, असे म्हणावे लागते. अनेक विरोधी पक्षांची एकत्रित आघाडी, संविधान बदलाची हाकाटी, धार्मिक आधारावर निघालेले फतवे या पार्श्वभूमीवरही भारतीय जनता पार्टीने २४० जागा जिंकल्या आहेत. आता या निकालांचा पूर्वीच्या निवडणुकीच्या निकालांच्या आधारे विचार केल्यावर कोण जिंकले आणि कोण हरले हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होईल.

२०१४ च्या निवडणुकीत त्यावेळच्या सत्ताधारी काँग्रेसला अवघ्या ४२ जागा मिळाल्या. २००९ मध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी होती २८.५५, तर भाजपची टक्केवारी होती १८.८०. मात्र २०१४ मध्ये काँग्रेसच्या वाट्याला १९.३१ टक्के मते मिळाली तर भाजपची टक्केवारी ३१ टक्क्यांवर पोहोचली. काँग्रेसची टक्केवारी २०१४ मध्ये ९ टक्क्यांनी घसरली. २००९ च्या निवडणुकीत २०६ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला १५० हून अधिक जागा गमवाव्या लागल्या. मतदारांनी काँग्रेसला सरळ-सरळ नाकारले, हे जागा आणि मतांची टक्केवारी या दोन्हीतून सिद्ध झाले. २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीची मते ३१ टक्क्यांवरून थेट सहा टक्क्यांनी वाढून ३७.७ टक्के एवढी झाली. काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत मात्र अवघी पाव टक्क्याची वाढ झाली. २०१४ मध्ये १९.३१ टक्के मते मिळवणाऱ्या काँग्रेसची २०१९ मधील टक्केवारी १९.६७ एवढीच वाढली. यावेळच्या निवडणुकीत भाजपची मते अर्ध्या टक्क्याने घटली (३६.५६ टक्के). मात्र भाजपच्या जागा ६३ ने कमी होऊन ३०३ वरून २४० वर आल्या. काँग्रेसची टक्केवारी पावणेदोन टक्क्यांनी वाढूनही जागा ४६ ने वाढून ९८ पर्यंत गेल्या. मतदानाचे हे आकडेवारीतील गणित चक्रावून टाकणारे असते. सर्व विरोधी पक्ष एकत्रित येऊनसुद्धा २०१९ च्या तुलनेत भारतीय जनता पार्टीची मते अर्ध्या टक्क्यानेच कमी झाली आहेत. तरीही नऊ जागा मिळवणारी मंडळी भाजपला मतदारांनी नाकारले आहे, असे घसा खरवडून सांगत आहेत. मतदारांनी नाकारणे म्हणजे काय, हे १९७७, १९८०, १९८९, २०१४ च्या निवडणुकीत दिसले आहे. १९८४ मध्ये काँग्रेसने ४१५ जागा जिंकल्या होत्या. १९८९ मध्ये काँग्रेसच्या जागा तब्बल २२० नी कमी झाल्या आणि त्या १९५ वर आल्या. २०२४ मध्ये भाजपची मतांची टक्केवारी फक्त अर्ध्या टक्क्याने घसरूनही जागा मात्र ६३ नी कमी झाल्या आहेत. एकूण मते आणि मिळालेल्या जागा याच्या आधारेच निवडणुकीतील यशाचे मूल्यमापन करावे लागते. १९७७ मध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी या दोघांनाही पराभूत केले. १९७१ मध्ये गरिबी हटाओचा नारा देत इंदिरा गांधींनी ३०० जागा मिळवून दणदणीत यश मिळवले होते. १९७७ मध्ये काँग्रेसच्या जागा २०० नी कमी झाल्या. याला म्हणतात मतदारांनी नाकारणे किंवा पराभूत करणे.

हेही वाचा >>> चिप-चरित्र: धाडसी निर्णयाची फलश्रुती

२०२४ च्या निवडणुकीत खोट्या बातम्या पसरवून मतदारांना संभ्रमित करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले गेले होते. गेल्या १० वर्षांत केलेली विकासाची अनेक कामे जनतेसमोर मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी निवडणुकीला सामोरे जात होते. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या हमीसमोर आपला टिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्याने पुन्हा भाजप सत्तेवर आल्यास संविधान बदलले जाणार, असा प्रचार काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी सुरू केला. अशा प्रचारामुळे जनता प्रक्षुब्ध होऊन समाजात दुही, असंतोष माजावा याच हेतूने या अपप्रचाराला गती दिली गेली. त्याच्या बरोबरीने धार्मिक आधारावर काही समाजघटकांना भरघोस आश्वासने दिली गेली. धार्मिक आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या मनात भयगंड निर्माण केला गेला. त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीविरोधात अनेक ठिकाणी एकगठ्ठा मतदान होण्यात झाला. ‘सीएए कायद्यामुळे मुस्लीम धर्मीयांना देशाबाहेर काढले जाणार,’ असा प्रचार करून मुस्लिमांच्या मनात भाजप आणि मोदी सरकारबद्दल भीती निर्माण केली गेली. धार्मिक आधारावर किती जोमाने ध्रुवीकरण झाले, हे मुस्लीमबहुल असलेल्या दोन विधानसभा मतदारसंघांतील मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसते. धुळे मतदारसंघातील मालेगाव (मध्य) या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना १ लाख ९८ हजार ८६९ मते मिळाली, तर भाजप उमेवार डॉ. सुभाष भामरे यांना अवघी ४ हजार ५४२ मते मिळाली. केवळ या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला १ लाख ९४ हजारांचे प्रचंड मताधिक्य मिळाले. धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव बाह्य, सटाणा-बागलाण या पाच विधानसभा मतदारसंघांत १ लाख ८८ हजारांहूनही अधिक मताधिक्य मिळवणाऱ्या भाजपच्या डॉ. भामरे यांना केवळ एका मतदारसंघातील पिछाडीमुळे अवघ्या ३ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्रात आठ मतदारसंघांत ३० हजारांपेक्षा कमी मतांनी भाजप उमेदवार पराभूत झाले.

राज्यात महायुतीला मतदारांनी नाकारले असे रंगविले जाणारे चित्र चुकीचे असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये फक्त दोन लाखांचे अंतर आहे. महायुतीला ४३.६० टक्के, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख, तर महायुतीला २ कोटी ४८ लाख मते मिळाली आहेत. अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी मतांचा फरक असूनही महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. २०१९ च्या निकालाच्या तुलनेत भाजपची मते दीड टक्क्याने कमी झाली. मात्र काँग्रेसची मते एक टक्क्याने वाढूनही काँग्रेसच्या १२ जागा वाढल्या. मुंबईत दोन लाख मते वाढूनही आम्ही जागा गमावल्या. आठ जागा चार टक्क्यांपेक्षा कमी मतांनी गमावल्या. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली. ही आकडेवारी पाहिल्यावर भाजप आणि महायुतीला मतदारांनी नाकारले हा प्रचार चुकीचा आहे. कोणत्याही परिस्थितीत या वेळी भाजपला पराभूत करायचेच, त्यासाठी कोणत्याही थराला जायचेच, अशा मन:स्थितीत विरोधक होते. समाजमाध्यमांच्या मदतीने मतदार विचलित होतील, मतदाराच्या मनात भीती निर्माण होईल, अशा पद्धतीच्या अफवा पसरविल्या गेल्या.

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षासाठी अक्षरश: जिवाचे रान केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत ११५ प्रचार सभा घेतल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन मतदारांपुढे पक्षाची भूमिका मांडत फडणवीस यांनी पक्षाचे समर्थपणे नेतृत्व केले. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीत संघटना स्तरावर १४७ बैठका त्याखेरीज नमो संवाद, सुपर वॉरियर्स मेळावे यांसारख्या १०० हून अधिक बैठकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबरीने बावनकुळे यांनी ६९ जाहीर सभा घेतल्या. महाराष्ट्रात आणि काही राज्यांमध्ये आमच्या काही जागा कमी झाल्या असल्या तरी अनेक राज्यांमध्ये आम्ही १०० टक्के यश मिळवले आहे. ज्या राज्यात आमची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही तेथे धोरणात्मक, संघटनात्मक पातळीवर काही चुका होत्या का, याचा आमचे नेतृत्व विचार करेल. काही चुका या दोन्ही पातळीवर झाल्या असतील तर त्या दुरुस्तही केल्या जातील. प्रत्येक निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आणि संघटना काही ना काही शिकत गेली आहे. त्यामुळेच १९८४ च्या दोन जागांपासून आमचा प्रवास २०१९ मध्ये म्हणजे ३५ वर्षांत ३०० च्या पलीकडे जाऊन पोहोचला होता. सलग तीन निवडणुकीत बहुमत मिळवणे ही मोठीच कामगिरी आहे. काही धक्के जरूर बसले आहेत. त्याचाही सर्वांगीण विचार होईल. अशा छोट्या-मोठ्या धक्क्यांनी आमचे नेतृत्व आणि संघटना विचलित होत नसते. म्हणूनच अटलजींच्या शब्दात सांगायचे तर

‘बाधाये आती है आएँ अपमानों में, सम्मानों में,

उन्नत मस्तक, उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा।

कदम मिलाकर चलना होगा।’ सत्ता हे अंतिम उद्दिष्ट नसल्याने आम्ही आजवर प्रत्येक निवडणुकीतून मिळालेले धडे लक्षात ठेवत निर्धाराने वाटचाल करत आहोत. यापुढील काळातही पूर्वीच्याच निर्धारशक्तीने आम्ही पुढचे पाऊल टाकू.

मुख्य प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश भाजप