जॉर्जिया मेलोनी यांचा जन्म १९७७ सालचा. १९९२ साली त्या युवक संघटनेत सक्रिय झाल्या. भिंतींवर पोस्टरं डकवली, निदर्शनं केली, भाषणं केली, वाद घातले. २००६ साली त्या इटलीच्या संसदेत पोहोचल्या. २००८ साली मंत्री झाल्या. त्या सत्ताधारी आघाडीत होत्या. त्यांची आघाडी हरली. २०१२ साली त्यांनी ‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा स्वत:चा पक्ष काढला. २०२२ सालच्या निवडणुकीत उजव्या आघाडीत त्यांचा पक्ष सर्वांत मोठा असल्यानं त्या पंतप्रधान झाल्या… हे सर्व अशासाठी सांगायचं की त्यांच्या मुलाखतींवर आधारित एक पुस्तक प्रकाशित झालं आहे- ‘जॉर्जियाज व्हिजन’.
मेलोनी यांच्या एकूण वर्तनालाच प्रसिद्धीचं वलय आहे. त्या ते वलय हेतूपुर्वक तयार करतात की ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होतं ते नेमकेपणाने सांगता येत नाही. देशविदेशांतल्या नेत्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढावेसे वाटतात. जाहीर समारंभांत नेत्यांना त्यांच्याबरोबर वावरणं आवडतं आणि तेही कॅमेर्यासमोर. ट्रम्प आणि मोदी दोघांचेही मेलोनींसंदर्भातले किस्से प्रसिद्ध आहेत. अर्थात कोण कोणामुळे प्रसिद्ध झालं ते सांगणं कठीण. मेलोनींचं दिसणं, वावरणं आणि वक्तव्यं सर्व गोष्टी वृत्तपत्रांत चर्चिल्या जातात, त्यामागची कारणं या पुस्तकातून काही प्रमाणात कळतात. पुस्तकात अलेझांड्रो सेलुस्टी या पत्रकारानं घेतलेल्या मुलाखती आहेत. मुलाखती ताज्या आहेत. मेलोनी पंतप्रधानपदावर स्थिरावल्यानंतरच्या. त्या वाचताना मेलोनी यांची वैचारिक बैठक समजते.
मेलोनी ‘कंझर्व्हेटिव्ह’ म्हणजे परंपरा जपणार्या आहेत. मुलाखतींत त्या जागोजागी ‘पोप’ची वक्तव्य उद्धृत करतात, ख्रिस्ती परंपरांतली उदाहरणं देतात. पोप आणि ख्रिस्ती चर्च या गोष्टी साधारणपणे इसवी सनाच्या तिसर्या शतकापासून सुरू होतात. मेलोनी त्याही मागं जातात. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या बोलण्यात जाणवतो. ग्रीक विचार, ग्रीक व्यवहार म्हणजेच युरोपियन संस्कृती असं मेलोनींचं म्हणणं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही ही तत्त्व ग्रीक संस्कृतीनं दिली, नंतरच्या काळात ती विकसित होत गेली असं त्यांना वाटतं.
मेलोनींची ख्रिस्ती विचारांवर श्रद्धा आहे असं दिसतं. पण त्या धर्मवादी आहेत असं वाटत नाही. इटलीच्या अवनतीला इतर धर्म कारण आहेत असं त्या म्हणत नाहीत, इतर धर्मांचा द्वेष करत नाहीत. पोप आणि ख्रिस्ती धर्माची श्रद्धा आणि कुटुंबं ही दोन मुख्य तत्त्व त्या सतत स्वीकारतात, त्यांचा उच्चार करतात. पण तेवढंच. कुटुंब, श्रद्धा, देश, स्वातंत्र्य हे युरोपीय संस्कृतीचे मुख्य घटक आहेत असं मेलोनी सांगतात; हे घटक टिकवणं म्हणजेच कंझर्व्हेटिव्ह विचार असं त्यांना वाटतं.
मेलोनी उजव्या आहेत. त्यांचा डाव्यांवर राग आहे. दुसर्या महायुद्धानंतर डाव्या विचारांचा पगडा इटालियन सत्तेवर होता. इटली आज आर्थिक संकटात आहे याची कारणं डाव्यांच्या धोरणांत आहेत, असा मेलोनींचा दावा आहे. डावे गरिबी आणि दु:खाचं ‘वाटप’ करतात असा त्यांचा आरोप आहे. संपत्तीनिर्मितीकडे डाव्यांनी लक्ष दिलं नाही, त्यांचा भर वाटपावर राहिला. परिणामी संपत्ती कमी प्रमाणात निर्माण झाली आणि तिच्या सर्व समाजभर वाटपामुळे देश गरीब राहिला असं त्यांचं विश्लेषण.
डाव्या, उदारमतवादी आणि समाजवादी विचारांमुळे माणसाची कल्पकता आणि उद्योजकता नष्ट होते, माणसं आयतोबा होतात असं मेलोनींचं म्हणणं आहे. मेलोनी मुक्त आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेच्या समर्थक आहेत. कर कमीत कमी असावेत; उत्पादकांना स्वातंत्र्य द्यावं; त्यांना नियम आणि करांमध्ये जखडून ठेवू नये; उत्पादक रोजगार निर्माण करतील; ती जबाबदारी सरकारने आपल्या अंगावर घेऊ नये; उत्पादन आणि रोजगारनिर्मितीसाठी आवश्यक कायदेशीर चौकट निर्माण करणं एवढंच सरकारचं काम आहे; असा मेलोनींचा विचार आहे.
युरोप आणि इटलीच्या राजकारणात त्या गाजतात कारण त्या बाहेरून येणार्या लोकांविरोधात पोटतिडकीने बोलतात. बाहेरून येणारी माणसं अर्थव्यवस्था आणि युरोपची संस्कृती बिघडवतात असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या युरोपात ती लाट आहे. मेलोनी त्याच लाटेवर आरूढ झाल्या आहेत.
पत्रकार केवळ सनसनाटी आणि चटकदार मथळ्यांच्या शोधात असतात; ते विधानांचा विपर्यास करतात असा मेलोनींचा आरोप आहे. साहजिकच प्रस्तुत पुस्तकातल्या मुलाखती घेणारे अलेझांड्रो सेलस्टी हे मेलोनींचे भक्त असल्यासारखेच प्रश्न मेलोनींना विचारतात, त्यांची खुशामत करताना दिसतात. मुलाखतकार आपणहूनच मेलोनींची तुलना जोन ऑफ आर्क, सिंडरेला, विन्स्टन चर्चिल यांच्याशी करतात. ज्यांची राजकीय कारकीर्द आता कुठे सुरू झाली आहे, अशा व्यक्तींना एकदम चर्चिल यांच्या रांगेत बसवणं हे खुशामत या वर्गात बसतं याची जाणीव मुलाखतकाराला आहे की नाही, ते कळत नाही. मेलोनींचे व्यक्तिमत्त्व आणि विचार दोन्ही वादळी आहेत. पैकी व्यक्तिमत्त्व फारसे बदलत नाही. विचारांना काळाची, वास्तवाची कसोटी लावावी लागते.
बाहेरून आलेली माणसं, विविध संस्कृतींच्या माणसांचं समाजातलं अटळ अस्तित्व, बेरोजगारी-विषमता-भ्रष्टाचार या समस्या युरोपला छळत आहेत. या समस्या डाव्या, उदारमतवादी, संस्कृतीला टाळणार्या राजकीय विचारांमुळे निर्माण झाल्या आहेत, असा उजव्यांचा दावा आहे. फ्रान्स, इटली, जर्मनी इत्यादी ठिकाणी अजून उजवे पूर्ण बहुमताने निवडून आलेले नाहीत. राजकीय लाट पहाता त्यांना निर्णायक बहुमत मिळू शकेलही. त्यानंतरच त्यांच्या विचारांची कसोटी लागेल. मेलोनी कशा दिसतात वगैरे गोष्टी आनुषंगिक, रंजनपर मानाव्यात. त्यांचे काही विशिष्ट विचार निश्चितपणे आहेत. डाव्या आणि उदार विचारांना उजवा विचार आव्हान देत आहे. उजव्या विचाराला एक सांस्कृतिक छटा आहे, देशोदेशी ती छटा वेगळी आहे. पण मुळात प्रश्न आणि समस्या आर्थिक आहेत हे डावे आणि उजवे दोघेही नाकारत नाहीत.
जॉर्जियाज व्हिजन : जॉर्जिया
मेलोनी इन कॉन्व्हर्सेशन विथ अलेझांड्रो सेलस्टी
प्रकाशक- रूपा प्रकाशन
पृष्ठे – २१७, किंमत – ६९५
damlenilkanth@gmail.com
