अमेरिकेतल्या प्रचंड ग्रंथदालनांचा इतिहास आणि त्यांचा ऱ्हासदेखील टिपणाऱ्या या पुस्तकाची सुरुवात लेखक स्वत:पासून करतो, ती का?
‘बुकशॉप : ए हिस्ट्री ऑफ द अमेरिकन बुकस्टोअर’ या इव्हान फ्रिस यांच्या पुस्तकाच्या आरंभापासून आपण ग्रंथदालनाचा कादंबरीरूपी इतिहास वाचत असल्याची जाणीव होते. फ्रिस हे प्राध्यापक आणि तिरकस नजरेने भवताल पाहणारे लेखक. त्यांची आधीची पुस्तके त्याला साक्षच. ‘ऑन बायसिकल’ नावाचा न्यू यॉर्क शहरातील सायकलस्वारीचा दोनशे वर्षांचा इतिहास सांगणारा एक ग्रंथ. दुसराही सायकलवरचाच. अमेरिकी शहरातील नागरीकरणाशी या स्वस्ताळू वाहनाला जोडणारा. ‘द सायकलिंग सिटी’ नावाचा. या ग्रंथांच्या दरम्यान हा लेखक अमेरिकी ग्रंथदालनांचा इतिहास-भूगोल शोधक झाला. त्याची रंजक प्रस्तावना आरंभापूर्वीच्या प्रकरणात आहे. ते जाणून घेण्यापूर्वी ‘वाचन संस्कृती’ ही शब्दमाळ वगैरे (आपल्याकडे फार थोड्याच प्रमाणात पूर्वी होती आणि आताही.) आपण ज्या प्रेमाने वापरतो. त्याविषयी थोडे वैचारिक खाद्या चघळून पचवता येते का ते पाहा. इव्हान फ्रिस सतराशे सालापासून ते आताच्या अमेरिकी ग्रंथदालनांचे उत्खनन करताना अर्वाचीन काळातील वाचन-खानेसुमारीच्या परिस्थितीशी लेखनाला जोडतात. त्यांनी मिळविलेल्या आकडेवारीनुसार १९५८ सालातील सर्वेक्षणात ७२ टक्के अमेरिकी नागरिक आपल्या घरापरिसरातील पुस्तक दुकानांतून ग्रंथखरेदी करत. देशाच्या जनगणना कार्यालयात असलेल्या १९९३ च्या नोंदींनुसार अमेरिकेतील पुस्तक दुकानांची संख्या १३ हजार ४९९ इतकी होती. म्हणजे १९ हजार २५३ नागरिकांमागे एक पुस्तकालय. २०२१ च्या तपशिलांनुसार तीन दशकांत अमेरिकेतील पुस्तक दुकानांची संख्या ५,५९१ इतकी आहे. कुणालाही ही प्रचंड मोठी घसरण वाटत असली. तरी अॅमेझॉनोत्तर काळातही पुस्तकदालने इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे टिकून आहेत, याचे कौतुक. कारण न्यू यॉर्क असो किंवा न्यू मेक्सिको किंवा जगातील कुठलीही प्रगत राष्ट्रांतील वाचनपुष्ट परिसरातील पुस्तक दुकाने अॅमेझॉननी संपवली. तरीही अमेरिकेत ५९ हजार, २८३ नागरिकांमागे एक पुस्तक दुकान आहे. हे खऱ्याखुऱ्या ‘वाचन संस्कृती’ नामे प्रवृत्तीच्या आसऱ्यामुळे.
हेही वाचा >>> संविधानभान: संसदीय कामकाजाचे स्वरूप
तुलना करायला गेलो तर आपल्या महाराष्ट्राच्या ११ ते १२ कोटी मराठी जनसमुदायासाठी राज्यभर चाळीस पन्नास मराठी ललित पुस्तकांच्या दुकानांपलीकडे गणना जात नाही. भागाकार केला तर लक्षात येईल की, विकासाच्या कितीही वल्गना आणि देखावे आपण उभारीत राहिलो, तरी पुस्तक दुकानांची, वैचारिक खाद्यापोयांची संख्या आटत-आटत चालल्याचे कुणालाही दु:ख राहिलेले नाही. परिस्थिती इतकी बिकट की काही २० ते ३० लाख जनसमुदायाच्या क्षेत्रातही मराठी ललित पुस्तकांचे दुकान शोधून सापडणार नाही.
या विचारगरिबी दर्शनानंतर पुन्हा अमेरिकी पुस्तकांच्या इव्हान फ्रिसकृत इतिहासाकडे डोकावूया. पुस्तकाचा आरंभ होतो ‘थ्री लाईव्ह्ज अॅण्ड कंपनी’ या न्यू यॉर्कच्या वेस्ट व्हिलेजमधील दुकानापासून. ६५० चौरस फुटांचे हे दुकान. चित्रग्रंथ, पाककृती, इतिहास, कवितासंग्रह आदी पुस्तके दालनाच्या पाठमोऱ्या भागात तर चर्चेतील ताजी कथा-कादंबऱ्या आणि अकथनात्मक पुस्तके दर्शनीय भागात. या ग्रंथदालनात येणाऱ्या नित्यग्राहकांची माळच इव्हान फ्रिस याला पाठ झाली होती. त्याचे कारण लग्नाआधी सलग आठ वर्षे त्याची पत्नी या दुकानात कामाला होती.
लेखन आणि कामाचा आळसगंड आल्याने नवी पुस्तके लिहिण्याचे थांबलेले संपादक-लेखक, हाताला लागणाऱ्या कोणत्याही पुस्तकातील शब्दांची जुळवणी करण्याचा छंद लागलेला ब्रॉडवेवरचा संगीतकार, स्वप्रकाशित आत्मचरित्राच्या प्रती दिसणाऱ्या वाचकांसमोर विकत घेण्याची आर्जवे करणारा लेखक, कुत्र्यांसह फेरफटका मारायला जाताना स्वत:ला आणि कुर्त्यांनाही पुस्तकांवर नजरफेरफटका लावणारे लोक. याशिवाय भावा-बहिणीला वाढदिवसाला कोणते पुस्तक द्यावे, आजारी आजीने कोणते पुस्तक वाचावे असा सल्ला तिथली परमोच्च वाचन-जाणकार मरियम हिला विचारणारे सामान्य पुस्तकप्रेमी. येणाऱ्या प्रश्नांवर काहीच मिनिटांत पुस्तक सादर करणाऱ्या मरियमवर साऱ्यांचा पूूर्ण विश्वास. तिने दिलेले पुस्तक हे वाचकापेक्षितच असणार याचा. गर्टूड स्टाइन या अमेरिकी लेखकाच्या ‘थ्री लाईव्ह्ज’ या कादंबरीच्या नावावरून बेतलेले हे पुस्तकाचे छोटे दुकान आणि त्यातील कर्मचारी तसेच वाचक-ग्राहक एका कुटुंबासारखे कसे आहे, त्याचा आलेख फ्रिस यांनी पुस्तकाच्या उपोद्घातात काढला आहे. त्यांची पत्नी अमांडा ही प्रेयसी असल्याच्या काळापासून इथल्या रोजच्या जिवंत वाचक कहाण्या ऐकवत असल्याने एका कुतूहलटोकानंतर फ्रिस यांच्या डोक्यात अमेरिकी पुस्तकदालनांचा इतिहासच खोदायची कल्पना उतरली. ज्या दिवशी फ्रिस यांचे लग्न झाले त्या दिवशी ‘थ्री लाईव्ह्ज अॅण्ड कंपनी’ने अर्ध्या दिवसानंतर ‘अमांडा’ज गेटिंग मॅरिड’ची पाटी बाहेर लावून दुकान बंद ठेवले. तेव्हा लग्नकार्यालयात शुभेच्छादानासाठी आलेली दुकानातील नित्यग्राहकाची उपस्थिती पाहून फ्रिस यांनी आपला शोधप्रवास सुरू केला.
बेंजामिन फ्रँकलिन यांच्या फिलाडेल्फिया येथील अठराव्या शतकातील ‘प्रिंट शॉप’पासून ते प्रसिद्ध लेखिका अॅन पॅचेट यांच्या नॅशव्हिल येथील पर्नासस बुकशॉपपर्यंत, अशा साऱ्या ग्रंथदालनांचा इतिहास या पुस्तकात रसाळ तपशिलांसह मांडला. बॉस्टन, शिकागो, सनफ्रान्सिस्को, लॉस एंजलिस, वॉशिंग्टन, मियामी आदी शहरांतली सारी ग्रंथदालने कशी उभारली गेली, त्यांचा विकास कसा झाला, काही ग्रंथदालनांचा ऱ्हास कसा झाला या सगळ्याचा संशोधनातून उभारलेला हा ऐवज आहे.
बेंजामिन फ्रँकलिन हा अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या लढ्यातील एक शिलेदार, विजेबाबतचा संशोधक म्हणून येथे उभा राहत नाही. त्याने उभारलेले पहिले पुस्तकालय, त्याची वाचन असोशी, पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे कमी पडत असताना शाकाहाराचा अवलंब आदी तपशिलांनी त्याचे शब्दचित्र समोर येते. पुस्तकनिर्माता, लेखक, पोस्टमास्तर आदी कामे करताना त्याचा दिनक्रम, दिवसाच्या इतर व्यवधानांमधूनही वाचनासाठी-लिखाणासाठी केली जाणारी वेळचोरी यांची माहिती, बायकोकडे दुकानाची जबाबदारी सोपवून केली जाणारी उंडगेगिरी अधिक ठळक दिसते. सतराशे अमुक-तमुक वर्षी सुरू झालेली अमेरिकी पुस्तकदालनांची कहाणी ‘ओल्ड कॉर्नर बुकस्टोअर’ (बॉस्टन), ‘पर्नासस’ (नॅशव्हील), ‘मार्शल फिल्ड’ (शिकागो), ‘गॉथम बुक मार्ट (मॅनहटन), ‘स्ट्रॅण्ड बुक स्टोर’(मॅनहॅटन), ‘आर्यन बुकस्टोअर’ (वॉशिंग्टन व कॅलिफोर्निया), ‘ऑस्कर वाईल्ड बुकशॉप (न्यू यॉर्क), ‘ड्रम अॅण्ड स्पिअर बुकस्टोअर’ (वॉशिंग्टन), ‘बार्न्स अॅण्ड नोबल’ (न्यू यॉर्क आणि इतर शहरे), ‘अॅमेझॉन बुकस्टोअर’ (वॉशिंग्टन) पर्यंत चालते. स्वातंत्र्ययुद्धाच्या आधीच्या मागास, आदिम अवस्थेपासून पुस्तकाच्या दुकानांच्या भरभराटीसह समृद्ध होत गेलेल्या अमेरिकेचा इतिहास येथे वाचायला मिळतो. नाझींच्या विचारप्रचारार्थ निघालेल्या वातावरणातील ‘आर्यन बुक्स’च्या जन्मापासून ते अमेरिकेतील कृष्णवंशीयांच्या साहित्याला एकत्र आणणाऱ्या ‘ड्रम अॅण्ड स्पिअर बुकस्टोअर’ची कूळकथा वाचताना ‘वाचन संस्कृती’ ही शब्दमाळ सरसकट उच्चारणारे आपण अद्याप त्याच्या अर्थाच्याही जवळपास किती नाही, याची कल्पना येते. बरे इतके वाचले जात असताना आणि वाचक असताना, साऱ्या खंडांत अमेरिकी साहित्याची निर्यात होत असतानाही पुस्तकांची दुकाने कमी होत आहेत, याची खंत इव्हान फ्रिस यांना आहे. पुस्तक दुकाने ‘लुप्त होण्याच्या वाटेवरली प्रजाती’ असल्याचे ते अधोरेखित करतात.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बेंजामिन फ्रँकलिनचे लंडनमध्ये जाऊन काही वर्षे पुस्तकांच्या दुकानात काम करणे, तिथून पैसा उभारून अमेरिकेत परतल्यानंतर ‘प्रिंट शॉप’ उघडणे याबाबतच्या अज्ञात तपशिलासह वसाहतवाद्यांच्या पुस्तकांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘बुकशॉप’ या शब्दाचे ‘बुकस्टोअर’ हे नामकरण कधी, कुणी केले? पुस्तक विक्रीसह पहिल्यांदा दुकानात ‘कॉफी आणि बरेच काही’ ठेवण्याची प्रथा कधीपासून झाली? अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धाच्या ऐन धुमाकुळात (बोस्टन टी पार्टी वगैरे) वसाहतवादी पुस्तक दुकानांच्या मालकांचे काय झाले? साठच्या दशकात कामगार वर्गाचे साहित्य प्रसिद्ध करणाऱ्या कृष्णवंशीयांच्या पुस्तकांचे भांडार कसे उघडले गेले? दुकानात येणाऱ्या प्रत्येक वाचकाला ‘हेऽ सिस्टर, हेऽ ब्रदर’संबोधणाऱ्या कर्मचाऱ्यांची परंपरा राखणारी दुकानांची साखळी कुठे गेली, शंभर डॉलरइतक्या गुंतवणुकीतून अमेरिकेतील नामांकित ग्रंथदालन कसे घडले, अॅमेझॉन या आता पुस्तक विक्रीत अजिंक्य ठरलेल्या यंत्रणेची भरभराट कशी झाली, पत्रकार, लेखक, अभिनेते आणि विविध क्षेत्रांत गाजलेल्या व्यक्तींची ते कुणीही नसताना कोणकोणत्या पुस्तक दुकानांत कशी खरेदी चाले, याच्या अचंबित करणाऱ्या गोष्टी यात आहेत. ‘बुक्स ऑन बुक्स’ या प्रकाराचा पैस आणखी वाढविणारा हा ग्रंथ गेल्या मंगळवारी प्रकाशित झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांतच नॅशनल बेस्ट सेलर ठरला आहे.
गेल्या दोन-तीन दशकांत वाचकांच्या तुटवड्यामुळे एकमागोमाग बंद होत असलेली वाचनालये, शहरांतील मोक्याच्या जागी विक्रीतील तोट्यांमुळे संपत चाललेली पुस्तक दालने, हे आपल्याकडचे चित्र. इव्हान फ्रिस यांच्या निकषांनुसार जर याचा विचार केला तर माध्यमांतून सतत चालणाऱ्या देखावारूपी विकास-वल्गना किती अधोगतीप्रवण आहेत, याची कल्पना येऊ शकेल.
इव्हान फ्रिस यांचे ‘बुकशॉप : ए हिस्ट्री ऑफ द अमेरिकन बुकस्टोअर’ हे पुस्तक भारतात अद्याप अधिकृतपणे उपलब्ध झालेले नाही. pankaj.bhosale@expressindia.com