‘काँग्रेसच्या कलमांचे ‘कलम’’ हा अग्रलेख (६ मे) वाचला. एकेकाळी ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा देणारा भाजप आता ‘प्रादेशिक पक्षमुक्त भारत’ या दिशेने वाटचाल करू लागल्याचे दिसते. भाजपच्या कार्यपद्धती अशी की सुरुवातीला प्रभावी प्रादेशिक पक्षाशी युती करायची, त्याच्या आधारावर सत्तेत प्रवेश करायचा, त्याची नस ओळखून घ्यायची आणि नंतर त्याच मित्रपक्षाच्या जागेवर स्वत:ची संघटना उभी करायची. ही रणनीती अनेक राज्यांत दिसून आली आहे. महाराष्ट्र, बिहार, पंजाब ते उत्तर प्रदेशपर्यंतची उदाहरणे आहेत.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाविरोधात भाजप ज्या आत्मविश्वासाने आणि आक्रमकतेने राजकारण करत आहे, ते पाहता त्यांचे उद्दिष्ट केवळ निवडणूक जिंकणे नाही, तर दीर्घकालीन राजकीय वर्चस्व निर्माण करणे आहे, हे स्पष्ट होते. हीच विस्तारवादी रणनीती आता दक्षिण भारतातही अधिक दिसू लागली आहे. कर्नाटकात काँग्रेसने सत्ता मिळवली असली, तरी भाजपने आपली पकड तिथे सैल होऊ दिलेली नाही. तमिळनाडूत अभिनेता थलपती विजय यांच्यासारखे नवे चेहरे आशेचा किरण दाखवत असले, तरी भाजप ज्या पद्धतशीरपणे आपले राजकीय पाय रोवत आहे, ते पाहता भविष्यात तिसर्या पर्यायासाठी जागा निर्माण करणे अधिक कठीण होऊ शकते. काँग्रेसमधील काही गटही प्रादेशिक पक्षांविषयी फारसे सहानुभूतिशील नाहीत. त्यामुळे भविष्यात राजकारण पुन्हा ‘काँग्रेस विरुद्ध भाजप’ या द्विध्रुवीय चौकटीत जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
मात्र या सगळ्याच्या पलीकडे सर्वांत महत्त्वाचा प्रश्न लोकशाहीचा आहे. प्रादेशिक पक्ष हे स्थानिक भावना, प्रश्न आणि अस्मितांचे प्रतिनिधित्व करतात. ते दिल्लीला सतत आठवण करून देतात की देशाचा कारभार फक्त राजधानीतून चालत नाही, तो तळागाळापर्यंत रुजावा लागतो. देशाचे राजकारण दोन राष्ट्रीय पक्षांपुरते मर्यादित राहिले, तर स्थानिक प्रश्न राष्ट्रीय राजकारणाच्या गोंगाटात हरवून जाणार नाहीत का? आणि शेवटी मतदार फक्त दोनच पर्यायांमध्ये अडकून पडणार नाहीत का? या प्रश्नांची उत्तरे काळ देईल. एवढे मात्र निश्चित की ही केवळ पक्षीय राजकारणाची लढाई नाही; तर भारतीय लोकशाहीच्या बहुलवादी आत्म्याची परीक्षा आहे. आता निर्णय मतदारांनाच घ्यायचा आहे.
तुषार रहाटगावकर, डोंबिवली
भाजपचे सत्तेसाठी वाट्टेल ते
‘काँग्रेसच्या कलमांचे कलम’ हा अग्रलेख वाचला. भाजप कुठले ‘तंत्र, मंत्र’ अवलंबून यश मिळवत आहे याबद्दल चर्चा होणे गरजेचे आहे. २०१४नंतरच्या भाजपचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करणारा अशी या पक्षाची ओळख झाली आहे. काँग्रेसच्या काळात यंत्रणा, निवडणूक आयोग यांचा दुरुपयोग होत होता याबाबत दुमत नाही पण आता या दुरुपयोगाने कळसच गाठला आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागताना दिसत आहे. न्यायव्यवस्थेवरदेखील प्रश्न निर्माण होत आहे. यंत्रणांना हाताशी धरून त्यांचा गैरवापर होत असेल तर ते जनतेला कसे रुचेल. भाजप मित्र पक्षांनाही सोडत नाही हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. काँग्रेसच्या कारभारला कंटाळून मोठ्या अपेक्षेने मतदारांनी भाजपला सत्तेवर बसवले, अनेक राज्यांत सत्ता दिली, मात्र पूर्णपणे अपेक्षाभंग झाला आहे.
अनंत बोरसे, शहापूर (ठाणे)
भाजपचे नियोजन निवडणुकांपुरते राखीव?
‘हे विरोधकांच्या सुरात सूर मिसळणे’ हे पत्र (लोकमानस- ६ मे) वाचले. सामान्य जनतेला, निवडणूक आयोग भाजपला मदत करत आहे किंवा नाही या दोन्हीचेही निश्चित पुरावे दिसणे दुरापास्त असते. त्यामुळे कोणत्याही एका बाजूचे समर्थन करणे अवघड आहे, मात्र भाजपने फक्त एक गोष्ट करावी. शब्दांचा कोणताही खेळ न करता- मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून मुख्य न्यायाधीशांना वगळून सरकारच्या मंत्र्याची वर्णी तेथे का लावली?- या प्रश्नाचे खरे उत्तर द्यावे. जोपर्यंत हा प्रश्न अनुत्तरित आहे तोपर्यंत निवडणूक आयोग-भाजप यांच्या साटेलोट्याविषयी शंका राहणारच.
दुसरा मुद्दा – भाजपच्या विजयानंतर बरेच विश्लेषक भाजप कसा सूक्ष्मातिसूक्ष्म आणि सर्वंकष नियोजन करतो याचे गोडवे गात आहे. भाजपचे हे गुण निवडणुकांसाठी राखीव आहेत का? देशापुढील जटिल समस्या सोडवण्यासाठी हे गुण वापरावेत असे सत्ताधार्यांना वाटत नाही का? ही हुशारी शेतकरी आत्महत्या रोखणे, झाडे न तोडता विकास करणे, दोन-चार महिन्यात खराब न होणारे रस्ते बांधणे यापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत राखणे इ. गोष्टींसाठी वापरता येणार नाही का? वरील प्रश्नाचे उत्तर म्हणून विकासाचे आकडे फेकणार्यांनी एवढेच लक्षात घ्यावे की २०१४ पर्यंत आपण कच्च्या रस्त्यांवर बैलगाडीने फिरत नव्हतो.
के. आर. देव, सातारा</strong>
न्यायालयाचे व्याप वाढवणे अयोग्यच
‘जनहित याचिकांच्या गैरवापरावर न्यायालयाचे ताशेरे’ (लोकसत्ता – ६ मे) हे वृत्त वाचले. जनहित याचिकांचा दिवसेंदिवस होणारा गैरवापर हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. भारतीय न्यायव्यवस्थेमधील एक महत्त्वाचे कायदेविषयक शस्त्र म्हणून जनहित याचिकांकडे पाहिले जाते. मात्र अलीकडच्या काळात या शस्त्राचा उपयोग प्रकाशझोतात राहण्यासाठी होत असल्याचे दिसते. समाजातील उपेक्षित, दुर्बल घटकांच्या कायदेशीर व घटनात्मक हक्कांचे रक्षण करून त्यांना सामाजिक व आर्थिक न्याय मिळवून देणे हा जनहित याचिकांचा उद्देश असला पाहिजे. मात्र त्याऐवजी वैयक्तिक स्वार्थ वा राजकीय हेतू साध्य करून घेण्याच्या उद्देशाने केलेल्या जनहित याचिकांमुळे न्यायालयांचा मौल्यवान वेळ वाया जातो आणि न्यायालयांमध्ये खटले प्रलंबित राहून कायदेविषयक गुंतागुंतीचे अनेक प्रश्न निर्माण होतात. सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे कामगारांचे शोषण, कामगार कायद्यांचे उल्लंघन, वेठबिगार, दुर्लक्षित मुले, पर्यावरणासंदर्भातील प्रश्न, अंमली पदार्थांचा व्यापार, महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, गुन्हा नोंदविण्यास पोलिसांनी दिलेला नकार, पोलिसांच्या ताब्यात असताना झालेले मृत्यू, तुरुंगात होणार्या छळाच्या तक्रारी, प्रदूषण, अन्नभेसळ आणि जंगल व वन्य प्राण्यांचे संरक्षण यांसारख्या सार्वजनिक हिताच्या विषयांवरील याचिका जनहित याचिका म्हणून सर्वोच्च तसेच उच्च न्यायालय विचारात घेते. वैयक्तिक स्वार्थाला तिथे स्थान असता कामा नये.
राजेश नंदनवरे, छत्रपती संभाजीनगर
मंदिरांच्या जमिनी वहिवाटदारांनाच द्याव्यात!
‘देवस्थान जमिनी वहिवाटदारांच्या मालकीच्या’ ही बातमी (लोकसत्ता- २५ एप्रिल) आणि शासनाच्या प्रस्ताविक कायद्याला विरोध करणारी बातमी (लोकसत्ता- ६ मे) वाचली. शासनाच्या या क्रांतिकारक प्रस्तावित कायद्याला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला नसता, तरच आश्चर्य वाटले असते. यात देवस्थानाच्या जमीन वहिवाटदारांना देताना पुजार्यांनाही काही प्रमाणात सरकारने ‘अधिमूल्य’ देण्याची तरतूद आहे.
देवस्थानच्या जमिनी बहुजन समाजाने घाम गाळून सुपीक केल्या आहेत. त्यांच्याकडून कुठलेही ‘अधिमूल्य’ न घेता या देवस्थानच्या जमिनी वहिवाटदारांना मिळाल्या पाहिजेत. यात पुजार्यांना वाटेकरी करण्याचे काही कारण नाही. आधी मशिदी व चर्चच्या जमिनी ताब्यात घ्या, असा कांगावा करत सनातनी हिंदुत्ववादी संघटना या क्रांतिकारक कायद्याला विरोध करणार हे गृहीतच आहे. पण त्यांचा हा कावा मोडीत काढून, ‘कसेल त्याची जमीन’ या न्यायाने, देवस्थानाच्या जमिनी वहिवाटदारांच्या नावे कराव्यात.
वाई (सातारा) येथील कोटेश्वर मंदिर हे भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचे मंदिर आहे. सरकारने जो प्रस्ताव मांडला आहे, तो विनोबांच्या विचाराशी सुसंगतच आहे. कोटेश्वर मंदिरासमोरील चौकाला विनोबांचे नाव दिले होते, ती पाटी उखडून तिथे बेकायदा गणपती मंदिर बांधण्यात आले. हीच मंडळी शासनाच्या या क्रांतिकारक कायद्याला विरोध करत आहेत. वाई येथील कोटेश्वर मंदिर विनोबांच्या आजोबांनी उभारले व त्या काळात ते तेथे मुस्लीम गवयाचे गाणे ठेवत. विनोबांच्या वडिलांनी महात्मा गांधींशी पत्रव्यवहार करून १९२९ साली मंदिर अस्पृश्यांना खुले केले. अस्पृश्यांना खुले झालेले वाईतील हे पहिले मंदिर आहे. १९१६ साली याच मंदिरात राहून विनोबांनी गांधीजींच्या ‘सत्याग्रहाश्रमा’चा प्रचार केला. कोटेश्वर मंदिराचे विनोबा हे संस्थापक ट्रस्टी आहेत.
न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने मंदिराच्या ट्रस्टमध्ये मुस्लीम सत्यशोधक समाजाचे हुसेन जमादार यांना ट्रस्टवर घेण्यात आले होते. कोटेश्वर मंदिर हे सामाजिक सुधारणेची गंगोत्री आहे. देवस्थानाच्या जमिनी वाहिवाटदारांच्या नावे होणेच न्याय आहे. विजय दिवाण, विश्वस्त, कोटेश्वर मंदिर (वाई)
