अमेरिकेतल्या ओहायो राज्यात राहणार्‍या एका चौदा वर्षांच्या मुलाने २०२४च्या फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या केली. त्याला या आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता तो डेनेरीस टारगेरीयनवर. ही डेनेरीस अर्थातच ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधली प्रसिद्ध व्यक्तिरेखा नव्हती, पण ती कोणी जिवंत मुलगीही नव्हती. हा होता एक एआय पॉवर्ड चॅटबॉट, ‘कॅरेक्टर.एआय’ या कंपनीने केलेला. किंवा दुसर्‍या शब्दांत सांगायचं, तर हा होता एक एआय कंपॅनिअन, सांगू ते रूप घेऊ शकणारा.

या मुलासाठी हे रूप होतं जिवाभावाच्या मैत्रिणीचं, त्याच्याशी रोज बोलणारी, गप्पा मारणारी, सल्ले देणारी मैत्रीण. डेनेरीस किंवा डेनी, हे तिचं नामकरणही त्यानेच केलं होतं. त्याची आई मेगन गार्शिआ हिला त्याच्या आत्महत्येनंतर लक्षात आलं की आपला मुलगा या बॉटच्या आहारी गेला होता, त्याचं नैराश्य वाढवण्यासाठी आणि त्याच्या आत्मघातकी विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी ही त्याची एआय मैत्रीण जबाबदार आहे. तिने ताबडतोब कॅरेक्टर.एआय आणि त्यांच्यासोबत लायसेन्सिंग डील करणारी गूगल, यांना कोर्टात खेचलं. मायकल कॉनलीच्या ‘लिंकन लॉयर’ मालिकेतील कादंबरी ‘द प्रूव्हिंग ग्राउंड’, ज्या सत्य घटनांवर आधारित आहे, त्यातली ही एक.

आजच्या काळात मुलांचं कोशात जाणं, बरोबरीच्या मुलांशी प्रत्यक्ष संपर्क कमी होणं आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससमोर बसून राहण्यात झालेली वाढ, ही आपल्याकडेही काही प्रमाणात काळजीची गोष्ट झाली आहे. विशेषत: कोविडकाळापासून तर अशा समस्यांमध्ये भर पडलेली दिसते. या एकट्या मुलांना सोबत म्हणून एआय कंपॅनियनची व्यवस्था करणारी ॲप्स ही नव्या जीवनशैलीचा भाग होऊ लागली आहेत. जिवंत व्यक्तींशी बोलत असल्याचा आभास तयार करणारं यंत्र ही कल्पना फार नवी नाही.

तिचा इतिहास पाहायचा तर आपण ५०-६० वर्षं मागे जाऊ शकतो. मात्र हा आभास खर्‍यासारखा वाटावा असं तंत्रज्ञान आता उपलब्ध होत आहे. सध्याच्या काळात, जेव्हा आपला जगाबरोबरचा संपर्क हा प्रामुख्याने फोन, कम्प्युटर्स यांमधूनच होत असतो, तेव्हा संपर्कासाठी हेच मार्ग वापरणारा चॅटबॉट खर्‍या मित्र-मैत्रिणीची जागा घेऊ लागला, तर आश्चर्य ते काय! आणि धोका आहे तो इथेच. एआय तंत्रज्ञान नक्की काय करू शकतं, कसं वागू शकतं, ते किती पुढे गेलं आहे, आपल्या नीतिमत्तेच्या कल्पना एआयच्या कृत्रिम मेंदूला समजतात की नाही, याची आपल्याला अजून पूर्ण कल्पनाच आलेली नाही.

मोठ्या संगणक कंपन्याही हे सारं जाणून घेण्यासाठी अजून धडपडत आहेत, पण त्यासाठी त्या वेळ मात्र देऊ इच्छित नाहीत. तो दिला तर नवं मार्केट काबीज करण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत आपण मागे पडू असं त्यांना वाटत आहे. या पुढे जाण्याच्या घाईत त्यांनी नियम थोडे डावलणं, शॉर्टकट घेणं, नफ्याला सदसद्विवेकबुद्धीच्या पुढे ठेवणं, हे खरंच कल्पनेपलीकडचं आहे का?

मायकल कॉनली हा क्राइम फिक्शन लिहिणारा मोठा लेखक आहे. ज्यांचं साहित्य केवळ विरंगुळ्यापुरतं न राहता आपल्या मनात दीर्घकाळ रेंगाळतं त्यातलं हे एक नाव म्हणावं लागेल. क्राइम फिक्शन हा त्याचा प्रांत असला, तरी या साहित्यप्रकाराच्या मर्यादा कॉनलीला कधीच अडचणीच्या ठरलेल्या नाहीत.

कॉनली मूळचा क्राइम बीटवरचा पत्रकार होता आणि त्या दिवसांतल्या त्याच्या अनुभवांचा आधार तर त्याच्या लेखनाला असतोच, पण आपला भवताल कसा बदलत आहे याची एक जाण त्याच्या लेखनात सतत दिसते. लॉस एंजेलिसमध्ये घडणार्‍या घटना, राजकारण, भ्रष्टाचार, वर्णद्वेषसारख्या सामाजिक समस्या, हे सारं त्याच्या लेखनात डोकावतं. हे वास्तवदर्शन त्याच्या साहित्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे एआयच्या वाढत्या प्रभावासारखा विषय त्याच्या लेखनातून आला तर त्यात आश्चर्य नाही. तो ‘लिंकन लॉयर’ मालिकेत आल्याने त्याची हाताळणी कशी असेल याबद्दल थोडं विचारात मात्र पडायला झालं. तसं होण्याला कारण आहे.

मायकल कॉनलीने आपल्या लेखनाची सुरुवात हायरॉनिमस ऊर्फ हॅरी बॉश ही पोलीस डिटेक्टिव व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असलेल्या ‘द ब्लॅक एको’ (१९९२) या कादंबरीपासून केली. ही त्याची सर्वात प्रसिद्ध व्यक्तिरेखा आहे. १६व्या शतकात गडद सररिअल चित्र काढणार्‍या डच चित्रकाराशी नामसाधर्म्य असलेल्या हॅरी बॉशचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही त्या चित्रकारासारखाच गडद आहे. बॉशची नॉव्हेल्स ही एका रहस्यभेदाला बरोबर घेऊन पुढे सरकतात.  पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे बॉशच्या आयुष्यात आपण डोकावून पाहात असल्याचा भास ती निर्माण करतात. त्याच्या कौटुंबिक अडचणी, त्याला पडणारे नैतिक प्रश्न, त्याच्या व्यावसायिक आयुष्यातले चढउतार, अशा अनेक गोष्टींमधून बॉश सीरिजचा वाचक त्याच्या आयुष्याचा साक्षीदार आणि बॉशचा हितचिंतक झालेला आहे.

कॉनली जसा पुढे लिहित गेला तशी काही महत्त्वाची पात्रं बॉशच्या जगाशी जोडली गेली. त्यांचा संदर्भ बॉशच्या कादंबर्‍यात येत राहिला, तरी त्यातल्या काहींभोवती स्वतंत्र कादंबर्‍या लिहिल्या गेल्या. बॉशचा सावत्र भाऊ मिकी हॉलर ऊर्फ ‘लिंकन लॉयर’ हे असंच एक पात्र. मिकी हॉलर हा मूळचा गुन्हेगारी खटल्यात आरोपीची केस लढवणारा निष्णात वकील. तो सुरुवातीच्या काळात लिंकन गाड्यांचा वापर आपल्या ऑफिससारखा करत असल्याने त्याला पडलेलं ‘लिंकन लॉयर’ हे टोपण नाव.

मिकी हॉलरवर केंद्रित झालेल्या कादंबर्‍यांची कथनशैली बॉश मुख्य पात्र असलेल्या कादंबर्‍यांपेक्षा थोडी वेगळी आहे. बॉश गुन्ह्याचा प्रत्यक्ष तपास करतो, तर मिकीच्या कादंबर्‍या कोर्टरूम्सभोवती फिरतात हा एक मांडणीतला फरक. पण त्याहून महत्त्वाचं आहे, ते त्यात रहस्याला महत्त्व. मिकीच्या कादंबर्‍यांना थ्रिलर म्हणणं शक्य आहे, जे बॉशच्या कादंबर्‍यांना पूर्णत: लागू नाही. मात्र या पारंपरिक पद्धतीच्या थ्रिलर लिखाणाला कॉनली किंचित कंटाळला असावा, कारण मिकीच्या ‘रेजरेक्शन वॉक’ या सातव्या कादंबरीत कॉनलीने त्याला आत्मपरीक्षण करायला लावलं आणि गुन्हेगारी खटले सोडून चक्क सिव्हिल कोर्टात ट्रायल लढण्यासाठी पटवलं. ‘द प्रूव्हिंग ग्राउंड’ या आकस्मिक हृदयपरिवर्तनानंतरची पहिली कादंबरी. ती वाचताना हा बदललेला पोत आपल्याला जाणवतो.

एक गोष्ट मात्र पूर्वीसारखीच आहे. हे कथानकदेखील त्याच्या इतर कादंबर्‍यांप्रमाणेच ‘डेव्हिड वर्सेस गोलायथ’ ही रचना ठेवतं. आधीप्रमाणेच इथेही छोटीशी प्रॅक्टिस असलेल्या मिकीचा सामना बलाढ्य खलनायकाशी होतो. इथे खलनायक आहे, ती ‘टायडलवेव्ह’ ही एआय क्षेत्रातली निष्णात कंपनी. टायडलवेव्हने बनवलेल्या एआय कंपॅनिअनच्या सांगण्यावरून एका मुलाने आपल्या मैत्रिणीची हत्या केली आहे. मिकी हॉलर केस लढतोय त्या कंपनीविरुद्ध आणि दोन्ही बाजूंच्या पालकांच्या वतीने. कारण गुन्हा जरी मुलाच्या हातून घडला असला, तरी त्याची खरी जबाबदारी चॅटबॉट बनवणार्‍या कंपनीचीच आहे, असं पालकांचं म्हणणं आहे.

कॉनलीच्या कादंबरीविश्वातलं आणखी एक महत्त्वाचं पात्र इथे हजेरी लावतं, ते म्हणजे पत्रकार जॅक मॅकअव्हॉय. तंत्रज्ञानातून जी नवी आव्हानं आणि संभाव्य धोके निर्माण होतात, त्यांच्याबद्दलच्या संशोधनात जॅकला रस आहे. एआयशी अगदीच अपरिचित असलेल्या मिकीपुढे तो मदतीचा हात करतो.  जॅक मॅकअव्हॉयचा बॉश युनिवर्समधला वावर जुना आहे. कॉनलीने जेव्हा बॉशची व्यक्तिरेखा नसलेली पहिली कादंबरी ‘द पोएट’ लिहिली तेव्हा तिचा नायक जॅक होता. पुढे त्याची बॉशशीदेखील गाठ पडली. मिकीला मात्र तो इथे प्रथमच भेटतो आहे. या गोष्टीमुळे कॉनलीच्या नियमित वाचकांसाठी या कादंबरीचं वेगळं महत्त्व आहे. महत्त्व आहे, ते अर्थातच मिकीच्या आत्मपरीक्षणानंतर बदललेला कादंबरीचा पोत.

मिकीच्या कादंबर्‍या पूर्वीपासून गतिमान होत्या. रहस्यांतली गुंतागुंत आणि वेळोवेळी बसत जाणारे धक्के, ही गोष्ट त्यांच्यासाठी नेहमीची होती. त्यामुळे त्या थोड्या हलक्याफुलक्या, रंजक साहित्याशी जोडलेल्या वाटत. साहजिकच मिकी आणि बॉश यांच्या कादंबर्‍यांचे वाचक वेगवेगळे असण्याची शक्यताही त्यातून निर्माण झाली. ‘द प्रूव्हिंग ग्राउंड’ मध्ये हे बदलतं.

मुळात इथे गुन्हा कोणी केला, या प्रकारचं रहस्यच नाही. शिवाय युक्तिवाद हा वैचारिक म्हणण्यासारखा आहे. एआयला कायदेशीर चौकटीत व्यक्ती मानता येईल का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य माणसांप्रमाणे यंत्रांना लागू पडेल का? डिजिटल युगात पालकांची जबाबदारी काय असायला हवी? यंत्राने गुन्हा केला, तर त्यासाठी त्या यंत्राची निर्मिती करणारी कंपनी जबाबदार ठरू शकते का? या प्रकारचे प्रश्न या कादंबरीसाठी मध्यवर्ती आहेत. त्यामुळे लिंकन लॉयरच्या चाहत्यांसाठी हा थोडा अपरिचित प्रांत आहे. पण माझ्या मते कॉनलीने केलेला हा बदल या मालिकेतल्या कादंबर्‍यांना अधिक सशक्त करणारा आहे, जे पुढल्या काळात अधिक जाणवेल.

समकालीन तंत्रज्ञानाबद्दल काहीही लिहिताना वा चित्रपटनिर्मिती करताना धोका असतो तो निर्मितीला जो काळ लागतो त्या काळात तंत्रज्ञान बदलण्याचा, वेगळ्या दिशेला जाण्याचा. असं झालं तर कादंबरी, चित्रपट कालबाह्य ठरू शकतात. ‘द प्रूव्हिंग ग्राउंड’मध्ये असा धोका जाणवत नाही, कारण त्यात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असलं, तरी प्रश्न अधिक मूलभूत स्वरूपाचे, नैतिक वळणाचे आहेत. त्यातल्या पात्रांची वृत्ती, त्यांनी उचललेली पावलं या प्रश्नांचं गांभीर्य अधोरेखित करतात. शिवाय हे तंत्रज्ञानही लिहिण्याच्या काळात बदललेलं तर नाहीच, वर त्याचा वापर अधिक प्रमाणात होत आहे.

सुरुवातीलाच उल्लेख असलेली मेगन गार्शिआने गूगल आणि कॅरॅक्टर.एआयवर केलेली, त्यांना आपल्या मुलाच्या आत्महत्येसाठी जबाबदार मानणारी केस, इतर चार केसेसबरोबर याच महिन्यात सेटल करण्यात आली. तिचे आर्थिक तपशील उघड करण्यात आले नसले, तरी कंपन्यांनी आपली जबाबदारी मान्य केली आहे. पुढे या क्षेत्रात काम करताना आपण अधिक काळजी घेणार असल्याचं आणि या प्रयत्नात मेगन गार्शिआ आणि इतर कुटुंबांनाही सहभागी करून घेणार असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. या सेटलमेन्टआधी काही महिने प्रकाशित झालेली मायकल कॉनलीची ‘द प्रूव्हिंग ग्राउंड’ अगदीच कालसुसंगत ठरली आहे. कॉनलीने उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे ठरले आहेत. येऊ घातलेल्या दिवसांची, ही एक विदारक नांदीच मानावी लागेल.

द प्रूव्हिंग ग्राउंड

लेखक – मायकल कॉनली

प्रकाशक – ओरियन

पृष्ठे  – ३८४

किंमत – ५५४ रु. 

ganesh.matkari@gmail.com