अगदी अलीकडेच समाजमाध्यमांवर ८०च्या दशकाचा ट्रेंड आला होता. आपण ८०च्या दशकात कसे दिसलो असतो हे तपासून पाहण्याचा मोह अगदी भल्याभल्यांना आवरला नाही. हा सर्व तुमचा डेटा संकलित करण्याचा प्रकार आहे, यामुळे कित्येक दशलक्ष लिटर पाण्याचा आणि प्रचंड ऊर्जेचा गैरवापर होत आहे, असे सल्ले देण्याचा प्रयत्न जाणकारांनी करून पाहिला. पण त्याचा उपयोग झाला नाही. हे फॅड चार दिवस चालले आणि नंतर विरूनही गेले. याला ‘एआय’ची जादू म्हणायचे, गारुड म्हणायचे की एआय आपल्या मनाला, बुद्धीला कशा प्रकारे नियंत्रित करू लागले आहे त्याची एक चुणूक होती, म्हणायचे?

‘एआय’, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, हा सध्या कॉलेज कट्ट्यांपासून राजकीय पक्षांच्या धोरणांपर्यंत सर्वत्र चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला महत्त्वाचा विषय आहे. ‘भारताने एआयची बस चुकवली आहे का’ इथपासून, ‘आपला देश या क्षेत्रात कशी वेगवान वाटचाल करत आहे’ इथपर्यंत चर्चा झडतात. त्याच्या जोडीला एआयमुळे मनुष्यजात नष्ट होईल, हे तंत्रज्ञान मानवाला गिळंकृत करेल, अशी भीतीदायक भाकितेही केली जातात. या कालबाह्य चर्चांमध्ये अडकून गोंधळलेल्या लोकांना वाट दाखवण्यासाठी जिबू इलियास यांनी लिहिलेले ‘द न्यू डिव्हाइड- पॉवर, कंट्रोल अँड द कॉस्ट ऑफ एआय’ हे संदर्भ पुस्तक उपयुक्त ठरू शकते.

एआयसंबंधी प्राथमिक चर्चा करण्याची वेळ केव्हाच टळून गेली आहे. हे तंत्रज्ञान कसे काम करते, त्यामध्ये काय त्रुटी आहेत, त्याचा ज्ञान-आधार काय आहे, वास्तव आणि आभासी जगाचा आमनासामना होत असताना वास्तव तथ्यांवर आभासी माहितीने मात करण्याची शक्यता अधिक भीतीदायक का आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा यामध्ये धांडोळा घेण्यात आला आहे. एआय म्हणजे सत्य नव्हे. तर आतापर्यंतच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ज्याप्रमाणे पाश्चात्त्य जगताची थोरवीच जगासमोर आणली गेली, तसे एआयच्या बाबतीतही का घडत आहे आणि ते कसे टाळता येऊ शकते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘एआय तंत्रज्ञान माणसाला नष्ट करेल अशी भीती मला वाटत नाही, तर या तंत्रज्ञानावर कोणत्या लोकांचे वर्चस्व राहील हा विचार मला अधिक छळतो,’ असे लेखकाने नमूद केले आहे.

आपली विचार करण्याची, कामाची, नवीन काहीतरी घडवण्याची प्रक्रिया, सवय, वळण या सर्वांना एआयमुळे नवा आकार मिळत आहे. नवी दिशा मिळत आहे. कधी नवा मार्ग सापडत आहे तर कधी आहे त्याच मार्गाबद्दल शंका उपस्थित होत आहेत. आपल्या लक्षातही येत नाही इतका हा घुसळणीचा काळ आहे. यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात. ते तातडीने सोडवण्याची गरज आहे, पण ते सुटतील आणि योग्य उत्तरे मिळतील याची खात्री मात्र नाही. हे प्रश्न अस्वस्थ करणारेही आहेत. पुन्हा एकदा, मानवाने निर्माण केलेले तंत्रज्ञानच त्याच्यावर वर्चस्व गाजवणार हे स्पष्ट दिसत असताना ज्यांचा या तंत्रज्ञानाशी, त्याच्या वाटचालीशी काहीही संबंध नाही त्यांनी काय करायचे?

एआयचे जग अल्गोरिदमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करते, सामाजिक मर्यादा नव्याने आखते आणि मानवी कर्तृत्वाच्या मूळ संकल्पनेलाच आव्हान देते. हे सारे जितके ओळखीचे होऊ पाहात आहे, तितकेच ते अनोखेही आहे. सामान्यजनांच्या बुद्धिमत्तेला सतत आव्हान देणारे आणि चक्रावून टाकणारे आहे. लेखक आपल्या अनुभवांचा वापर करून आभासी आश्वासने आणि वास्तव परिस्थिती यामध्ये वाढती तफावत दाखवून देतात. बड्या कंपन्यांमध्ये एआयमुळे एका फटक्यात हजारोंच्या संख्येने होणारी नोकरकपात, त्याच एआयचा वापर करून अचंबित करणार्‍या जगाची निर्मिती, सत्तेच्या खेळात एआयची भूमिका, अनियंत्रित नवनिर्मिती या सर्वांचा आपल्यावर होणारा परिणाम, अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसतो.

जिबू इलियास हे संशोधक, लेखक आणि एआय गव्हर्नन्सचे सल्लागार आहेत. त्यांना या क्षेत्रात एका दशकभराचा अनुभव आहे. त्यांनी २०१८मध्ये, ‘इंडिया एआय’ या प्लॅटफॉर्मची सह-निर्मिती केली. या मंचाचा भारताच्या एआय धोरण निर्मितीसाठी उपयोग झाला. ‘द न्यू डिव्हाइड’च्या माध्यमातून त्यांनी खर्‍या बुद्धिमत्तेपेक्षा अंदाजांवर काम करणार्‍या एआय प्रणालीचे वास्तव उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयात रस असलेल्यांना आणि खरे तर भविष्याचा वेध घेण्याची इच्छा असलेल्या सर्वांनाच हे पुस्तक फायदेशीर ठरेल.

द न्यू डिव्हाइड- पॉवर, कंट्रोल अँड द कॉस्ट ऑफ एआय
लेखक : जिबू इलियास
प्रकाशक : कॉन्टेक्स्ट
पृष्ठे : ३३६, किंमत : ७९९ रु.