दोन आठवड्यांपूर्वी ‘हिंदू’ वृत्तपत्रात एकटेपणा हा ताज्या साहित्यातील वरचढ घटक ठरत असल्याचे दाखवून देणारा लेख प्रकाशित केला. अमेरिका, ब्रिटनमधील लेखक असो किंवा भारत एकटेपणाच्या साथरोगाशी झगडणार्‍यांच्या कथा सगळीकडेच प्रसवतायत. याला कारण समाजमाध्यमांचा गेल्या दहा वर्षांपासून वाढत चाललेला पगडा. मोबाइलच्या अस्तित्वाने वाचन-लेखनात येणारे अनंत अडथळे. या सगळ्यांतही वाचणारे वाचतायत. लिहिणारे लिहितायत. बांगलादेशी वृत्तपत्रात परवाच्या पुस्तकदिनानिमित्ताने पुस्तके आणि एकटेपणासंदर्भात आलेले टिपण आणि थोडा जुना अभिजात आंग्ल साहित्यातील एकटेपणावर विवेचन करणारा दीर्घ निबंध.

मुराकामीची नवी कादंबरी…

‘टेल ऑफ काहो’ या जपानी कादंबरी प्रकाशनाचा ३ जुलै हा मुहूर्त जगभरातील आंग्ल वृत्तपत्रांनी बातम्यांमधून दिलाय. दोन वर्षांपूर्वी या कादंबरीचे पहिले प्रकरण न्यू यॉर्करच्या वार्षिक कथा विशेषांकात आले होते. आत्तापर्यंत छापून आलेल्या हारुकी मुराकामीच्या सर्वच कादंबर्‍यांतील प्रमुख व्यक्तिरेखा या पुरुष आहेत. यात मात्र काहो या महिलेला ‘कादंबरीनायक’ बनवलेय. काहीच महिन्यांत ती इंग्रजीत येईलच. पण तिचा मुहुर्त न्यू यॉर्करच्या कथा विशेषांकाशीही जुळत असल्याने त्यात नवे प्रकरण असण्याची शक्यता अधिक. ही कादंबरी महत्त्वाची का, हे सांगणारी नोंद आणि काहो कथेचा दुवा…