scorecardresearch

Premium

चाहूल : ‘कळेनाशा’ जगाचा झिझेकी अर्थ..

युक्रेन हा भ्रष्टाचारानं ग्रासलेला देश आहे हे तर उघडच झालं, पण त्याखेरीज काही प्रवृत्तींशी युक्रेनला आतल्या आत लढावं लागेल,

book review mad world war movies sex
‘वॉर, मूव्हीज, सेक्स’ पुस्तक

स्लावोय झिझेक याला ‘तत्त्वचिंतक’ असं म्हटल्यावर भारतीय भुवया उंचावतील, म्हणून सोयीसाठी त्याला ‘समकालीन तत्त्वचिंतक’ म्हणू.  त्याच्या तत्त्वचिंतनाची निमित्तं समकालीन आहेत पण त्याचं चिंतन हे स्थळकाळाच्या सीमांनी बांधलेलं नसून ते तात्त्विक आहे. ‘आयडिऑलॉजी’ किंवा तात्त्विक अर्थानं ‘वाद’ किंवा विचार-घराणी हेही चिंतनाला जखडून ठेवणारं बंधन आहे, असं झिझेक मानतो आणि परोपरीनं सांगतोही. अशा झिझेकचं नवं पुस्तक येत्या नोव्हेंबरात येतं आहे. या पुस्तकाच्या नावातला ‘मॅड’ हा शब्द रूढार्थानं मूर्खपणा/ वेडाचार या अर्थाचा नसून कळेनासं झालेलं जग अशा अर्थानं वापरल्याचा खुलासा झिझेकनं प्रस्तावनेतच केला आहे. ‘वॉर, मूव्हीज, सेक्स’ हे या पुस्तकाचं उपशीर्षक प्रामुख्यानं युक्रेन-रशिया संघर्षांच्या निमित्तानं लिहिलेल्या लेखांबद्दल आहे. बार्बी- ओपेनहायमरसारखे हॉलिवुडपट, हॉलिवुडमधून आजही सुरू असलेली स्वप्नविक्री हे अन्य लेखांचे विषय आहेत. लिंगभाव हा झिझेकच्या चिंतनाचा महत्त्वाचा भाग नेहमीच असतो पण ‘जेन्डर’ वगैरे शब्दकळेऐवजी झिझेक सरळ ‘सेक्स’ म्हणतो. या पुस्तकाबद्दलचं कुतूहल- आणि पुस्तकाची संग्राह्यतादेखील- युक्रेनबद्दल झिझेक काय म्हणतो यावर केंद्रित असणार, हे उघड आहे.

हेही वाचा >>> वृद्धावस्थेतील अल्झामायर टाळायचे प्रयत्न आधीपासूनच करायला हवेत…

bedbug outbreak in France
फ्रान्समध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव? ऑलिम्पिक आयोजनावर परिणाम होणार? नेमके वास्तव काय?
Fake video of lion sighting in Kalameshwar forest
कळमेश्वरच्या जंगलात सिंह पाहिल्याचा खोटा व्हिडीओ व्हायरल, अफवा पसरवणारा ताब्यात
biryani extra raita
बिर्याणीवर जास्त रायता मागितल्यामुळे झाला वाद, मारहाणीत गेला ग्राहकाचा जीव!
Shani Margi Makes Shash Mahapurush Rajyog These Three Rashi golden Period to Start Lakshmi Bring More Money Happiness
शनीचा शश राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ होईल सुरु; लक्ष्मी घरी आणेल सोन्या-सुखाचा हंडा?

याचं कारण भारत किंवा ब्राझीलसारख्या देशांनी युक्रेनयुद्धाबद्दल घेतलेला ‘तटस्थ’ पवित्रा झिझेकनं नीट पाहिलाय आणि ‘युक्रेननं स्वत:शीच युद्ध पुकारायला हवं’ असाही निबंध झिझेकनं लिहिलाय. तटस्थ देशांचं म्हणणं झिझेक समजून घेतो – वसाहतवादी आक्रमणांना ज्यांनी विरोध केला नाही ते पाश्चात्त्य देशच युक्रेनच्या बाजूनं आज उभे दिसतात, वास्तविक हेच (नाटो/ पाश्चात्त्य) देश इराकमध्ये वर्षांनुवर्ष घुसले होते, अशा आक्षेपांमध्ये तथ्य असणारच, हेही मान्य करतो पण या आक्षेपांचा तात्त्विक पाया जर वसाहतवाद-विरोध हा असेल, तर रशियाच्या वसाहतवादी कारवायांना विरोध व्हायला नको का, असं म्हणणंही गळी उतरवतो. आंतरराष्ट्रीय स्वार्थसंबंधांच्या पलीकडला हा विचार अनेकांना पटणार नाही हे ठीक, पण असा विचार मांडण्याचं काम झिझेक करतो तेव्हा तत्त्वचिंतक कोणत्याही काळात हवेच असतात ते का, याचंही उत्तर मिळतं. रशियानं युक्रेनवर चाल करून जाणं वाईटच, पण म्हणून काहीजणांच्या रशियाद्वेषाचं समर्थन करता येणार नाही, हे बजावून सांगणारा हाच झिझेक युक्रेनचीही उणीदुणी दाखवून देतो.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : डॉ. स्वाती नायक

युक्रेन हा भ्रष्टाचारानं ग्रासलेला देश आहे हे तर उघडच झालं, पण त्याखेरीज काही प्रवृत्तींशी युक्रेनला आतल्या आत लढावं लागेल, असं सांगणारा झिझेकचा निबंध हा केवळ युक्रेनबद्दल नसून वैश्विक आवाहन असलेला ठरतो. त्या निबंधात, मूळच्या सोव्हिएत रशियातल्या बेलारूसमध्ये जन्मलेले पण विघटनानंतर युक्रेनमध्ये राहू लागलेले लघुपटकार सर्जी लोझ्नित्स्का यांचा उल्लेख आहे (त्यांचा ‘द कीव्ह ट्रायल’ हा १९४६ च्या खटल्यावरचा लघुपट अलीकडेच व्हेनिसमध्ये दाखवण्यात आला होता). सर्जी लोझ्नित्स्का यांनी भर युद्धकाळातही, रशियन लघुपटांवर बंदी नको अशी भूमिका घेतली आणि त्याबद्दल ‘युक्रेनियन फिल्म अकॅडमी’नं त्यांना बडतर्फ केलं! ही किंमत मोजल्यावर सर्जी लिथुआनियात राहू लागले आहेत, ते कदाचित युक्रेनला परतणारही नाहीत, असा तपशील झिझेक अगदी बातमीदाराच्या उत्साहानं पुरवतो आणि म्हणतो : लोझ्नित्स्का हे सांस्कृतिक कोतेपणा जपणाऱ्या नोकरशहांच्या सूडबुद्धीचे बळी आहेत. यानंतर वाचकांनाही सांस्कृतिक कोतेपणाबद्दलचं चिंतन करता यावं, यासाठी झिझेक आयुधं पुरवतो! पोलंड, हंगेरी, स्लोव्हेनिया अशा नावापुरत्याच युरोपीय देशांच्या वैचारिक मागासलेपणाची अंडीपिल्ली झिझेकला माहीत असल्यानं, ‘युक्रेनमधल्या महिलादेखील पुरुषांबरोबरीनं लढताहेत’ या कौतुकाच्या ढालीमागे कुठली जळमटं साठली आहेत, हेही तो दाखवून देतो! ‘टेक्नोपॉप्युलिझम’ या मुद्दय़ाकडे झिझेक आताशा लक्ष वेधतो आहे. ‘टेक्नोपॉप्युलिझम’ म्हणजे काय, हे ‘आम्ही काही मिनिटांत अमुक कोटी लोकांपर्यंत एखादा संदेश पोहोचवू शकतो’ असं म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांच्या देशातल्या भारतीयांना चांगलंच माहीत आहे. पण लोकशाही विरुद्ध ‘टेक्नोपॉप्युलिझम’ अशी मांडणी झिझेक करणार का, हे या पुस्तकाच्या उपलब्ध उताऱ्यांतून तरी स्पष्ट होत नाही. पुस्तक नोव्हेंबरात येईल, तोवर झिझेकची या मुद्दय़ावर आणखी भाषणं झालेली असतील!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review mad world war movies sex by author slavoj zizek zws

First published on: 23-09-2023 at 03:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×