अतुल सुलाखे
एखादे ध्येय किती पकडीत आले आहे हे सांगणारा ‘दिल्ली अभी दूर है’ हा वाक्प्रचार आपल्याकडे प्रसिद्ध आहे. एरवी तो रूपकात्मक भासतो. तथापि ‘व्हेन द सिख्स कॉन्कर्ड दिल्ली/ हाऊ द सिख्स डिफिटेड द मुघल्स’ या अरविंद एस. ब्रारलिखित पुस्तकासंदर्भात, तो तंतोतंत लागू होतो. अरविंदर ब्रार यांचे हे पुस्तक, शीख आणि मुघल यांच्यातील संघर्षाची, दिल्लीस केंद्रस्थानी राखत नोंद घेते. पुस्तकात शीख आणि मुघल यांच्यातील संघर्षाचा आढावा घेण्यात आला आहे.

ब्रार रूढ अर्थाने इतिहासाचे अभ्यासक नाहीत. तरीही त्यांनी काही शतकांच्या शीख इतिहासाचा आढावा घेतला आहे. हे करताना त्यांनी केवळ ऐतिहासिक घटनांचीच नोंद घेतली असती तर ते चुकीचे झाले नसते. अथवा केवळ युद्धांच्या अंगाने या विषयाची हाताळणी केली असती तर तेही समजून घेता आले असते. याची कारणे त्यांनी हाताळलेल्या विषयामध्ये आहेत. शिखांनी मुघलांचा पराभव करणे आणि दिल्ली काबीज करणे याला अनुसरून ते योग्य ठरले असते.

ब्रार इथे वेगळा दृष्टिकोन घेतात. या निमित्ताने ते गुरू नानकांपासून शीख धर्माच्या वाटचालीचा पट समोर ठेवतात. कोणतीही घटना पोकळीत घडत नाही. तिला स्थळकाळाचे परिमाण असते. दिल्ली काबीज करणे ही घटनाही तशीच आहे. शीख धर्मातील गुरूंची परंपरा आणि शेवटी ग्रंथ-गुरूपाशी तिला मिळालेला पूर्णविराम यांची काहीएक माहिती असल्याशिवाय शीख धर्माचे हृदय समजणार नाही. हे ओळखून लेखकाने नानकदेव ते गुरुग्रंथ साहेब असा आढावा घेतला आहे. शीख धर्माची उत्पत्ती, नानकदेवांचा जन्म, समानता, प्रामाणिकता, श्रमश्रेष्ठता, न्यायप्रियता या मूल्यांची शीख धर्माने सुरुवातीपासून धरलेली कास, यातून तयार झालेली धर्माची ओळख असा व्यापक पट लेखकाने मांडला आहे.

दहा गुरूंचा परिचय सांगताना, त्यांचा या धर्माच्या जडणघडणीतील वाटा, खालसा, लंगर या संस्थांची निर्मिती, असा पाया घालून लेखक गुरु गोविंद सिंहांच्या कालखंडाकडे वळतात.

गुरु गोविंद सिंहांचा काळ हा संघर्षाचा. या दरम्यान मुघल सत्तेची पकड मजबूत झाली होती. नव्या सत्तेच्या विस्तारात तलवारीचा वापर अटळ होता. याला उत्तर म्हणून शीख समुदायाला प्रतिकार करणे अटळ होते. गुरु गोविंद सिंहांनी हे आव्हान समर्थपणे पेलली. त्यांनी नैतिक चौकटीला सैन्य शक्तीची जोड दिली.

मुघल सत्तेच्या अन्यायाचा आढावा पुस्तकात घेण्यात आला आहे. शीख गुरूंनी प्रसंगी बलिदान पत्करत धर्माची प्रतिष्ठा राखली. शीख धर्मियांची एकता आणि त्यांचा दृढनिश्चय यांचे भव्य स्मरण या प्रकरणामुळे होते. शीख धर्मियांचे संघ (मिसल), त्यांच्या लष्करी कारवाया, मुघल आणि अफगाण यांची आक्रमणे, त्यांच्यासमोर पंजाबचे रक्षण करणे, या आक्रमणाची कालक्रमाने नोंद हा या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे. यासाठी दोन स्वतंत्र प्रकरणेही आहेत. शीख समुदायाने दिल्ली कशी काबीज केली याचे वर्णन येते. हा अर्थातच पुस्तकाचा मुख्य हेतू. त्यामुळे यासाठी स्वतंत्र प्रकरण असणे अपेक्षित आहे.

ब्रिटिश आणि शीख यांच्या संबंधांची माहिती पुस्तकात मिळते. पुढे स्वातंत्र्य आणि अर्थातच फाळणीच्या नोंदी आणि शेवटचे प्रकरण आधुनिक कालखंडातील शीख धर्म. शीख धर्मातील स्त्रियांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा एखाद दुसरा उल्लेख वगळता बाकी काहीही नाही.

शीख आणि शीख धर्म यांना कवेत घेणार्‍या एखाद्या संदर्भ ग्रंथाचे स्मरण करून देणारा हा तपशील आहे. नेमकी इथूनच पुस्तकाला उतरती कळा लागली आहे.

लेखकाने आरंभी या पुस्तकाचे दोन विशेष सांगितले आहेत. अशा पुस्तकांची हाताळणी करताना सहसा निव्वळ ऐतिहासिक घटनांची जंत्री दिली जाते. तथापि, हे पुस्तक धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा अन्य पैलूंनाही तितकेच महत्त्व देते. इथे इ. एच. कार लिखित ‘व्हॉट इज हिस्ट्री’मधील आरंभीच्या निरीक्षणाचे कुणालाही स्मरण होईल. तथ्यांची निव्वळ जंत्री म्हणजे इतिहास नव्हे.

साहजिकच पुस्तकाविषयीच्या अपेक्षा वाढतात, मात्र दुसर्‍याच प्रकरणामधे शीख गुरूंच्या योगदानाची यादीच दिसते. पुढे हा विषय तीन पानांमध्ये संपतोदेखील. केवळ पृष्ठसंख्या कमी असणे हा दोष नाही. उदा. पातंजल योगसूत्राचा विषय अगदी परिशिष्टातही सांगता येतो. त्याला मोठी पृष्ठभूमीही आहे. एकेका सूत्रात, महाभाष्याची ताकद आहे. हे पुस्तक अर्थातच तसे नाही.

अशा वेळी तीनच काय अगदी अध्र्या पानातही विषय संपवता येतो. इथे लेखकाचा एक ‘विशेष’ सांगायला हवा. अमुक एक तपशील कसा आणि कुठून आला याचा जराही उल्लेख दिसत नाही. वाणसामानाच्या यादीप्रमाणे पाच-सात पुस्तकांची नावे येतात. ती द्यायचे कारणही लेखक सांगत नाही आणि तरीही लेखकाचा दावा काय, तर हे जंत्रीवजा पुस्तक नाही. असो!

पुस्तकाचा उपयोग काय? त्रोटक माहितीनेच समाधान होणारे श्रद्धाळू, शाळकरी गट, आणि समाज माध्यमांवरच्या मंडळींना याचा आधार वाटू शकतो. आपल्याकडे नामदेव, विनोबा, काकासाहेब गाडगीळ, प्रभृतींनी शीख बांधवांच्या आदरास पात्र ठरणार्‍या रचना केल्या आहेत. ‘जपुजी’सारखी रचना आपल्या समोर आहे. पंजाब आणि महाराष्ट्र यांचे नाते बंगाल इतकेच मनोज्ञ आहे. अगदी पंजाबी लेखकाची मराठीमध्ये कादंबरीदेखील आहे. आपल्याकडील शेतकरी आंदोलनाला सर छोटूरामांचे महत्त्व वाटते. अशा पार्श्वभूमीवर पुस्तकाचा विषय आदरणीय पण मांडणी फसलेली असेच म्हणणे भाग आहे.

‘व्हेन द सिख्स कॉन्कर्ड दिल्ली/ हाऊ द सिख्स डिफिटेड द मुघल्स’

लेखक- अरविंद ब्रार

 प्रकाशक – रूपा प्रकाशन

पृष्ठे – ११९, किंमत – २९५ रु.