पंकज भोसले

कुठल्याशा अ‍ॅमगाश नामक आडगावातल्या कुणा ल्यूसी बार्टनच्या या कथा.. यापैकी तिसरी कादंबरी बुकरच्या स्पर्धेत यंदा उरली असतानाच चौथीही आली. तिन्ही वाचल्यास, पात्रांच्या सहलीचे पडावही उमगतात..

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Saara Kahi Tichyasathi Fame Actor Abhishek Gaonkar engaged with social media sonalee patil
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेत्याचा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टारशी मोठ्या थाटामाटात साखरपुडा, दोघांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

एलिझाबेथ स्ट्राउट यांच्या ताज्या कादंबरी मालिकेतील पहिली कादंबरी २०१६ साली ‘बुकरच्या’ दीर्घ यादीतून लघुयादीत जाताना बाद झाली. पण तिसऱ्या कादंबरीला लघुयादीबाहेर ठेवणे परीक्षक मंडळाला जमले नाही. आता पहिल्या दोन कादंबऱ्या वाचल्याशिवाय वाचकांनी तिसरी कादंबरी वाचायला घेतली तरी चालू शकेल का, तर होच. स्ट्राउट यांच्या लेखनातील कथाघटक पुनरावृत्तीचे वैशिष्टय़च असे आहे, की आधीच्या एकसंध कादंबरीत (माय नेम इज ल्यूसी बार्टन) आणि कथांबरीत (कथामाळांची कादंबरी- ‘एनिथिंग इज पॉसिबल’) घडलेल्या सगळय़ा घटना, व्यक्तिरेखांची उजळणी यातही होत राहते. शिवाय त्या घटनांचा, व्यक्तिरेखांचा, तपशिलांचा नवा विस्तारित पट वाचकांना उपलब्ध होत जातो. ही कथापात्रे स्ट्राउट यांच्या कादंबऱ्यांमधून सहजरीत्या सहल करीत असल्यासारखी येतात. 

‘माय नेम इज ल्यूसी बार्टन’ या कादंबरीपासून या पात्रसहलीला सुरुवात झाली. यात ल्यूसी बार्टन नावाची खूपविकी बनलेली कादंबरीकार निवेदिका एका अ-जटिल शस्त्रक्रियेनंतर काही आठवडय़ांची रुग्णालय सेवा घेते. तिची कित्येक वर्षांपासून दूर असलेली आई या काळात तिला भेटायला येते. त्यातून तिच्या अ‍ॅमगाश या अमेरिकेतील दरिद्र्युत्तम भागातील लहानपणाचे संदर्भ लागत जातात. हिकमतीवर शिकून शहरात येऊन श्रीमंत व्यक्तीशी लग्न करून अज्ञात उच्चभ्रू वातावरणात रुळत जाताना, दोन मुलींचे संगोपन करताना, आत्मशोधाच्या दिशेने पहिले लग्न मोडून दुसरे जोडतानाचा ल्यूसी बार्टनचा प्रवास ‘एनिथिंग इज पॉसिबल’मध्येही सूक्ष्म स्वरूपात येत राहतो. ल्यूसी बार्टनच्या दरिद्र्युत्तम कुटुंब सदस्यांची येथे विस्ताराने ओळख होते. ‘ओह विल्यम’मध्येही आधीच्या दोन्ही कादंबऱ्यांतील कथाघटकांची सूक्ष्म किंवा दीर्घ पुनरावृत्ती होतेच. पण ही ल्यूसी बार्टनने सांगितलेली विल्यमची- तिच्या पहिल्या नवऱ्याची- संपूर्ण गोष्ट आहे. गावंढळपणाचे रूपडे टाकून शहरीकरणाची झूल चढविण्याबाबतचे ल्यूसीचे तपशील यात अधिक येतात. नव्या संदर्भाचा लेप आधीच्या व्यक्तिरेखांवर चढविला जातो आणि ल्यूसी बार्टनच्या विश्वाशी वाचक अधिकाधिक परिचित होतो. शिवाय ‘बर्जेस बॉईज’ या त्यांच्याच कादंबरीतील काही व्यक्तिरेखाही यात डोकावून जातात.

कादंबरीतील ल्यूसी बार्टनच्या खूपविकी कादंबरीकार असण्याच्या तपशिलापूर्वी एलिझाबेथ स्ट्राउट यांच्या खूपविकेपणाविषयी थोडे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. कारण बुकरच्या स्पर्धेत त्यांच्या कादंबऱ्या असण्या-नसण्याला शून्य महत्त्व आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स बेस्टसेलर’ यादीत पहिल्या क्रमांकावर पुस्तके असणाऱ्या मोजक्या अमेरिकी लेखिकांमध्ये स्ट्राउट यांचा समावेश होतो. या दशकात बुकरने अमेरिकी कादंबऱ्यांचाही विचार केल्यानंतर अशा खूपविक्या सर्वज्ञात कादंबरीकाराची लघुयादीतील उपस्थिती, हा सन्मानदेखील स्ट्राउट यांनाच मिळाला आहे. ल्यूसी बार्टनप्रमाणेच पोर्टलंड या तुलनेने गरीब शहरात कमी माणसे आणि अधिक पुस्तकांत वाढलेल्या स्ट्राउट यांनी विधि शिक्षण घेतल्यानंतरही लेखक बनण्याची सुप्त महत्त्वाकांक्षा तेवत ठेवली. रशियन लेखकांच्या अभिजात कलाकृतींची पारायणे केली. गेल्या साठ वर्षांतील कथा रिपेअरमन (अमेरिकी ‘राम पटवर्धन’) म्हणजेच गॉर्डन लीश यांच्याकडे लेखनाचे दहा वर्षांहून अधिक काळ धडे गिरवले. छोटय़ा गावातल्या त्यांच्या छोटय़ा गोष्टी लहानसहान मासिकांत छापून आल्या. मग नव्वदोत्तरीत एक कादंबरीही आली. पण त्यांच्या लेखनातील छोटय़ा खेडय़ाला लोकप्रियता मिळाली ती ‘ऑलिव्ह किटरिज’ या कथारूपी कादंबरीमुळे. कादंबरीला पुलित्झर पारितोषिक मिळाले. त्यानंतर, ‘ऑलिव्ह किटरिज’ ही खेडय़ातली करारी आणि शिस्तखोर व्यक्तिरेखा फ्रान्सिस मॅकडरमॉण्ड या कराऱ्या अभिनेत्रीने मिनीसीरिजमध्ये साकारली. यामुळे झाले असे की, ‘ऑलिव्ह किटरिज’चा वाचकपैस रुंदावला आणि ‘ऑलिव्ह अगेन’ नावाची आणखी एक कादंबरी स्ट्राउट यांनी लिहिली. त्याच शहरगावातील भौगोलिक-आर्थिक विकासात आधीच्या व्यक्तिरेखांचा पुन्हा सहलयोग जुळवून आणला.

‘माय नेम इज ल्यूसी बार्टन’ लिहिण्यापूर्वीच खूपविकेपण मिरविणाऱ्या स्ट्राउट यांनी गेल्या सहा वर्षांत ल्यूसीच्या विश्वाचा पसारा उभारला आहे. यात गेल्या साठ वर्षांतील किंवा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या अमेरिकी समाजजीवनाची चित्रे आहेत. ती परिचित भागाची नाहीत. कारण इतर शहरी लोकप्रिय अमेरिकी लेखकांप्रमाणे त्यांना महानगरांतील मुक्त आणि पॉप्युलर कल्चरचा गंध नाही. म्हणजे सिनेमांचा, पॉप गाण्यांचा, अभिनेते-अभिनेत्रींचा उल्लेख नसलेल्या किंवा त्यांत रुची नसलेल्या व्यक्तिरेखा यात आहेत. ल्यूसी बार्टन ज्या कुटुंबात वाढली, तेथे टीव्ही- रेडिओ- वृत्तपत्रादी जाणीव रुंदीकरणाचे घटकच नसल्यामुळे व्हिएतनाम युद्धासह कैक राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक चळवळी संदर्भाच्या न भरून येणाऱ्या कमतरतेसह तिची न्यू यॉर्क शहरात जडणघडण झालेली आहे. लेखिका म्हणून तिने आपल्यातील या कमतरतांनाच आयुध म्हणून वापरलेले आहे. परिणामी, तिच्या कादंबऱ्या खूपविक्या आहेत. जगभरातील लेखन शिबिरांत, लेखक मेळाव्यांत, विद्यापीठांत व्याख्याने देण्याचे निमंत्रण तिला मिळते.

‘ओह विल्यम’ कादंबरीत ल्यूसी बार्टनच्या दुसऱ्या पतीचा, डेव्हिडचा नुकताच मृत्यू झाला आहे. दुसरे लग्न झाल्यानंतरही, तिने अचानक सोडून दिलेल्या पहिल्या पतीशी म्हणजेच विल्यमशी तिची मैत्री कायम आहे. अन् या विल्यमला त्याच्या तिसऱ्या पत्नीनेही टाकून दिल्यावर त्यांच्या मैत्रीला वयाच्या साठोत्तरीत नवे परिमाण वगैरे मिळाले आहे. काडीमोडीचे इथले सहजदाखले ऐकायला किचकट वाटत असले, तरी वाचताना खूप मोठी रंगत आणतात. कादंबरीच्या पहिल्या वाक्यातच ल्यूसी बार्टन सांगते की ‘विल्यम या माझ्या पहिल्या पतीविषयी काही गोष्टी मला सांगायच्यात. कारण गेल्या काही दिवसांपासून तो काही दु:खदायक घटनांमधून जात आहे. आपल्यापैकी सगळेच जण कोणत्या ना कोणत्या दु:खांच्या घटनांनी वेढले असतात. तरी मला त्याच्याविषयीच्या घटना सांगणे भागच आहे. तो ७१ वर्षांचा आहे.’

हा विल्यम श्रीमंत न्यू यॉर्कर आहे. शहरातच त्याची जडणघडण झाली आहे. विद्यापीठात डॉक्टरेट मिळवून शिकवत आणि संशोधन करीत त्याचे आयुष्य सुरळीत आणि संपन्न प्रेमकरणांतून गेले आहे. या ७१ वर्षांच्या विल्यमशी पहिल्या लग्नापासूनची ओळख, दोन आता मोठय़ा विवाहित असलेल्या मुलींशी दोघांचा उरलेला संपर्क यांविषयी सांगताना लग्नसंस्थेविषयी गमतीदार निरीक्षणे ल्यूसीच्या नजरेतून स्ट्राउट करीत जातात. विल्यमला सोडून जाणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पत्नीविषयी स्वतंत्र माहिती आली आहे, तसेच आपण विल्यमला का सोडले, याचे आधीच्या कादंबरीत न आलेले तपशील विस्तारासह आले आहेत. या विल्यमच्या स्वप्नात ७१ व्या वर्षी कॅथरीन कोल ही त्याची आई सातत्याने येत असते. आईला ‘मॉम’ऐवजी कॅथरीन कोल असेच संबोधणारा विल्यम तिच्या मृत्यूनंतर तिच्याविषयीच्या दडवून ठेवलेल्या एका रहस्याला जाणून घेतो. त्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी ७१ व्या वर्षी तो ल्यूसीला आपल्या ‘आईच्या गावात’ चलण्याची विनंती करतो. ल्यूसीच्या आई-वडिलांचा इतिहास/ विल्यमच्या आई-वडिलांचा छुपा इतिहास यांची सरमिसळ करीत ‘ओह विल्यम’ कादंबरीचा आराखडा पुढे सरकत जातो. कॅथरीन या आपल्या पहिल्या प्रेमळ सासूविषयीचे अनेक तपशील सांगत ल्यूसी ती व्यक्तिरेखा जिवंत करते आणि पुढे तिच्या इतिहासाचा शोध घेताना समोर येणारे कॅथरीनचे नवे रूप पाहून विल्यमइतकीच हरखून जाते.

ल्यूसी बार्टनला मध्येच आठवणाऱ्या छोटय़ा-छोटय़ा घटनांचे कित्येक तपशील कथानकाचे नियम मोडूनही येथे अचूक बसतात. विल्यमच्या आईच्या खेडय़ातल्या, शहरगावातल्या दुपारी पुणेरी वेळेनुसार बंद होणाऱ्या उपाहारगृहांचे वर्णन असो किंवा एका मुलीचा अपघाती गर्भपात झाल्यानंतर तिची सांत्वनपर भेट, साहित्यिक कार्यक्रमात व्याख्यानाला जाताना वादळी पावसामुळे विमानतळावर अडकण्याचा प्रसंग असो किंवा त्या प्रसंगात मदत करणारे अनोळखी दाम्पत्य दुसऱ्या साहित्यिक कार्यक्रमात अतीव आदराने तिला भेटायला आल्याची स्मृती असो. ‘विल्यमची गोष्ट’ चिंतायुक्त प्रेमाने कादंबरीरूपात सांगताना स्ट्राउट प्रेम, लग्न, प्रतारणा, स्त्री-मुक्ती, माणसाचा पांढरा-काळा भूतकाळ, कुटुंबसंस्था अशा किती तरी घटकांना स्पर्श करीत आपण खूपविकी कादंबरीकार का आहोत, हे सिद्ध करतात. घटनांच्या, वाक्यांच्या पुनरावृत्तीची भीती न बाळगता जगण्यातील साध्या क्षणांना कथारूप देण्यासाठी स्ट्राउट यांनी वापरलेले शब्दसंचित पानापानांची वाचनसहल सुखद करीत जाते. 

ल्यूसी बार्टनच्या ‘अ‍ॅमगाश मालिके’तील तीन पुस्तकांतून चालणारी पात्रांची सहल थांबलेली नसून गेल्या आठवडय़ात ‘ल्यूसी बाय द सी’ नावाची स्ट्राउट यांची याच अ‍ॅमगाश गावात घडणारी चौथी कादंबरी बाजारात आली आहे. करोनाकाळात समुद्रकिनारी घरात अडकलेल्या ल्यूसी बार्टनच्या संदर्भानी संपृक्त असलेल्या या कादंबरीत इतर पात्रांचीही करोना आडकित्त्यातील कहाणी पुढल्या काही दिवसांत खूपविकी होणे अटळ आहे. त्यासाठी ‘ओह विल्यम’वर बुकरची मोहर बसण्याची किंचितही गरज नाही, इतके अटळ.