अनेकांचं वाचन हे शिक्षणाबरोबरच संपून जातं. जीवनाच्या धबडग्यात पुस्तकं कपाटात पडून राहतात. त्यात आता भर पडली आहे ती समाजमाध्यमांवर आणि ओटीटीवर उपलब्ध वारेमाप आशयाची. विरंगुळ्याचा वेळ फोनच बळकावतो. वाचन हे जगाकडे चौकसपणे पाहण्यासाठी, चिकित्सक वृत्ती वृद्धिंगत करण्यासाठी, कल्पकतेला चालना देण्यासाठी, दृष्टिकोन विशाल व्हावा यासाठी आवश्यक कौशल्य आहे, याचा विसरच पडत चालला आहे. हे चित्र बदलावे म्हणून ‘हार्पर कॉलिन्स इंडिया’ने २०२६ या वर्षभरासाठी ‘रीड फॉर प्लेजर’ हा उपक्रम सुरू केला आहे.

हीच संकल्पना आधी ‘हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स यूके’नेही राबवली होती. त्याच धर्तीवर आता ‘हार्पर कॉलिन्स इंडिया’ने सर्व वयोगटांतील आणि वर्गांतील व्यक्तींना वाचनास प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे. वाचन हा पुन्हा एकदा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेकजण नवनवे संकल्प करतात. या पार्श्वभूमीवर वर्षभर नियमित वाचनाची सवय आपल्या दिनक्रमातच समाविष्ट करून घेण्याचा पर्याय यानिमित्ताने प्रकाशनाने सुचवला आहे.

या उपक्रमाअंतर्गत रोज न चुकता किमान ३० मिनिटे वाचनाचे आवाहन करण्यात आले आहे. दिवसभरात अर्धा तास काढण्याचे आव्हान कोणीही स्वीकरू आणि पेलू शकते, हा त्यामागचा विचार. सहभागी होणाऱ्यांनी लहान मुलांना, वृद्धांना किंवा जे वाचू शकत नाहीत त्यांना वाचून दाखवावे, सामूहिक वाचनाचे उपक्रम राबवावेत, असेही सुचवण्यात आले आहे. प्रत्यक्ष आणि डिजिटल अशा दोन्ही प्रकारे हा उपक्रम राबवला जाईल. त्यासाठी पुस्तकांच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांसह बुक क्लब्जचेही साहाय्य घेण्यात येईल. शाळांतील विद्यार्थ्यांना दररोज ३० मिनिटे केवळ स्वत:च्या आनंदासाठी वाचन करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहन देण्यात येईल. वंचित समाजातील मुलांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय संस्थांचे साहाय्य घेतले जाईल. या उपक्रमाअंतर्गत लेखक, प्रादेशिक भाषांतील प्रकाशक आणि वाचकांना समाजमाध्यमांच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यात येणार आसून त्यातून वाचकांचा एक मोठा समुदाय तयार होण्यास मदत होणार आहे.