के. चंद्रकांत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशी थरूर यांचे हे नवे पुस्तक, इतर लेखक काय म्हणाले यांचे नेमके सार सांगणारे आहे..

शशी थरूर यांची पुस्तकं भरपूर आहेत, दरवर्षी त्यांचं एक तरी पुस्तक येतंच आणि भारताच्या १८५० नंतरच्या काळाबद्दल त्यांचं बहुतेक लिखाण आहे, हे सगळं खरं असलं तरी २०२२ मध्ये आलेलं ‘आंबेडकर : अ लाइफ’ हे पुस्तक, थरूर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल का आणि काय लिहावं वाटतं याविषयी कुतूहल चाळवणारं आहे. त्याहीपेक्षा, या आणखी एका पुस्तकानं काय साधणार, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे.

पहिला प्रश्न थरूर यांना का लिहावं वाटलं याबद्दलचा. त्याचं राजकीय उत्तर म्हणाल तर ते पुस्तकाबाहेरही आहे – याच वर्षी याच थरूर यांना काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं स्वप्न पडलं होतं! पुस्तकामध्येही पहिल्या भागाच्या अखेरच्या परिच्छेदात, सन २०१२ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ म्हणून डॉ. आंबेडकर यांचं नाव गांधी, नेहरू आणि पटेल यांच्याहून अधिक जणांनी घेतल्याचा दाखला थरूर यांनी दिलाच आहे. हे झालं राजकीय कारण. दुसरं मानवी कारणही दिसून येतं. या पुस्तकासाठी प्राथमिक संशोधनाचं काम कॅथरीन अब्राहम आणि शीबा थत्तिल या दोघींनी जरी केलं असलं तरी, पुस्तकामध्ये आंबेडकरांबद्दल काय नि कसं लिहायचं याची निवड तर थरूर यांनी स्वत:च केलेली आहे.. त्यामधून डॉ. आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेनं स्तिमित आणि ‘अस्पृश्य’ म्हणून त्यांना भोगाव्या लागलेल्या अन्यायामुळे व्यथितही झालेले थरूर इथं दिसतात. तिसरं महत्त्वाचं कारण – डॉ. आंबेडकरांची बरीच चरित्रं उपलब्ध आहेत.  दलितांच्या सद्य:स्थितीविषयी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांतूनही डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे संदर्भ येतात. व्यक्तिगत आयुष्य हा काही पुस्तकांचा, तर वैचारिक कर्तृत्व हा बाकीच्या पुस्तकांचा मुख्य विषय आहे.  या सगळय़ांची सांगड घालण्याचं काम कुणीतरी चांगल्या इंग्रजीत करायलाच हवं होतं, ते थरूर यांनी केलेलं आहे. डॉ. वसंत मून आणि धनंजय कीर यांचे संदर्भ इथं वारंवार येतात, तसे इझाबेल विल्किन्सनचेही येतात. बाकी आनंद तेलतुंबडे ते भिकू पारेख अशा अनेक लेखकांचेही संदर्भ आहेत. याशिका दत्ता या तरुण लेखिकेचा संदर्भ थरूर देतात, मग गेल ऑम्व्हेट, सूरज एंगडे.

पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला चरित्र/ विचारओळख असा तर दुसरा भाग त्याहून आकारानं बराच लहान, पण लेखक म्हणून थरूर यांना डॉ. आंबेडकर कसे दिसतात, हे सांगू पाहणारा. तो दुसरा भाग या पुस्तकात तरी फारच विस्कळीत आहे. गांधी- आंबेडकर तुलना ज्या नेहमीच्या मुद्दय़ांवर आणि नेहमीच्या पद्धतीनं होते तशीच ती या भागात मध्येच आली आहे. डॉ. आंबेडकरांचे हिंदू धर्माबद्दलचे परखड विचार, इझाबेल विल्किन्सन ते याशिका दत्ता यांची डॉ. आंबेडकरांबद्दलची निरीक्षणं असं काहीकाही इथं आहे. मुळात, डॉ. आंबेडकरांविषयी इतर चरित्रसंशोधक  काय म्हणाले आणि त्यांनी त्या चरित्राचा कसा अर्थ लावला याचं अभ्यासू आकलन पहिल्या भागात आलेलंच असताना दुसरा भाग हवा तरी कशाला,  असा प्रश्न पडावा इतपत संदर्भाचा भडिमार इथं झालेला आहे.

पण या पुस्तकाचा पहिला भाग मात्र, आंबेडकरांचं महत्त्व स्वीकारत नाहीत, त्यांना ते स्वीकारावंच का लागेल, याचा वस्तुपाठ ठरला आहे. थरूर यात कसूर सोडत नाहीत. कधी गोष्टी सांगत, तर कधी वैचारिक अवतरणं पुरवत ते डॉ. आंबेडकरांचं मोठेपण वाचकापर्यंत नक्की पोहोचवतात.

याच पुस्तकाची आंतरराष्ट्रीय आवृत्ती पुढल्या वर्षी , ‘बी आर. आंबेडकर : द मॅन हू गेव्ह होप टु इंडियाज डिसपझेस्ड’ या नावानं मँचेस्टर युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे  प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये कदाचित दुसरा भाग आणखी मोठा असेल- म्हणजे त्यात आणखी अवतरणं असतील. पण थरूर यांचं एक निरीक्षण तरीही लक्षात राहातं. ‘आंबेडकर यांचं लिखाण वाचताना भारतीय लोकशाहीबद्दल समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय समज वाढते’ असं ते म्हणतात. हा जर थरूर यांच्यावर झालेला खरोखरचा परिणाम असेल, तर तो मोठा आहे.

आणि नसेल, तरीही डॉ. आंबेडकरांपासून लांब असलेल्यांनी, राज्यघटनेच्या शिल्पकाराचं आणि समाजाला आजही ‘आरक्षण धोरणा’चा आरसा दाखवणाऱ्या द्रष्टय़ा धुरीणाचं हे अभ्यासू आकलन वाचलंच पाहिजे, असं आहे.

आंबेडकर : अ लाइफ

लेखक : शशी थरूर</p>

प्रकाशक : अलेफ बुक कंपनी

पृष्ठे : २२६ किंमत : ५९९ रुपये

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review ambedkar a life by author shashi tharoor zws
First published on: 03-12-2022 at 02:59 IST