‘बुकर’ हा पन्नास हजार पौंडांचा ब्रिटिश पुरस्कार मिळविणारा लेखक वा लेखिका सर्व खंडांतील वाचकविश्वात पोहोचतात. या सन्मानानंतर मान, धन आणि ओळख विस्ताराचे जागतिक पारपत्रच त्यांना मिळते. पण या पुरस्कारावर नाव गोंदविणारे फारच कमी पुन्हा तितक्याच ताकदीची कादंबरी लिहून पुरस्काराचे पुन्हा दावेदार ठरतात. याउलट खास पहिल्या पुस्तकासाठी पुरस्कार देऊन त्या लेखकाकडून आधीच्यापेक्षा अधिक चांगली ग्रंथनिर्मिती करून घेणारा पन्नास हजार डॉलरचा ‘व्हायटिंग’ पुरस्कार पट्टीच्या वाचकांसाठी बरेच वाचन-उपकार करून ठेवतो. अमेरिकेत भल्या मोठय़ा रकमेचे सरकारी पुरस्कार असताना आणि ‘कैलासवासी अमुकतमुक’ नावाच्या चावडी पुरस्कारांचीही कमतरता नसताना ‘व्हायटिंग’ पुरस्काराकडे माध्यमांचे लक्ष असते. कारण यातील निवड ही लेखनाच्या आणि कामाच्या गुणवत्तेवर अनेक कठोर निकषांवर होते. कथा, कादंबरी, कविता, अकथनात्मक लेखन, नाटक आदी १० नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाला हे पारितोषिक मिळते. नव्वदीच्या दशकातील सुरुवातीचीच नावे पाहिली तर डेनिस जॉन्सन, डेव्हिड फॉस्टर वॉलेस, जोनाथन फ्रॅन्झन, मोना सिम्प्सन, डेबोरा आयझेनबर्ग, लिडिया डेव्हिस ही सारी- पुढे अमेरिकी कथाविश्वातील दिग्गज ठरलेली- नावे आधी व्हायटिंग पुरस्काराच्या मांडवातून घडली आहेत. लेखकांना घडविणारा आणि त्यांच्या लेखन साधनेत आर्थिक अडचणी न येता दुसरे पुस्तक लिहिण्याची ऊर्जा देणारा हा पुरस्कार मुंबईवरील ‘मॅक्झिमम सिटी’ (२००४) लिहिणाऱ्या सुकेतू मेहतांना १९९६ मध्ये मिळाला होता!
अखिल शर्मा, सम्राट उपाध्याय (नेपाळी-अमेरिकी), राजीव जोसेफ ही नावानेच भारतीय असलेली आणि या पुरस्कारापर्यंत पोहोचलेली काही नावे. पण गेल्या वर्षी मेघा मुजुमदार या कोलकाता येथील लेखिकेच्या ‘अ बर्निग’ या भारतीय शहरातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या कादंबरीला व्हायटिंग पुरस्कार मिळाला होता. चौतीस वर्षीय मुजुमदार (भावी अमेरिकी) हार्वर्डमध्ये लेखनशिक्षण घेऊन आता आपला भारतीय भूमीवरचा कथापसारा आवरत आहेत. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये पहिल्यांदाच एका व्यंगचित्र आणि अर्कचित्रकाराचा समावेश आहे. न्यू यॉर्कर या साप्ताहिकाचे मुखपृष्ठ सजविणारा आर. किकुओ जॉन्सन याच्या ‘नो वन एल्स’ या चित्रकादंबरीला (ग्राफिक नॉव्हेल) पारितोषिक मिळाले आहे. तर सिदिक फोफाना (स्टोरीज फ्रॉम टिनण्ट्स डाऊनस्टेअर) , मार्सिया डग्लस (द माव्र्हलस इक्वेशन ऑफ ड्रेड), कॅरिबिअन फ्रागोझा (इट द माऊथ दॅड फिड्स यू) यांच्या पहिल्या कथात्म पुस्तकांचा गौरव करण्यात आला आहे.
व्हायटिंग पुरस्काराचे चार दशकांतील वैशिष्टय़ हे की या लेखकांच्या पुढल्या पुस्तकांना पुलित्झर, नॅशनल बुक अॅवॉर्डसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे जगातील कथासाहित्यपटल गाजविण्याची क्षमता असलेल्या या ग्रंथकर्त्यांचे पहिलटकरी साहित्य वाचणे साहित्य अद्ययावतीकरणाचा भाग म्हणून अत्यावश्यक आहे.