कौशिक दास गुप्ता

अज्ञान, विषमता आणि तोकडी धोरणे हेच अडथळे आजही आहेत!

इतिहासात क्षयरोगाच्या अस्तित्वाचे अनेक दाखले अनेक ठिकाणी विखुरलेले आढळतात. हे अरिष्ट एवढे पुरातन असूनही मानवाला अद्याप त्याच्याशी दोन हात करण्यात यश आलेले नाही. विद्या कृष्णन आपल्या ‘फॅण्टम प्लेग- हाउ टय़ुबरक्युलॉसिस शेप्ड हिस्ट्री’ या पुस्तकातून या अपयशाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतात.

कृष्णन सांगतात, ‘भारतात क्षयरोगाशी दोन हात करणे आव्हानात्मक आहे. दरवर्षी जगभरात क्षयरोगाचे सरासरी एक कोटी चार लाख नवे रुग्ण आढळतात. त्यापैकी सरासरी तब्बल २८ लाख रुग्ण भारतातील असतात आणि हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. ’ २०१९ साली जगभरात क्षयरोगाने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ३० टक्क्यांहून अधिक रुग्ण भारतातील होते. यात गरीब, श्रीमंत असा भेदही नाही. सर्व सामाजिक व आर्थिक वर्गातील व्यक्ती क्षयरोगाने ग्रासलेल्या दिसतात, मात्र निम्न आर्थिक वर्गातील क्षयरुग्णांना या आजाराच्या अधिक तीव्र झळा सोसाव्या लागतात. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्यापुढील आव्हान अधिक खडतर ठरते. शिवाय देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही योग्य वेळी निदान आणि औषधोपचार पुरवण्यात अपयशी ठरते.

पुस्तकातल्या एका प्रकरणात लेखिका आपल्याला मुंबई पूर्व प्रभागातील ‘नटवर पारेख कंपाऊंड’मधील इमारत क्रमांक १०मध्ये घेऊन जाते. ही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारत आहे, हे स्पष्टच आहे. ‘ही इमारत म्हणजे मुंबईतल्या एका अवाढव्य आव्हानाचे मूर्त स्वरूप! सतत वाढत जाणारी लोकसंख्या, त्यापुढे तोकडी पडणारी घरे, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा.. असे सारे काही त्या कशाबशा उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात प्रतििबबित झाले होते. त्या काडेपेटीएवढय़ा एका खोलीच्या प्रत्येक घरात किमान एक तरी क्षयरुग्ण होता..’ कृष्णन आरोग्य क्षेत्रातील एका संशोधकाचा हवाला देऊन सांगतात. कोणीही घुसमटून जाईल अशा या इमारतीतील प्रत्येक घर हे क्षयरोगाचा कारखानाच झाले होते. महाराष्ट्र हे भारतातील क्षयरोगाचे मुख्य केंद्र आहे. औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या देशातील एकूण रुग्णांपैकी एकषष्ठांश रुग्ण महाराष्ट्रात आहेत, त्याहीपैकी जवळपास निम्मे मुंबईत आहेत. याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचा आजार म्हणजे औषधांना अजिबात दाद न देणारा क्षयरोग! अशा गंभीर क्षयरोगाच्या सरासरी १२ हजार रुग्णांपैकी २०० रुग्ण मुंबईत आढळतात. अन्य अनेक संसर्गजन्य आजारांप्रमाणे क्षयरोगाच्या प्रसारातही माणसाचा निष्काळजीपणा आणि पूर्वग्रह यांनी मोठय़ा प्रामाणात हातभार लावला आहे. बहुसंख्य डॉक्टरांनाही औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगावर उपचार करताना पाळण्याची नियमावली, घ्यायची काळजी याविषयी पुरेशी माहिती नसते.

हे पुस्तक लक्षवेधी ठरते ते कृष्णन यांच्या तर्कसंगत मांडणीमुळे. सुरुवातीच्या काळात पूर्वग्रहांमुळे या क्षेत्रातील संशोधनाला बसलेले हादरे, आजही आरोग्य क्षेत्रात या संदर्भात असलेले अज्ञान, बडय़ा औषधकंपन्यांच्या हातात एकवटलेली सत्ता, भारतासह बहुतेक देशांमध्ये क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांना पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळणे, परिणामी बहुसंख्य रुग्ण योग्य वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहणे, नियोजनशून्य गृहनिर्माण प्रकल्प आणि त्यातून वाढणारा रोगप्रसार असे अनेक ठिपके जोडत प्रश्नाच्या मुळाशी जाण्यात लेखिकेला यश आले आहे.

‘फॅण्टम प्लेग..’ हे एकाच वेळी वैद्यकीय इतिहास, मानववंशशास्त्र, साथरोगशास्त्र अशा आनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक आहे. ते वाचताना आपला क्षयरोगकारक सूक्ष्मजीवांच्या विरोधातील लढय़ाचा पाया रचणाऱ्या डॉक्टर आणि संशोधकांशी परिचय होत जातो. यात इग्नाझ सेमेल्वाइज या हंगेरियन डॉक्टरांशी भेट होते. इग्नाज हे प्रसूतीवेळी उपचार देण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांनी लिंबाच्या पाण्याने हात धुवावेत, यासाठी आग्रही होते. त्यावरून त्यांनी स्वत:च्या सहकाऱ्यांचा रोषही ओढावून घेतला होता. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आणू पुढे यातच त्यांचा एका मनोरुग्णालयात मृत्यू झाला. पण त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांना ‘मातांचा त्राता’ म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रसूतीचे उपचार देण्यापूर्वी डॉक्टरांनी हात स्वच्छ धुतल्यामुळे मातेला होणारे विविध प्रकारचे संसर्ग, त्यामुळे तिच्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम आणि काही मातांचा होणारा मृत्यू टाळणे शक्य झाले.

वैद्यकीय, वैज्ञानिक प्रगती होऊनही..

जोसेफ लिस्टर, रॉबर्ट कोच आणि लुई पाश्चर यांच्या क्षयरोगाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल कृष्णन यांनी या पुस्तकात घेतली आहे. ३०० अधिक पृष्ठांच्या या पुस्तकाचा भर अर्थातच,  क्षयरोगाविरोधातील लढय़ाचे बदलत गेलेले स्वरूप चित्रित करण्यात आले आहे. गेल्या १५० वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे क्षयरोग हा बरा होण्यासारखा आजार ठरला. मात्र वैद्यकीय आणि विज्ञानाच्या क्षेत्रात एवढी प्रगती साधूनही हा रोग आजही धोरणकर्त्यांना आणि रुग्णांना चकवाच देत आहे. उदाहरणार्थ ‘इमारत क्रमांक १०’मधील बहुतेक रुग्णांना प्राथमिक टप्प्यात सामान्य प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) देण्यात आली, परिणामी त्यांची प्रकृती अधिकच खालावली.

पिया आणि श्रेया या दोन रुग्णांवरील प्रकरणात लेखिकेने औषधांना दाद न देणारा दुर्धर क्षयरोग झालेल्यांची भयावह अवस्था वर्णन केली आहे. यातील श्रेयाचा अखेर मृत्यू होतो. यातून गरिबांसमोर किती मर्यादित पर्याय असतात आणि त्यामुळे अशा गंभीर आजाराशी लढा देणे किती अशक्यप्राय ठरते, याचे भीषण वास्तव समोर येते.

एकस्वाधिकार (पेटन्ट) पद्धत व औषधनिर्मिती क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे निम्न आर्थिक वर्गातील रुग्णांना जीव वाचवणाऱ्या औषधांपासून कसे वंचित राहावे लागते, यावरही हे पुस्तक प्रकाश टाकते. कोविड महासाथीच्या पार्श्वभूमीवर जीव वाचवणारे उपचार आणि प्रतिबंधात्मक औषधांच्या पेटन्टविषयी चर्चा होत असताना, कृष्णन यांचे हे पुस्तक या चर्चेतील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरते.

भारतासह अन्यही अनेक देशांत धोरणात्मक सुधारणांची नितांत गरज असल्याची जाणीव ‘फॅण्टम प्लेग..’ हे पुस्तक करून देते. औषधांना अजिबात दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या औषधांचे रेशिनग करण्याची आवश्यकता विशद करते.

सध्या भारतातील क्षयरुग्णांना एचआयव्ही/ एड्सच्या सुरुवातीच्या काळातील रुग्णांप्रमाणेच एका भयावह वास्तवाला तोंड द्यावे लागत आहे. ते म्हणजे उपलब्ध असलेली औषधे त्यांना झालेल्या संसर्गापुढे निष्प्रभ ठरत आहेत आणि नवी औषधे त्यांना उपलब्धच होत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कृष्णन यांचे हे पुस्तक वैद्यकीय धोरणांचे विद्यार्थी, साथरोगतज्ज्ञ आणि मानवी प्रतिष्ठेसाठी आग्रही असलेल्या सर्वानी वाचावे असे आहे.

द फॅण्टम प्लेग : हाउ टय़ुबरक्युलॉसिस शेप्ड हिस्ट्री

लेखिका : विद्या कृष्णन

प्रकाशक : पेन्ग्विन व्हायकिंग

पृष्ठे : ३२० , किंमत : ७९९ रु.

kaushik.dasgupta@expressindia.com