‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ या चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीची कहाणी आधुनिक काळात अमेरिकेत नव्याने घडविणार्या लेखिका बार्बरा किंग्जसॉल्व्हर यांच्या ‘डिमन कॉपरहेड’ला तीनेक वर्षांपूर्वी पुलित्झर पारितोषिक मिळालेले. लहानपण आफ्रिकेत त्यानंतर युरोप आणि अनेक देशांत घालविलेल्या किंग्जसॉल्व्हर यांच्या लेखनाची प्रक्रिया आणि कादंबर्यांवर विविधांगी चर्चा करणारा भलामोठा व्यक्तिवेध (प्रोफाइल) दोन आठवड्यांपूर्वीच्या न्यू यॉर्करमध्ये ‘रायटिंग होम’ या शीर्षकाने झळकला. त्यांच्या बहुतांश कादंबर्या गरिबांच्या आणि ग्रामीण अमेरिकेच्या कहाण्या मांडतात. १७ पुस्तकांत केवळ एक कथासंग्रह, तोही १९८९ साली. हा व्यक्तिवेध त्यांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकतोच, वर आगामी पुस्तकावरही चर्चा करतो. सुरुवातीच्या एका परिच्छेदासाठी १०० पाने खरडणार्या किंग्जसॉल्व्हर यांना कादंबरी हा प्रकार आश्वासक वाटतो. विस्तारित गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी किती महत्त्वपूर्ण ठरू शकते याचे आख्यान या दुव्यावर वाचता येईल. त्यासह आणखी एक ताजी मुलाखत.
https://tinyurl.com/3h67apv9
https://tinyurl.com/yc8eec89
शांता गोखलेंचा वाचनपसारा…
‘ऑफ ॲन्सेस्टर्स ॲण्ड फ्रेण्ड्स : ए लाइफ विथ बुक्स’ या शांता गोखले यांच्या नव्या ग्रंथात त्यांच्या वाचन पसार्याविषयी चर्चा आहे. त्यानिमित्ताने ‘मिंट’ने घेतलेल्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या वाचनाविषयी भरपूर तपशील पुरविले आहेत. वडिलांकडून आलेला घरातील पुस्तकांचा वारसा, त्यात पडत गेलेली भर, घरात असलेल्या विविध विषयांवरच्या ग्रंथांची विभागणी या गोष्टींवर त्या बोलल्या आहेतच. याशिवाय वाचन कशासाठी आणि पुस्तक वाचनासंदर्भात स्वत:ला घातलेल्या नियमांचाही भाग आला आहे.
https://tinyurl.com/yk8mse3z
रशियाचे ग्रंथांशीही युद्ध…
कोणे एके काळी जगभरातील लहान मुलांसाठी सुंदर बांधणीची सुबक आणि रंगसमृद्ध पुस्तके त्या-त्या भाषेत देणार्या रशियाचे आताचे युद्धखोर धोरण युक्रेनमधील पुस्तकांनादेखील नष्ट करण्याच्या मागे लागलेले दिसते. ‘बीबीसी’ने महिन्यापूर्वी आणि ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने आठवड्यापूर्वी रशियाच्या हल्ल्यांमध्ये नष्ट झालेल्या कीवमधील छपाई कारखान्यांबाबत माहिती दिली आहे. त्यात शालेय साहित्यापासून गोष्टींची पुस्तके अशा या वर्षी छापलेल्या कित्येक लाख ग्रंथांच्या लावलेल्या विल्हेवाटीचे वर्णन आहे. १० टक्क्यांहून अधिक शालेय साहित्य रशियाच्या हवाई हल्ल्यांमध्ये नष्ट झाले असून गेल्या दोन महिन्यांपासून प्रकाशन उद्योगाची वाताहत झाली आहे. त्याबाबतचे वृत्तदुवे येथे वाचता येतील.
https://tinyurl.com/ywjncn6j
https://tinyurl.com/ywjncn6jn
