‘विशेष संरक्षण गट कायद्याचा १९८८-८९ (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अॅक्ट- एसपीजी) मसुदा तयार करताना माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ही सुरक्षा देण्याची तरतूद करावी, असा सल्ला मी राजीव गांधी यांना दिला होता, मात्र त्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला..’ माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे ‘थ्रू द ब्रोकन ग्लास’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्यात असे अनेक किस्से उद्धृत करण्यात आले आहेत. एका कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचे आयुष्य किती आव्हानांनी व्यापलेले असते, याची जाणीव करून देणारे हे पुस्तक आहे.
‘पदावरून पायउतार झाल्यानंतरही तुमच्या जिवाला धोका असू शकतो याची कल्पना राजीव गांधींना देण्यात आली होती. शिवाय अमेरिकेतही माजी पंतप्रधानांना एफबीआयकडून संरक्षण देण्यात येत असल्याचे उदाहरण देण्यात आले होते, मात्र तरीही त्यांनी असे संरक्षण देण्याची तरतूद करण्यास नकार दर्शवला होता,’ अशी आठवण शेषन यांनी नमूद केली आहे. शेषन हे त्या वेळी पंतप्रधान सुरक्षा विभागाचे प्रमुख होते. ‘अशी तरतूद केल्यास मी स्वार्थी आहे, असे जनतेला वाटेल. केवळ विद्यमान पंतप्रधानांना संरक्षण देणे पुरेसे आहे,’ असे सांगून राजीव गांधी आपल्या मतावर ठाम राहिल्याचे शेषन यांनी म्हटले आहे. ‘पुढे त्यांना या निर्णयाचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागले,’ हीदेखील शेषन यांचीच स्पष्टोक्ती. राजीव गांधींचे एसपीजी संरक्षण काढून घेतल्याबद्दल काँग्रेस नेहमीच व्ही. पी. सिंग सरकारला जबाबदार धरत आली आहे. ‘व्ही. पी. सिंग यांनी पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर १९८९ रोजी एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यात राजीव गांधी यांची सुरक्षा कायम ठेवावी की नाही, या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली होती. त्या वेळी सिंग यांचे कॅबिनेट सचिव म्हणून मी तत्कालीन सरकारला राजीव गांधींचे संरक्षण कायम ठेवण्याचा सल्ला दिला होता, मात्र माझा सल्ला फेटाळण्यात आला,’ असेही शेषन यांनी आत्मचरित्रात स्पष्ट केले आहे.
‘राष्ट्रपतींच्या आदेशाने कायद्यात सुधारणा करता येऊ शकते, असे मी सुचविले होते. मी डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत कॅबिनेट सचिवपदी होतो. या कालावधीत या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. माझी बदली झाल्यानंतर राजीव गांधींचे एसपीजी संरक्षण काढून घेण्यात आले,’ असे या (आत्म)चरित्रात नमूद करण्यात आले आहे.
अतिशय अभ्यासू, करारी आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेषन यांचा राशिभविष्य आणि पंचांगावर विश्वास होता, हे वाचून आश्चर्य वाटते. त्यांचा या विषयाचा अभ्यासही होता, याचे दाखले या आत्मचरित्रात मिळतात. राजीव गांधी यांचा अकाली मृत्यू होईल, हे आपल्याला आधीच समजले होते. १० मे १९९१ रोजी आपण राजीव गांधींची भेट घेऊन संरक्षण न घेता असा खुलेआम प्रचार करणे धोक्याचे असल्याचा सल्ला दिला होता. कांचिपुरम शंकर मठाकडून वर्तवण्यात आलेल्या भविष्याच्या आधारे धोक्याचा इशारा देणारा एक फॅक्स संदेशही राजीव गांधी यांना १७ मे १९९१ रोजी पाठविला होता, मात्र तो त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही आणि २१ मे १९९१ रोजी त्यांची हत्या झाली, अशा आठवणीही शेषन यांनी या पुस्तकात लिहिल्या आहेत.
कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना आलेले शेख अब्दुल्ला यांच्याविषयीचे अनुभवही यात आहेत. १९६५ साली अब्दुल्ला यांना ‘देशविरोधी कारवाया’ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. जुलै १९६५ ते जून १९६७ या कालावधीत अब्दुल्ला कोडाईकॅनल येथे शेषन यांच्या स्थानबद्धतेत होते. त्या काळात उद्भवलेल्या काही वादाच्या प्रसंगांचा उल्लेख या आत्मचरित्रात आहे. एकदा अब्दुल्ला यांनी शेषन यांचा उल्लेख एक सामान्य कलेक्टर असा केला. त्यावर शेषन यांनी त्वरित काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर दोनच दिवसांत पावसात अब्दुल्ला यांनी छत्रीची मागणी केली. त्यावर शेषन यांनी ‘मला ही विनंती पत्र लिहून पुढे पाठवावी लागेल’, असे उत्तर दिले. त्यावर एका साध्या छत्रीसाठी तुम्हाला पत्र पाठवावे लागते का, असा प्रश्न अब्दुल्लांनी विचारला असता, हो, ‘मी साधा कलेक्टर आहे,’ असे उत्तर देत शेषन यांनी अब्दुल्ला यांच्या टीकेची परतफेड केली.
अब्दुल्ला यांची सर्व पत्रे वाचूनच पुढे पाठविण्याचा आदेश शेषन यांना देण्यात आला होता. एकदा अब्दुल्लांनी राष्ट्रपतींना लिहिलेले पत्र न वाचता पुढे पाठविण्याची विनंती केली. ती शेषन यांनी फेटाळली. त्यावर अब्दुल्लांनी याच्या निषेधार्थ मी आमरण उपोषण करेन, असा इशारा दिला. त्यावर शेषन यांचे उत्तर होते, ‘मी तुमच्या उपोषणासाठी आवश्यक ती सर्व तयारी करेन.’ अशा अनेक प्रसंगांतून एक करारी, निर्भय अधिकारी दिसतो.
२०१९ च्या हिवाळय़ात शेषन यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांचे हे आत्मचरित्र कच्च्या खडर्य़ाच्या स्वरूपात होते. शेषन यांचे एके काळचे संशोधन साहाय्यक निक्सन फर्नाडो, पुण्यातील एमआयटी-डब्ल्यूपीयूचे डॉ. विश्वनाथ कराड आणि राहुल कराड आणि नारायणीयम संस्थेने त्याला पुस्तकाचे स्वरूप दिले. निवडणुकीत कायदे कसे धाब्यावर बसवले जाऊ शकतात आणि अशा गैरप्रकारांना लगाम घालण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याविषयीचे आजच्या काळात अत्यंत आवश्यक असलेले मार्गदर्शन या पुस्तकात आहे. पुस्तकाच्या शेवटी शेषन यांनी अगदी मोजक्या शब्दांत स्वत:च्या आयुष्याचे वर्णन केले आहे. ते म्हणतात- ‘माझे आयुष्य भारी होते- वादळी होते पण भारी होते!’ त्या वादळांची प्रचीती पुस्तकात पानोपानी येते.
‘रूपा पब्लिकेशन्स’च्या या ३६८ पानी पुस्तकाची (पुठ्ठा बांधणी) किंमत आहे ७९५ रुपये.