विनोबा भावे यांच्या ‘चित्रकलेची दृष्टी’ या निबंधात, चित्रकार नसलेल्यांच्याही जगण्यात चित्रकलेची दृष्टी कशी असू शकते याचं एक छान उदाहरण आहे- संत्रं सोलताना त्याच्या वरच्या सालीचे दोनच तुकडे- दोन वाट्यांसारखे- करायचे आणि प्रत्येक फोडीचं चोथट त्या वाटीतच टाकायचं! ‘अखेरचे राष्ट्रसंत’ असा ज्यांचा उल्लेख होतो ते विनोबा ज्याला ‘चित्रकलेची दृष्टी’ म्हणताहेत, ती सौंदर्यदृष्टीही ‘डिझाइन’च्या तोल/ लय/ पुनरावृत्ती या मूलतत्त्वांवरच आधारलेली दिसते आणि या तिन्हीचं नातं शिस्तीशी जोडता येतं.
शिस्तीत फक्त पुनरावृत्ती नसते- तोलसुद्धा फक्त समतोलच असेल असं नाही. तो विषमतोलही असतो. लयही हवीच शिस्तीला, कारण ती नसेल तर शिस्त जाचक वाटेल- मजा नाही येणार. हे शिस्तीचं डिझाइन अनेक चित्रकारांनी ओळखलेलं असतं. चित्रकारांच्या शिस्तीचं एक सर्वांत अनवट उदाहरण सुनील काळदाते यांच्या ‘गायतोंडे’ या लघुपटात आपण पाहू शकतो. वासुदेव (व्ही. एस.) गायतोंडे हे शारीरिकदृष्ट्या पुरेसे सक्षम नसूनही रोज ठरल्या वेळी त्यांच्या ‘बरसाती’त जायचे. गच्चीलगतच्या त्या खोलीत रंगसाहित्य नीट रचूनबचून ठेवलेलं नसलं वा गायतोंडे सतत कामच करत नसले तरी त्यांची रंगधानी- पॅलेट- हव्या तेवढ्याच रंगांची असायची. काम करताना कधी, किती थांबायचं, याची लय ठरलेली असे.
पण गायतोंडे एखादेच असतात. बाकी अनेक चित्रकार तरुण, धडपडणारे, संघर्ष करावा लागणारे असेच असतात. मुंबईत, वरळीच्या ‘नेहरू सेंटर’च्या मुख्य इमारतीत सध्या (३० जानेवारी ते १ फेब्रुवारी) जो ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ सुरू आहे तिथं अशा संघर्षरत चित्रकारांची चित्रं अनेक दिसतील. याउलट, पुढल्या आठवड्यात ५ फेब्रुवारीपासून दिल्लीत ‘इंडिया आर्ट फेअर’ हा कला व्यापारमेळा सुरू होईल तिथं यशस्वी चित्रकार भरपूर दिसतील. या दोन्हीतही शिस्तबद्ध आणि बेशिस्त हा फरक असतोच. सुबोध गुप्ता किंवा वलय शेंडेसारखे शिल्पकार ५० हून अधिक जणांना रोजगार देणारी आस्थापनाच चालवत असतात, तेव्हा त्यामागे शिस्त असते (बेशिस्त चित्रकारांची उदाहरणं जाहीरपणे न देणं बरं)… पण अगदी नवे चित्रकारही पहिल्याच ओळखदेखीत स्वत:च्या कामातून आणि कामाबद्दलच्या बोलण्यातून समोरच्याला ‘माझ्या कामामागे काहीएक शिस्त आहे’ असा प्रत्यय देऊ शकतात, हे प्रस्तुत लेखकानं अनुभवलेलं आहे.
चित्रकारांना शिस्तीचं महत्त्व आपसूक कळत नसेल तर ते त्यांना पटवून द्यायला हवं. स्वयंशिस्त कशी लावून घ्यायची याचे धडेच त्यांना द्यायला हवेत- आणि ज्या चित्रकारांमध्ये थोडीफार शिस्त आहे, त्यांनाही या शिस्तीचं व्याकरण समजायला हवं… स्वत: साधलेला तोल, स्वत:ची लय उमगायला हवी, हा परिणाम संतोष मोरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे होईल. संतोष मोरे हे स्वत: असे चित्रकार. संगीताची सांगड चित्रांशी- अवकाशाच्या उलगडण्याशी- घालू पाहणारे, मग अवकाशाचाच आणखी सखोल विचार करणारे.
तरुणांसाठी प्रतिष्ठेची ‘बेन्द्रे-हुसेन शिष्यवृत्ती’ मिळवल्यानंतर काही काळानं संतोष यांना स्वत:तल्या अपूर्णतांचीही जाणीव होऊ लागली आणि मग ‘कसं जगायचं असतं?’ याचा मनापासून शोध ते घेऊ लागले. त्यातूनच त्यांना शिस्तीचे बारीकसारीक पैलू स्वानुभवातून समजले. चित्रकाराचं यश/ अपयश कलाबाजारावरच अवलंबून असतं असं मानण्याच्या काळात संतोष यांचा हा शोध – आणि त्यातून आलेलं हे पुस्तक- महत्त्वाचं ठरतं, कारण अपयशानं खचून न जाण्याची शिस्तसुद्धा इथं ते सांगतात : हुरूप वाढावा यासाठी हा टप्पा अखेरचा नसल्याचं मानून, पुढे जाण्यासाठी आत्मपरीक्षण करावं, कामात काही बदल करायचा का- असल्यास का करायचा, याचा नीट विचार करावा, असे विचार बहकू नयेत यासाठी तुमच्या कामाला (कलाकृतींना) नेमका प्रतिसाद देणार्या काहीजणांशी नातं जोडावं… असा मार्ग अनेकांना या पुस्तकातून सापडू शकतो.
चित्रकारांनी वाचण्याचा कंटाळा करू नये, हा तर शिस्तीचा पहिला धडा! अतुल दोडिया, बैजू पार्थन, जितीश कलाट हे मुंबईकर चित्रकार यश/कीर्ती आणि आत्मभानाच्याही विविध टप्प्यांवर पोहोचलेले गेल्या ४० वर्षांत दिसले, त्या प्रत्येकाचं वाचन तगडं आहे. पण एरवी, चित्रकार वाचण्याचा कंटाळा करू शकतात हे जाणूनच या पुस्तकाच्या १७ प्रकरणांची अनुक्रमणिका पुन्हा विभागलेली आहे- दीड-अडीच पानंच वाचावी लागतील अशा प्रकारे या विभागांची रचना आहे.
पुस्तकाचा काही भाग ‘सेल्फ हेल्प’सारखाच असला/ भासला तरीही फक्त चित्रकारांनाच येऊ शकणार्या अडथळ्यांपासून ते अनुभवांपर्यंतची चर्चा इथं असणं, हे वेगळेपणही आहे. ‘कलावंत’ असं मोघमपणे न म्हणता चित्रकारच लेखकानं डोळ्यापुढे ठेवले आहेत. पुढली प्रकरणं फिटनेस, बचत आणि निवृत्ती यांविषयीही आहेत. एकंदरीत- चित्रकला महाविद्यालयांत जाण्याचं आकर्षण असलेली नववी ते बारावीतली मुलंमुली, त्यांचे पालक, किंवा एखाद्या चित्रकाराशी लग्नगाठ बांधली गेलेल्या बिगरचित्रकार व्यक्तीनंही वाचावं, जवळच्या चित्रकाराला ‘यात तू कुठे आहेस पाहा बरं’ हे ठरवण्यासाठी द्यावं आणि चित्रकारानंही आपल्याला काहीतरी पढवलं जातंय असा ताण न घेता वाचून स्वत:चं मूल्यमापन करावं, यासाठी हे पुस्तक आहे.
‘हाउ टु बिकम अ डिसिप्लिन्ड आर्टिस्ट- द ॲक्शन बेस्ड गाइड फॉर आर्टिस्ट्स’
लेखक : संतोष मोरे,
प्रकाशक : क्लेव्हर फॉक्स,
पृष्ठे : १६० ;
किंमत (पुठ्ठाबांधणी) : ३८७ रु.
abhijit.tamhane@expressindia.com

