हरीश एस. वानखेडे
दक्षिण भारतातील राज्य असलेल्या तमिळनाडूमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रबळ राजकीय परंपरा दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. येथे चित्रपटांकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जात नाही, तर मतदारांच्या राजकीय निवडींना आणि त्यांच्या जाणिवांना आकार देणारे एक प्रभावी माध्यम म्हणून त्याचा वापर केला जातो. एम. जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता यांच्यासारख्या युगप्रवर्तक नेत्यांच्या कारकीर्दीपासून ते रजनीकांत, कमल हासन, खुशबू आणि विजयकांत यांच्यासारख्या कलाकारांच्या संमिश्र राजकीय प्रयोगांपर्यंत, तमिळनाडूने रुपेरी पडद्यावरील अभिनेत्यांना लोकप्रिय राजकीय नेत्यांच्या भूमिकेत वारंवार पाहिले आहे.

याच परंपरेचा आधुनिक विस्तार म्हणून तमिळ चित्रपटसृष्टीतील महानायक सी. जोसेफ विजय- ज्याला त्याचे चाहते आदराने ‘थलपती’ (सेनापती) म्हणतात- तो विधिमंडळाच्या पायर्‍या चढणारा नवा चेहरा ठरला. विधानसभा निवडणुकीतील त्यांचा नेत्रदीपक विजय हे सिद्ध करतो की, पडद्यावरील लोकप्रियतेला प्रामाणिक राजकीय महत्त्वाकांक्षेची जोड मिळते, तेव्हा लोकशाही व्यवस्थेत आमूलाग्र राजकीय बदल घडू शकतात.

याच्या अगदी उलट परिस्थिती बॉलीवूडमध्ये दिसते. हिंदी चित्रपटसृष्टीनेही अनेक दिग्गज अभिनेते आणि पडद्यावर लोकप्रिय ठरलेली नायकपात्रे निर्माण केली, परंतु हे नायक मुख्य प्रवाहातील राजकीय प्रक्रियेत केवळ परिघावर राहिले. हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक अभिनेत्याला आपला तारणहार मानण्याऐवजी, बहुतांश वेळा चित्रपटांच्या वैचारिक वर्चस्वाला बळी पडतात आणि त्यातून प्रस्थापित सत्ताधारी वर्गाच्या सांस्कृतिक आणि वर्गीय हितसंबंधांचे रक्षण होते.

‘जेन झी’ स्थित्यंतर

राजकीय विश्लेषकांच्या मते, अभिनेता विजयचा हा झंझावाती उदय ही केवळ एक राजकीय घटना नसून ते ‘जेन झी’ स्थित्यंतर आहे. तमिळनाडूतील तरुण मतदारांचा मोठा वर्ग राज्यातील प्रस्थापित द्रविडीय पक्षांना कंटाळला आहे. हे पक्ष संकुचित प्रादेशिक गतिशीलता आणि सामाजिक न्यायाच्या जुन्याच घोषणांमध्ये अडकले आहेत, अशी या तरुणांची धारणा झाली आहे. या पोकळीमध्ये, विजयची लोकप्रियता आणि त्याचा धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक दृष्टिकोन यांनी बदलासाठी उत्सुक असलेल्या तरुण पिढीला आकर्षित केले.

तमिळनाडूची ही चित्रपट-राजकारण संस्कृती जागतिक स्तरावर अद्वितीय आहे. जगातील इतर कोणत्याही चित्रपटसृष्टीने चित्रपट आणि राजकारण यांच्यात इतका दृढ आणि लोकशाहीला ढवळून काढणारा बंध निर्माण केलेला नाही. अनेक दशकांपासून तेथील स्थानिक चित्रपटगृहे ही केवळ मनोरंजनाची ठिकाणे नसून ती एक प्रकारची ‘राजकीय वर्गखोली’ बनली आहेत. या वर्गखोल्यांनी तमिळ अस्मिता आणि जातिअंताचा संदेश अत्यंत प्रभावी आणि भावुक कथानकांच्या माध्यमातून जनमानसात रुजवला.

तमिळ चित्रपटांमधील अवास्तव मारामारी, पुरुष-प्रधानिता आणि अति-नाट्यमयता यांच्यापलीकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे त्यांतील सामाजिक वास्तववाद. एमजीआर, रजनीकांत आणि विजय यांसारख्या नायकांनी पडद्यावर स्वत:ची अशी प्रतिमा निर्माण केली, जी भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध आणि खलनायकी सत्ताधार्‍यांविरुद्ध गरिबांच्या व शोषितांच्या हक्कासाठी लढणारा एक प्रामाणिक आणि धाडसी तारणहार दाखवते. परिणामी, जेव्हा हे अभिनेते प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश करतात, तेव्हा जनता त्यांच्याकडे केवळ नट म्हणून पाहत नाही; तर ते आपल्या पडद्यावरील न्याय्य पात्राचेच प्रत्यक्ष रूप आहेत, असा दृढ विश्वास मतदारांमध्ये निर्माण होतो.

बॉलीवूडचे विश्लेषणात्मक अपयश

याउलट, हिंदी चित्रपटसृष्टी जनतेचे नेतृत्व करू शकणारे असे राजकीयदृष्ट्या प्रभावी महानायक निर्माण करण्यात अपयशी ठरली आहे. अमिताभ बच्चन, सुनील दत्त, धर्मेंद्र, हेमा मालिनी आणि अलीकडच्या काळात कंगना रणौत यांसारख्या कलाकारांनी संसदेत प्रवेश केला असला, तरी त्यांच्याकडे स्वतंत्र लोकचळवळ उभी करण्यासाठी लागणारा जमिनीवरचा जनाधार नव्हता. हिंदी चित्रपटांमधील नायकांनीही तमिळ नायकांप्रमाणेच व्यवस्थाविरोधी लढाऊ भूमिका साकारल्या आहेत. उदाहरणादाखल, ‘इन्कलाब’मधील अमिताभ बच्चन यांचा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा संताप, ‘घायल’मध्ये सनी देओलने भांडवलशाही शोषणाविरुद्ध पुकारलेले बंड वा ‘गब्बर’ चित्रपटात अक्षय कुमारने भ्रष्ट संस्थांमध्ये केलेली सुधारणा आठवते. परंतु बॉलीवूडच्या प्रेक्षकांनी काल्पनिक आणि वास्तव यांमधील अंतर काटेकोरपणे पाळले आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाला त्याच्या बंगल्याबाहेर लाखो चाहत्यांची गर्दी होत असली, तरी ही गर्दी केवळ सेलिब्रिटीच्या कौतुकासाठी असते. हे फॅन क्लब्स सामाजिक किंवा राजकीय चळवळींसाठी संघटित झालेले वैचारिक कार्यकर्ते नसतात. बॉलीवूडने चित्रपटाला एक व्यावसायिक उत्पादन म्हणून पाहिले, ज्यामुळे वंचित समूहांमध्ये दीर्घकालीन सामाजिक जाणीव निर्माण करण्यात ही चित्रपटसृष्टी असमर्थ ठरली.

वैचारिक आणि रचनात्मक फरक

चित्रपट हे निश्चितच व्यावसायिक नफ्यासाठी तयार केले जातात; परंतु प्रेक्षकांशी भावनिक बंध निर्माण करण्यामागील सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन काय आहे, हीच गोष्ट या दोन्ही चित्रपटसृष्टींना भिन्न ठरवते. बॉलीवूडने अगदी अलीकडच्या काळापर्यंत सामाजिक आणि राजकीय जबाबदार्‍यांपेक्षा मनोरंजन आणि व्यावसायिक गणितांना प्राधान्य देण्यात कोणताही संकोच बाळगला नाही. दुसरीकडे, तमिळ चित्रपटसृष्टीने जरी मनोरंजनाच्या याच गणितांना स्वीकारले असले, तरी ती आपल्या सामाजिक आणि राजकीय संदेशांच्या माध्यमातून प्रेक्षकांना तितकीच आकर्षित करते, ज्यामध्ये अनेकदा सामाजिक न्याय, घटनात्मक नैतिकता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा हिरिरीने पुरस्कार केला जातो.

या फरकाचा प्रेक्षकांच्या आकलनावरही खोल परिणाम होतो; तमिळ प्रेक्षक पडद्यावरील तारणहाराला त्यांच्या वास्तविक राजकीय हेतूचाच थेट विस्तार मानतात, तर हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक कलाकारांचे कौतुक त्यांच्या अभिनय कौशल्यांपुरते मर्यादित ठेवतात आणि त्यांच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाहीत. ही दरी फॅन क्लब्सच्या रचनेतही स्पष्टपणे प्रतिबिंबित होते. तमिळनाडूमध्ये अत्यंत शिस्तबद्ध आणि संघटित फॅन क्लब्सचे जाळे थेट राजकीय पक्षाच्या सक्षम कार्यकर्त्यांमध्ये रूपांतरित होते, मात्र बॉलीवूडचे फॅन क्लब्स केवळ उत्सवप्रेमी, व्यावसायिक आणि सामाजिक-राजकीय सक्रियतेपासून अलिप्त दिसतात.

उजव्या विचारसरणीचा उदय

चित्रपटाचा राजकीय साधन म्हणून वापर करण्याचे काही निश्चित तोटेही आहेत. जेव्हा चित्रपट राजकीय अजेंडा चालवण्याचे साधन होतो, तेव्हा कलाकारांचे स्वातंत्र्य, सर्जनशीलता आणि त्यांची चिकित्सक विचार करण्याची क्षमता धोक्यात येते. परंतु जेव्हा हा चित्रपट गरीब आणि शोषितांच्या समस्या मांडतो, तेव्हा त्याला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होते आणि तो कलेचे एक जबाबदार रूप बनतो. बॉलीवूडने प्रदीर्घ काळ राजकारणापासून अंतर राखल्यामुळे त्याला आपली सर्जनशील स्वायत्तता टिकवून ठेवता आली. त्यामुळे चित्रपटसृष्टी सत्ताधारी वर्गासमोर लाळघोटेपणा करण्यापासून दूर राहिली. डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या ‘समांतर चित्रपटांनी’देखील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कडाडून टीका केली, लोकांमध्ये बौद्धिक जाणीव जागृत केली आणि म्हणूनच त्यांना प्रामाणिक कला मानले गेले.

परंतु अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत हिंदुत्ववादी चित्रपटांचा जो आक्रमक उदय झाला आहे, त्यामुळे ही ऐतिहासिक स्वायत्तता झपाट्याने नष्ट होत चालली आहे. हिंदी सिनेमाच्या या नव्या लाटेने तमिळ चित्रपट मॉडेलची अति-नाट्यमय आणि भावुक शैली तर आत्मसात केलीच, परंतु त्याचा वैचारिक दृष्टिकोन पूर्णपणे उलटा केला.

तमिळ चित्रपटसृष्टीने आर्थिक दुर्बल आणि कनिष्ठ जातींच्या वेदनांना वाचा फोडून आपले नैतिक स्थान निर्माण केले होते. याउलट, हिंदीतील नवा हिंदुत्ववादी चित्रपट प्रकार सत्ताधारी राजवटीच्या वर्चस्वाला कायदेशीर ठरवण्याची धडपड करताना दिसतो. हा प्रकार अल्पसंख्याकांच्या (विशेषत: मुस्लीम) विरोधात प्रतिगामी नरेटिव्ह उभा करतो आणि गरिबांच्या आर्थिक वास्तवापासून पूर्णपणे तुटलेला आहे.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय जेव्हा आपल्या वास्तविक राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहेत, तेव्हा ते चित्रपट माध्यमाच्या त्या ताकदीची आठवण करून देतात, जी प्रगतिशील आणि तळागाळातील सहानुभूतीशी जोडलेली आहे. दुसरीकडे, बॉलीवूड आज अशा वळणावर उभे आहे, जिथे बहुसंख्याकवादाशी तडजोड केल्यामुळे ते आपली सर्जनशील स्वायत्तता आणि लोकशाही प्रासंगिकता दोन्ही गमावण्याच्या उंबरठ्यावर आहे.

‘जेएनयू’तील सहयोगी प्राध्यापक

enarish@gmail.com