अज्ञाताचा शोध घेण्याची प्रेरणा माणसाला कुठून आणि कशी मिळते? या शोध प्रक्रियेत अवकाश मोहिमांची नेमकी भूमिका आणि महत्त्व काय? सामान्य माणसांना याचा उपयोग काय?

असे अनेक प्रश्न सर्वसामान्यपणे माणसांना पडत असतात. व्यक्तिश: मी जेव्हा जेव्हा या प्रश्नांपाशी थबकते आणि उत्तरं शोधू पाहते, तेव्हा तेव्हा हे प्रश्न मला रूढार्थाने प्रसिद्ध असणाऱ्या पाठ्यपुस्तकी व्याख्या आणि विचारांच्या पलीकडे घेऊन जातात. आजवरच्या माझ्या अनुभवांवरून, संवादांमधून आणि चिंतनातून मला जाणवलेली गोष्ट पुन:पुन्हा अधोरेखित होत राहते. अवकाश ही केवळ एक अमर्याद अज्ञात निर्वात पोकळी नाहीच. तो त्याही पलीकडे जाऊन एक समृद्ध करणारा बहुआयामी अनुभव आहे. आपल्या पृथ्वीविषयी, आपल्या जीवनाविषयी, विश्वातील आपल्या स्थानाविषयी आपले कुतूहल वृद्धिंगत करणारा आणि आपल्या पृथ्वीविषयीचे आपले प्रेम नव्याने कृतज्ञतापूर्वक रुजवणारा एक सर्वांगसुंदर अनुभव!

Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
Best American Short Stories O Henry Prize Stories author book
बुकबातमी: कथेतला ‘तृतीयपुरुष’ हरवला आहे?
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!

समांथा हार्वे या इंग्रजी लेखिकेची ‘ऑर्बिटल’ ही कादंबरी म्हणजे अशाच एका अवकाशप्रवासाला निघालेल्या सहा अवकाशयात्रींच्या अंतर्बाह्य बदल घडवून आणणाऱ्या साक्षात्कारी प्रवासाची कहाणी. दोन रशियन कॉस्मोनॉट्स व विविध देशांमधील ४ अॅस्ट्रोनॉट्स, ९ महिन्यांच्या या मोहिमेसाठी अवकाश स्थानकात मुक्कामी असतात. ही कादंबरी म्हणजे या मोहिमेतील ८८ व्या दिवसाचा इतिवृत्तान्त. २४ तासांत पृथ्वीभोवती १६ प्रदक्षिणा ते घालतात. घड्याळी २४ तासांच्या अवधीत त्यांनी अनुभवलेल्या प्रत्येकी १६ सूर्योदय आणि १६ सूर्यास्तांची, त्या प्रत्येक प्रदक्षिणेसोबत होणाऱ्या साक्षात्कारांची आणि जाणिवांची ही कहाणी.

या कथेतील २ स्त्री व ४ पुरुष अवकाशयात्री हे अखंड मानवजातीचे प्रतिनिधित्व करत असताना आपापलं वेगळेपणसुद्धा जपतात. त्यांच्या अनुभवातून कधी या अमर्याद अवकाशाच्या विस्तृत पटलासमोर आपलं अस्तित्व नगण्य आहे अशी जाणीव त्यांना होते तर कधी आपण फार खास आहोत अशी भावनाही दाटून येते. या मोहिमेतील प्रत्येक अवकाशयात्रीचं महत्त्व सांगताना लेखिका शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांशी त्यांची तुलना करते. शरीर नावाचं यंत्र सुरळीत चालण्यासाठी या अवयवांमध्ये जशी सुसूत्रता आणि लय असणं आवश्यक असतं तशी एकरूपता या अवकाशयात्रींमध्ये असणं आवश्यक आहे हे सांगताना एकाच ध्येयाने झपाटलेल्या पण तरी आपल्या वेगवेगळ्या भूमिका निभावणाऱ्या या साऱ्यांचं वर्णन करताना लेखिकेने अँटोनला दिलेली अवकाशयानाच्या हृदयाची, पीएट्रोला मेंदूची, रोमनला हातांची, शॉनला आत्म्याची, चिएला दिलेली विवेकाची आणि नेलला दिलेली श्वासाची उपमा किती चोख आहे हे कथा वाचत असताना जाणवल्याशिवाय राहत नाही.

तुम्ही कधी अवकाशयात्रींना भेटला आहात? त्यांना त्यांच्या अवकाशातील अनुभवांविषयी मंत्रमुग्ध होऊन बोलताना ऐकलं आहे? मी अनुभवलं आहे हे. अनेकवार. आणि कदाचित त्यामुळेच हा अनुभव मला वेगळा वाटला. आपलासा वाटला. अस्सल वाटला. समांथाच्या लेखणीचं वैशिष्ट्य असं की ती अवकाशयात्रींचा अनुभव शब्दबद्ध करताना इतक्या बारकाव्यांनिशी लिहिते की तिने स्वत:च हा अनुभव याचि देही याचि डोळा घेतला आहे असं वाटतं. अवकाशातले, यानातले, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातले अनुभव ती ज्या बारकाव्यांनिशी मांडते, अवकाशवीरांच्या भावना ज्या सहजतेने उलगडते ते वाचत असताना अनेकदा आपण एक कादंबरी वाचतोय हेच विसरून जायला होतं. विज्ञानाचं, अवकाशाचं वर्णन करताना केवळ जटिल, वास्तवनिष्ठ लिखाण न करता गद्या-पद्याचा संगम साधत, कलेचे संदर्भ देत, मानवी भावनांना स्पर्श करता येतो याची ही कादंबरी एक सुरेख उदाहरण वाटते.

मोहिमेच्या सुरुवातीला आपल्या पृथ्वीवरील एकमेव कुटुंबापासून सुरू झालेला व पुढे अवकाशात शब्दांच्या पलीकडे व्यक्त न होताही भावना जाणणाऱ्या, एकसारखाच अनुभव घेणाऱ्या एका नव्या घनिष्ट परिवारापर्यंतचा अवकाशयात्रींचा प्रवास वाचताना, त्यांची चलबिचल जाणताना मला अवकाशात सर्वाधिक म्हणजे सात वेळा जाऊन येण्याचा विश्वविक्रम असणाऱ्या तसेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या उभारणीतही फार मोठा वाटा असणाऱ्या जेरी रॉस या अवकाशयात्रीशी माझ्या गप्पांची आठवण झाली. त्यावेळी त्यांनी अवकाशात जाण्याच्या अनुभवाची होस्टेलवर राहण्याच्या अनुभवासोबत केलेली तुलना मला आठवली. आमच्या संवादादरम्यान माणसाने अधिकाधिक अवकाश मोहिमा का कराव्यात हे सांगताना एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी मांडला होता. घरापासून दूर राहिल्यावर जसं आपल्याला आपल्या घराचं, परिवाराचं महत्त्व लक्षात येतं तसंच तिथे दूर अवकाशात गेल्यावर आपल्या पृथ्वीचं, इथल्या सजीवांचं आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण स्थान आपल्याला जाणवतं. आपली पृथ्वी आणि इथली सजीवसृष्टी आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे ही जाणीव दृढ होण्यासाठी अवकाश मोहिमा कराव्यात. अशा अनेक मोहिमा करत राहाव्यात. ‘स्व’च्या शोधासाठी त्या कराव्यात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं कुतूहल शमवण्यासाठी, एकूणच मानव प्रजातीच्या उन्नतीसाठी अवकाश मोहिमांना जावं. हे सांगताना घरापासून दूर होस्टेलवर आपण तयार केलेला नवा परिवार आणि त्याचं महत्त्वसुद्धा ते तेव्हा सांगत होते. गोष्टीतला इटालियन अॅस्ट्रोनॉट पीएट्रो एकदा गमतीत म्हणतो, ‘‘अवकाशयानाला फार्महाउस सारखं सजवायला हवं. सगळीकडे फुलाफुलांचे, झाडांचे वॉलपेपर लावायला हवेत.’’ त्यांचा तो संवाद मला मिखाएल कॉर्नेइंको या रशियन अवकाशयात्रीशी झालेल्या माझ्या गप्पांची आठवण करून देतो. ३४० दिवसांच्या सात देशांनी एकत्र येऊन आखलेल्या अवकाश मोहिमेवर गेलेल्या त्या अवकाशयात्रीला तिथे अवकाशात झाडांचे आणि वासाचे भास होऊ लागले होते. यावर पर्याय म्हणून त्यांनी खरंच अवकाशयानात झाडांची चित्रं लावली होती.

चिएच्या आईच्या मृत्यूची बातमी आल्यावर अवकाशयानातून दिसणारी पृथ्वी पाहून तिला आई म्हणून संबोधणारी चिए आणि पृथ्वीला आई मानणाऱ्या अवकाशयात्रींची मानसिकता लेखिका खुबीने मांडते. नुकत्याच झालेल्या स्पेस एक्सच्या पोलॅरिस डॉन मोहिमेमध्ये अवकाशात गेलेल्या अवकाशयात्रींचे त्यांच्या पृथ्वीवरील कुटुंबीयांसोबतचे संवाद आणि त्यांना आनंद देण्यासाठी कारण नसताना केलेले सोहळे, वाढदिवसाचे सेलिब्रेशन्स पाहिले होते. ही कादंबरी या अशा सोहळ्यांचं महत्त्व मार्मिकपणे सांगते. तिथल्या अवकाशातील रोजच्या कंटाळवाण्या भासू शकणाऱ्या दिनचर्येमध्ये, तिथल्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अवकाशयात्रींना सजग ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या अनेक बारकाव्यांविषयी लेखिका बोलते. कादंबरीच्या १६ प्रकरणांमध्ये लेखिका विविध आव्हानांना आणि विषयांना स्पर्श करते.

अवकाशयात्रींचे अनुभव, तिथलं वातावरण, भविष्यातील मोहिमा, अनंतयात्री अवकाश स्थानकाचे भविष्य, भविष्यातील परग्रह मोहिमा याविषयी सविस्तर माहिती देताना ती तिथून दिसणाऱ्या पृथ्वीविषयी, पृथ्वीवरील बदलत्या वातावरणाविषयी, इथल्या अनेक समस्यांचं महत्त्व अधोरेखित करत राहते. इथे होणारे हवामानातले बदल, वादळं, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक समस्यांवर लेखिका लिहिते. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे हे सारं अगदी काव्यात्म, सहजसोप्प्या, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत. सोप्प्या भाषेत केलेलं बौद्धिक लिखाण हे मला या पुस्तकाचं वैशिष्ट्य वाटतं.

इतक्या दुरून आपली पृथ्वी कितीही नगण्य दिसत असली तरी सध्या माणसाचं या ब्रह्माण्डातलं अस्तित्व केवळ त्या छोट्याशा बिंदूमुळे टिकून आहे हे विसरून चालणार नाही. तो बिंदू आहे म्हणून माणूस आहे. तो बिंदू म्हणजे आपलं घर आहे. आपण आहोत. अवकाशात अधांतरी तरंगणाऱ्या त्या इवल्याशा बिंदूपुरतेच आपले जग सीमित आहे. सध्या नजीकच्या भविष्यात त्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय आपल्याजवळ नाहीय. अवकाश विज्ञान आणि खगोलशास्त्र माणसाला नम्र करते. आणि तो लहानसा बिंदू आज आपल्याला हेच सांगतोय… एकमेकांसोबत अधिकाधिक सौहार्दाने वागण्याची आपली जबाबदारी तो अधोरेखित करतोय. सोबतच विश्वातील आपल्या या एकमेव पत्त्याची- आपल्याला ठाऊक असणाऱ्या आपल्या एकमेव घराची मनापासून काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करतोय, हे लेखिका सातत्याने सांगत राहाते. हे सांगण्यासाठी यापूर्वीच्या अवकाश मोहिमांचे संदर्भ ती फार सहज पेरते. इथे पृथ्वीवर माणूस स्वर्गाच्या कल्पना रचतो. पण अवकाशात जाऊन आलेल्या बहुतांश अवकाशयात्रींचं यावर एकमत झालेलं पाहता येतं की खरं तर आपला जन्मच एका स्वर्गात झाला आहे. आपली पृथ्वी म्हणजेच स्वर्ग आहे हा विचार ती विनासायास वाचकांमध्ये रुजवते.

हे पुस्तक केवळ अवकाशस्थानकात मुक्कामी असणाऱ्या ६ अवकाशयात्रींची किंवा चंद्राच्या दिशेने ५० वर्षांनी प्रस्थान करणाऱ्या ४ अवकाशयात्रींची, या अवकाशयात्रींना या प्रवासात भेटणाऱ्या, त्यांच्या आयुष्याचा भाग असणाऱ्या माणसांची गोष्ट नाही. या पुस्तकात जागोजागी संदर्भ आहेत. वास्तवाचं दर्शन घडवणारी गद्या/पद्या स्वगतं आहेत. हे पुस्तक एका बैठकीत बसून वाचण्यासाठी नसावं. त्यामधील काही भाग पुन:पुन्हा वाचून वाचकांनी त्यांवर मनन, चिंतन आणि विचार करणे लेखिकेला अपेक्षित असावे. रूढार्थाने कादंबरीला असतो तसा नायक, क्लायमॅक्स किंवा थक्क करणारा शेवट नाही. त्यामुळे तशी अपेक्षा ठेवून हे पुस्तक हाती घेता येणार नाही. हे एक मुक्त चिंतन आहे. आपलं पृथ्वीवरील जग आणि अवकाश याना जोडण्याचा प्रयत्न आणि अट्टहास तिथे आहे. राकेश शर्मा म्हणतात तसं, ‘‘अवकाशाचं आणि पृथ्वीचं महत्त्व जाणण्यासाठी सर्वांनी अवकाशात जाण्याची गरज नाही. आपलं प्रतिनिधित्व करणाऱ्या अवकाशयात्रींकडून, त्यांच्या अनुभवातून आपण हे शिकू शकतो.’’ अवकाशात स्वत: न जाताही या कथेच्या माध्यमातून माणसांमध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न या कथेत आहे.

नव्या दृष्टिकोनांचं स्वागत करण्याची वृत्ती रुजवण्यासाठी आणि आपल्या जाणिवांचा अवकाश आणखी विस्तारण्यासाठी वेगळा प्रयत्न असणारं हे पुस्तक नक्की वाचता येईल.

Story img Loader