जेन बिगिन नावाच्या एक अमेरिकी बाई कौटुंबिक विस्थापनामुळे वयाच्या तिशीपर्यंत न्यू यॉर्कमधील श्रीमंतांच्या घरांत घरसफाईची कामे करीत फिरत होत्या. पुढे सलग सात वर्षे हॉटेलात खाद्यवाटपाची (वेट्रेस) जबाबदारी पार पाडताना कथालेखनाच्या कार्यशाळांतही डोकावत होत्या. या सात वर्षांत त्यांनी घरसफाईच्या काळातील अनुभवांवरून लिहिलेल्या ‘प्रिटेण्ड आयएम डेड’ कादंबरीच्या हस्तलिखिताच्या स्थानिक प्रकाशनाने फक्त ५०० प्रती छापल्या. हॉटेलमध्ये सातत्याने येणाऱ्या पुस्तकप्रेमींना या कादंबरीतील कुठलाही साहित्यिक प्रभाव नसलेले पण आकर्षक वर्णन वाचून धक्का बसला. त्यांच्याकडून पुढे कादंबरीचा बोलबाला इतका झाला की, सायमन आणि शश्टर या बडय़ा प्रकाशनाने कादंबरीचे हक्क घेऊन नव्याने तिचा प्रचार केला. पुढल्या वर्षभरात जेन बिगिन विविध पुरस्कारप्राप्त लेखिका म्हणून ओळखल्या गेल्या. हॉटेलातील नोकरी सोडून जगता येईल इतका पैसा आणि पुढल्या कादंबरी लेखनासाठी आगाऊ मानधन असा सुकर काळ सुरू झाला. घरसफाई करणाऱ्या व्यक्तीची कहाणी आणखी विस्तारणारी ‘व्हॅक्युम इन द डार्क’ ही दुसरी कादंबरी प्रकाशित झाली आणि पुढल्या दोनच वर्षांत सेलिब्रेटी लेखिकांच्या पंगतीत जेन बिगिन यांचे नाव गणले जाऊ लागले. गेल्या महिन्याच्या अखेरीस या लेखिकेची ‘बिग स्विस’ नावाची तिसरी कादंबरी आली. ती तिच्या वाचनीयतेच्या गुणवत्तेसह आणखी कारणांनी गाजत आहे. ‘एचबीओ’ने कादंबरीच्या मालिका रूपांतरणाचे हक्क लिलावात सर्वाधिक बोली लावून खरेदी केले. ‘किलिंग इव्ह’ या बीबीसीच्या मालिकेतील खलसौष्ठवामुळे जगात पोहोचलेल्या जोडी कोमर या नव-लोकप्रिय अभिनेत्रीने या लिलावात कंबर कसली होती. त्याच्या बातम्यांमुळे वाचक आणि जोडी कोमरचे चाहते कादंबरीची दखल घेत आहेत. कारण स्वत: निर्माती झालेल्या जोडी कोमरने या कादंबरीतील महत्त्वाच्या व्यक्तिरेखेला सादर करण्याचे जाहीर केले आहे. घरसफाई आणि हॉटेलकाम काळात ५०० प्रतींची पहिली कादंबरी प्रसारित झालेल्या बिगिन हिने आपल्या नव्या कादंबरीच्या ५० हजार प्रती खपल्या तरच पुढली कादंबरी लिहेन, असा पण मुलाखतींमधून केला होता. पण कादंबरीचे हक्क लिलावात विकले गेल्यानंतर काही दिवसांतील पुस्तक खपाचे आकडे तिला नवी कादंबरी लिहिता यावी यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करीत आहेत.