अफगाणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतल्यानंतर गेल्या चार वर्षांत मुलींची शिक्षणवंचना सुरू झाली, पण त्या आधी शिक्षण आणि पुस्तकओळख झालेल्या मुली-महिलांचे काय? अफगाणिस्तानमधील स्त्रीहक्कांसाठी लढणार्‍या ‘रुक्शाना मीडिया’मार्फत गार्डियनने अफगाणिस्तानमधील महिलांच्या ‘गुप्त पुस्तकगटा’ विषयीची परवा प्रकाशित केलेली गोष्ट.  मिळतील तिथून ऑफलाइन किंवा ऑनलाइन पुस्तके गोळा करणार्‍या या महिला मनोरंजन अथवा छंद म्हणून वाचक बनल्या नाहीत. आपल्यापेक्षा वेगळ्या जगाची माहिती करून घेण्यासाठी ग्रंथ  हाच त्यांना आधार वाटतो. हेमिंग्वे आणि जॉर्ज ऑर्वेल त्या का वाचतात, चर्चा कशा करतात आणि पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी मोबाइलची रेंज मिळविण्यासाठी काय करतात आदी तपशील यात आहे. ‘बुकसेलर्स ऑफ काबूल’ या नॉर्वेजियन पत्रकाराने लिहिलेल्या पुस्तकापलीकडले समकालीन महिला वाचकांचे जग इथे पाहता येईल. शिवाय अंधाकारी भविष्यातही त्या वाचू शकतायत याचा आनंद होईल.

https:// tinyurl. com/36362 bda

लेखक बनण्याची गोष्ट…

निक रिपाट्राझोन हा काही अमेरिकेतील बहुचर्चित लेखक नाही. महत्त्वाच्या मासिकांमध्ये त्याच्या कथा मात्र फार लहान वयापासून छापून आल्यात. कथा-कादंबर्‍यांसह ‘कॅॅथलिक साहित्य’ हा त्याचा अभ्यासाचा भिन्न प्रांत. ‘लिट हब’मध्ये प्रकाशित झालेला हा निबंध लेखक म्हणून त्याच्या जडणघडणीचा. ‘न्यू यॉर्कर’च्या ‘पर्सनल हिस्ट्री’ या विभागासारखा इथे वाचता येईल. अनोळखी लेखकाशी ई-मेल मधून संपर्काचा. त्यातून तयार झालेल्या लिखाणाविषयक-साहित्यविषयक धारणांबद्दल सांगणारा. एकच कथा ९१ वेळा मासिकांकडून नाकारली गेल्यानंतरही या निबंधकाराला लेखनऊर्जा कशी देऊ शकते याचा तपशील वाचायला मिळतो.

https:// tinyurl. com/ j568 numa

डच प्रवासलेखकाबद्दल

सेस नोटबुम हा डच लेखक या आठवड्यात वयाच्या ९२ व्या वर्षी निवर्तला. तोवर हा लेखक त्याच्या देशातील नोबेलसाठीचे तगडे नाव असल्याचे अल्प प्रमाणात वाचकवर्गाला ठाऊक होते. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी मृत्युलेखासह आदरांजली वाहिली. कथा-कादंबरीबरोबर आपल्या भाषेत त्याने लिहिलेली प्रवास वर्णने गाजली. त्यांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रमाण कमी असले, तरी ऑस्ट्रेलिया-आफ्रिका खंड, जर्मनी आणि अनेक राष्ट्रांवर लिहिलेल्या निबंधांचे ‘नोमॅड्स हॉटेल’, स्पेनमधील भटकंतीवरचे ‘रोड टू सॅण्टिॲगो’, व्हेनिसवरील ग्रंथ त्यांतल्या कसदार शैलीतील लिखाणासाठी वाचले जाते. मृत्युलेख भरपूर मिळतील. पण मॅडलिन टियान या लेखिकेने लिहिलेल्या लेखासारखा तपशील इतरत्र नाही सापडणार.

https:// tinyurl. com/3 jk5 px8 r