‘पुणे आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव’ (पीआयएलएफ) २ ते ४ डिसेंबरदरम्यान होणार असून पहिले दोन दिवस यशदामध्ये तर तिसऱ्या दिवशी पीआयएलएफच्या फेसबुक पानावर विविध सत्रे होतील. यंदा या ‘लिटफेस्ट’चे दहावे वर्ष. त्यामुळे उद्घाटन समारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आणि ‘इन्फोसिस’च्या अध्यक्ष व लेखिका सुधा मूर्ती यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवातील ८०हून अधिक सत्रांत १३०हून अधिक वक्ते सहभागी होणार आहेतच, पण तरुण आणि विद्यार्थी यांना आकर्षून घेण्यासाठी हा महोत्सव यंदाही प्रयत्न करील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 त्या दृष्टीने ‘मानसिक क्षमता आणि सक्षमीकरण’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून या विषयावर काही सत्रे होणार आहेत. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे एक ‘मिस्ट्री रूम’ तयार करण्यात येणार आहे. या रूममध्ये जाऊन एखाद्या गुप्तहेराप्रमाणे विविध कोडी सोडविण्याची मजा लुटता येईल. ३ डिसेंबरला ‘द ट्रेजर आयलंड’ या संकल्पनेअंतर्गत लहान मुलांसाठी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठ वर्षे आणि त्यापुढील वयोगटांतील मुले यात सहभागी होऊ शकतील. यात पुस्तकाचे जाहीर वाचन, कथाकथन आणि विविध कार्यशाळा असे कार्यक्रम होणार असून त्यात बालसाहित्यकार सहभागी होतील. याव्यतिरिक्त इतिहास, मिथके, ब्रँडिंग, डिजिटल साक्षरता, कलाकारांचे स्वातंत्र्य, प्रकाशन व्यवसायाची सद्य:स्थिती आणि भविष्य, बदलत्या विश्वातील शारीरिक व मानसिक आरोग्य, महिला सक्षमीकरणाचा प्रवास अशा विविध विषयांवरील मुलाखती आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bookbatmi pune litfest youth specially pune international literary festival ysh
First published on: 26-11-2022 at 00:02 IST