महिन्यापूर्वी ‘गार्डियन’ने गाजत्या लेखकांना निमंत्रित करून १०० अभिजात कादंबर्यांची यादी तयार केली. बहुतांश महत्त्वाच्या लेखकांनी सुचविलेल्या शतकापूर्वीच्या कादंबर्या खरेच आता वाचल्या जातात काय? याचा प्रयोग युआन मार्कस जोन्स या संपादक-लेखकाने ‘गार्डियन’साठीच करून पाहिला. लहानपणी त्याने चार्ल्स डिकन्स आणि ब्रॅम स्टोकर आधाशासारखे वाचून काढलेले. मात्र आजच्या सततच्या रील्स आणि समाजमाध्यमांमध्ये अडकून पडण्याच्या दैनंदिन सवयीमध्ये हे वाचन अवघड कसे होेत आहे, याचा त्याने धांडोळा घेतला. खरे तर हाच प्रयोग आपल्याकडे मराठीतील अभिजात कादंबर्यांबाबतही करता येईल. पण अभिजातच काय, ताज्या कादंबर्यांबाबतदेखील ही अडचण सारखीच उभी दिसेल. तूर्त अभिजात कादंबर्यांच्या वाचन अडचणींमध्ये आजच्या स्क्रीनशरण युगाने किती भर घातली, याचे गमतशीर उदाहरण म्हणून या लेखाचे वाचन आवश्यक.
https://tinyurl.com/43uaeey3
शेक्सपीअर आणि स्टीव्हन किंग…
अमेरिकी प्राध्यापक कॅरोलाईन बिक्स या शेक्सपीअरच्या अभ्यासक. अलीकडे मात्र त्यांचे वेगळ्याच विषयावरचे पुस्तक आले. ‘मॉन्स्टर्स इन द अर्काईव्हज : माय इयर ऑफ द फीअर विथ स्टीव्हन किंग’. वर्षभर त्यांनी अद्याप लिहिता हात असलेल्या भयकथा लेखक स्टीव्हन किंग यांची पुस्तके- हस्तलिखिते पडताळून पाहिली. त्यांच्या अध्ययनातून लिखाणाच्या सवयीबद्दल काही निष्कर्ष निघाले. अभिजात लेखक म्हणून ३०० वर्षांहून अधिक काळ कालहत न झालेला विल्यम शेक्सपीअर आणि या शतकातील भयकथासम्राट म्हणून मान्यता असलेला स्टीव्हन किंग यांच्या लिखाण सवयीतील साम्यस्थळे सांगणारा तपशील या मुलाखतीत सापडेल. त्याचबरोबर बिक्स यांनी अचानक आपले अभ्यासक्षेत्र का बदलले याचा उलगडादेखील होईल. सध्या ‘मॉन्स्टर्स इन द अर्काईव्हज’ गाजतेय ते किंग यांच्या लेखनाची रहस्ये बिक्स यांनी मांडल्याबद्दल. या लिखित मुलाखतीसह त्यांची यूट्यूबवरील याच पुस्तकासंदर्भातील चर्चा दुसर्या दुव्यावर.
https://tinyurl.com/2nzf9ntw ● https://tinyurl.com/4jypzcj4
