scorecardresearch

बुकबातमी : इच्छा विकणारी टपरी

शॉक्री हा या टपरीचा मालक आहे आणि त्याला त्याच्या वडिलांकडून कोणत्याही तीन इच्छा पूर्ण करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

bookbatmi1 shubeik lubeik book

इजिप्तमधल्या कैरोसारख्या शहराच्या गल्ली-बोळांची खास ओळख म्हणजे फुटलेले फुटपाथ, जाहिरातींनी वाट्टेल तशा रंगवलेल्या भिंती आणि त्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या टपऱ्या! शीतपेयांपासून सिगारेटपर्यंत जीव तात्पुरता का असेना, शांत करणाऱ्या वस्तू विकणाऱ्या टपऱ्या! दिना मोहम्मद या तरुण ग्राफिक आर्टिस्टला या स्वत:चे व्यक्तिमत्त्व मिरविणाऱ्या टपऱ्यांमध्ये एक चित्रकादंबरी (ग्राफिक नॉव्हेल) दिसली :  अशा एखाद्या टपरीवर इच्छापूर्ती करणारी जादूई वस्तू विकायला ठेवली असेल, तर? इच्छापूर्ती करणाऱ्या या टपरीविषयीची अरबी भाषेत प्रचंड लोकप्रिय झालेली ‘शुबैक लुबैक’ ही चित्रकादंबरी आता इंग्रजीत ‘युवर विश इज माय कमांड’ या नावाने प्रसिद्ध होणार आहे.

शॉक्री हा या टपरीचा मालक आहे आणि त्याला त्याच्या वडिलांकडून कोणत्याही तीन इच्छा पूर्ण करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. ती क्षमता तो स्वत:च्या इच्छांसाठी वापरू शकत नसल्यामुळे टपरीवर विक्रीसाठी ठेवतो आणि मग काय घडते, हे या चित्रकादंबरीतून उलगडत जाते. मांडणी कॉमिकसारखी असली, तरीही ‘शुबैक लुबैक’ इजिप्तमधील नोकरशाही, गरिबी, तिथले राजकारण, समस्या, जागतिकीकरणातून उद्भवलेला विरोधाभास अशा अनेक मूलभूत आणि गंभीर मुद्दय़ांना स्पर्श करते.

या टपरीवर आपल्या इच्छा पूर्ण करून घेऊ पाहणाऱ्यांना आधी एका लांबलचक सरकारी प्रक्रियेतून जावे लागते, त्यांच्या इच्छांना तिथे कसे ग्रहण लागते, तिथेही गरिबांच्या वाटेत किती अडथळे येतात हे वाचताना इजिप्तच्या सुस्त नोकरशाहीचे आणि समाजव्यवस्थेचे दाखले समोर येतात. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे मूलभूत गरजा भागवणे आजही दुरापास्त ठरते. पण अशा ठिकाणीही बहुराष्ट्रीय ब्रँड्सच्या चैनीच्या वस्तू मात्र सहज उपलब्ध आहेत, हे वास्तव ही चित्रकादंबरी अधोरेखित करते. मूळ चित्रकादंबरी २०१७ ते २०२१ या कालावधीत तीन भागांत शब्दश: ‘प्रसिद्ध’ झाली. मध्य पूर्वेतील कॉमिक्स लेखकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘कैरो कॉमिक्स महोत्सवात’ तिला सर्वोत्कृष्ट कॉमिकचे पारितोषिकही मिळाले होते. कथा इजिप्तच्या रंगबिरंगी टपऱ्यांवर घडत असली, तरीही त्यात मांडलेले वास्तव जागतिक आहे. त्यामुळे आता इंग्रजीत या चित्रकादंबरीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या