एम. डी. (माधवदास) नलपत हे पत्रकार, ‘मणिपाल विद्यापीठा’तील प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे भाष्यकार म्हणून परिचित आहेत. ‘७५ इयर्स ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी’ (२०२२) आणि ‘द प्रॅक्टिस ऑफ जिओपॉलिटिक्स’ (२०१४) ही त्यांची पुस्तके, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त आहेत. त्याआधी १९९९ मध्ये त्यांनी ‘इंदुत्व’ हे पुस्तक लिहिले होते आणि त्यात मुघल, युरोपीय अशा अनेक शासकांनी भारतीय भूमी आणि भारतीय जनमानस घडले आहे, ही आपली संपृक्त अस्मिता आहे आणि ती नाकारण्यात अर्थ नाही असा विचार मांडला होता. नलपत यांचे नवे पुस्तक २८ ऑगस्ट रोजी प्रकाशित होते आहे. ‘दुसरे शीतयुद्ध’ हा विषय ते २०१० पासून मांडत असले तरी आता या मांडणीला निराळी धार चढली आहे, असे कदाचित या पुस्तकातून लक्षात येईल.
या दुसऱ्या शीतयुद्धाच्या प्रमुख बाजू अमेरिका आणि चीन याच असणार, हे उघड आहेच. पण या दोघा देशांखेरीज प्रामुख्याने भारत आणि रशिया हेच या शीतयुद्धाचे साक्षीदार/ भागीदार असतील. यातही भारताच्या भूमिकांना महत्त्व राहील, कारण भारत हाच अमेरिकेप्रमाणे लोकशाही देश आहे. अशा स्थितीत भारताने ‘मागे काय झाले’ हे न पाहाता पुढला विचार करावा, अशी स्पष्टोक्ती नलपत यांनी नव्या पुस्तकातून केली आहे. म्हणजे भारताने अमेरिकी बाजूकडे झुकावे का? युरोपातील ब्रिटन, जर्मनी आदी देश तसेच युरोपीय संघ हे अमेरिकेच्या बाजूने असतीलच. पण कुणाही एका बाजूला न झुकता आपले ‘मोठे’पण ओळखण्याची गरज भारताला आहे, असे म्हणणे नलपत मांडतात. त्यासाठी जरूर तेवढा इंदिरा गांधी यांच्या काळापासूनच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा आढावाही या पुस्तकात नलपत घेतात, परंतु त्यांचा भर आहे तो भविष्यकाळावर. चीन कुरापती करणारच, हा इशारा अन्य तज्ज्ञांप्रमाणेच नलपत हेही देतात. रशियाच्या कुरापतींचा कोणताही उपसर्ग भारताला झालेला नाही, होणारही नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘दुसऱ्या शीतयुद्धाची शक्यता नाही’ असे म्हटले आहे. (हे वक्तव्य १४ नोव्हेंबर २०२२ रोजीचे- त्याच दिवशी योगायोगाने पं. नेहरूंचा जन्मदिवस ‘बालदिन’ म्हणून साजरा होतो आणि बायडेन यांचे वक्तव्य चीनबद्दलच.. असो!) – अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून या ‘दुसऱ्या शीतयुद्धा’ची चर्चा आता मंदावत असताना नलपत यांचे हे पुस्तक भारतकेंद्री विश्लेषणावर भर देणारे आहे.



