हिंदी लेखिका गीतांजली श्री यांचं नाव इंग्रजी वाचणाऱ्या सुमारे ६७ देशांत माहीत झालं ते गेल्या वर्षीचं (२०२२) ‘बुकर इंटरनॅशनल’ पारितोषिक त्यांच्या ‘टूम्ब ऑफ सॅण्ड’ (मूळ हिंदीत ‘रेत समाधी’) या कादंबरीला मिळाल्यामुळे. बुकरचंच पण इंग्रजीत अनुवादित झालेल्या ललित साहित्यासाठीचं हे पारितोषिक ५० हजार ब्रिटिश पौंडांचं असलं तरी लेखक आणि अनुवादकाला २५-२५ हजार पौंड विभागून मिळतात, वगैरे सामान्यज्ञान गेल्या वर्षी सर्वभाषिक बातम्यांमधून पोहोचलं. तर यंदाच्या २०२३ या वर्षांसाठी भारतातल्या ‘पायर’ या मूळ तमिळमधून इंग्रजीत आलेल्या पेरुमल मुरुगन यांच्या कादंबरीचंही नाव लघुयादीपर्यंत गेलं होतं (‘पायर’बद्दलचा ‘एका लग्नाची दाहक गोष्ट’ हा लेख १८ मार्च रोजीच्या ‘बुकमार्क’मध्ये वाचता येईल) पण यंदा काही भारताचा पुन्हा विचार झाला नाही. यंदा हे पारितोषिक बल्गेरिया या देशातले आणि ‘बल्गेरियन’ (ही भाषा आठ कोटी लोक बोलतात) याच भाषेत लिहिणारे जॉर्जी गोस्पोदिनोव्ह – आणि इंग्रजी अनुवादक अँजेला रॉडेल- यांना मिळालं आहे. ‘रेत समाधी’ गेल्या वर्षभरात अनेकांनी हिंदी वा इंग्रजीत वाचली असेल, त्यामुळे त्यातली दिल्लीवासी वयस्कर स्त्री- जी अनेक वर्षांनी जागी झाली आहे आणि जी पाकिस्तानला मूळ घरी जाऊ पाहाते आहे.. तीही आठवत असेल. यंदाचं पुस्तकही ‘काळ’ या संकल्पनेचा वेध घेणारंच आहे, पण अन्य पुस्तकांपेक्षा निराळय़ा पद्धतीनं!
‘टाइम शेल्टर’ हे पुस्तकाचं नाव. कादंबरीचं कथानक कुठे घडतं याचं सरळसाधं उत्तर- बल्गेरिया, स्वित्र्झलड आणि अन्य युरोपीय देशांमध्ये, असं असलं तरी ते वरवरचं आहे.. खरं कथानक घडतं ते लेखक-निवेदकाच्या मनात. कुणी म्हणेल, ‘प्रत्येक कथा-कादंबरीचं कथानक आधी मनातच घडतं’- तर तसं इथं नाही. जॉर्जी गोस्पोदिनोव्हसारख्याच ‘जी. जी.’ अशा आद्याक्षरांनी स्वत:चा निर्देश करणारा निनावी निवेदक इथं आहे, त्याला ‘१९८९ साली सप्टेंबरच्या अगदी सुरुवातीलाच कुठल्या तरी साहित्यिक परिसंवादात’ गॉस्टिन भेटतो इथपासून कादंबरी सुरू होते. पण अखेर ‘गॉस्टिन’ ही कादंबरीपूर्वीच लिहिली गेलेली आणि जॉर्जी गोस्पोदिनोव्हच्या ‘अॅण्ड अदर स्टोरीज’ या कथासंग्रहात प्रकाशितही झालेली कथा आहे. त्या कथेतला गॉस्टिन लेखकाशी संपर्कात राहातो, पत्रं पाठवतो आणि त्या पत्रांखालच्या तारखा निरनिराळय़ा भूतकाळांतल्या असतात.. कधी १९२९, कधी १९३७.. पण हा पत्रसंवाद २ जानेवारी १९९० या तारखेपासून घडू लागल्याचं लेखकच सांगत असतो! त्या कथेतल्या गॉस्टिनइतकी नाही, पण कथालेखकालाही जुन्या वस्तूंची, जुन्या काळाची आवड असल्यानं पत्रसंवाद रंगतोही.. पण या गॉस्टिनच्या अखेरच्या पत्रावरली तारीख असते, ‘२८ जुलै, १९३९’. त्यात गॉस्टिन लिहितो, मला पोलंड सोडून अन्यत्र जावंच लागणार.. जर्मन फौजा इथेच चालून येताहेत. याहीनंतर ‘आज एक सप्टेंबर’ अशा शब्दांमध्ये, मुळात परिसंवादच झाला होता की नाही असा किडा डोक्यात सोडून कथा संपते!.. आणि कादंबरीत ही कथा पुन्हा अशीच येते, त्यातला गॉस्टिन आता स्वित्र्झलडच्या झुरिच शहरात स्थायिक झालेला असतो.
पण गॉस्टिन ‘आत्ता’ काय करतोय, कसा जगतोय काही माहीत होण्यापूर्वीच एक बातमी लेखकाचं लक्ष वेधते.. ‘अमक्या शहरात, वृद्धांच्या समस्यांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरनं रुग्णाशी संवाद साधण्याच्या खोलीला थेट १९६० मधल्या एखाद्या खोलीसारखं सजवलंय. इथला रंग, फर्निचर, फोन, पोस्टर सारं त्या काळाच्या स्मृती जागवणारं आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे वृद्ध इथं येऊन अधिक खुलून बोलू लागले आहेत’!
या बातमीचं आणि त्या ‘कथित’ गॉस्टिनचं बतंगड ‘टाइम शेल्टर’चा निवेदक बनवतो आहे. आता गॉस्टिननं स्वित्र्झलडमध्ये एका बहुमजली घरामध्ये ‘टाइम शेल्टर’ थाटला आहे. घराचा प्रत्येक मजला एकेका काळाप्रमाणे सजवलेला आहे. असे १९७० च्या दशकापर्यंतचे मजले सध्या असून, पुढेमागे १९८० आणि १९९० च्या दशकातही परत जाता यावं यासाठी उतरत्या छपराखालचे दोन मजले मोकळे सोडले आहेत. हा आश्रय आहे, स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णांसाठी खास! झुरिचला अनायासे गेलाच असताना गॉस्टिनचा हा नवा व्यवसाय कादंबरीचा निवेदक न्याहाळतो, त्याला ही कल्पना फार आवडते, तर गॉस्टिन म्हणतो, इथंच राहा- माझा सहायक म्हणून! हे मान्य केल्यामुळे पुढली प्रकरणं घडतात. स्वित्र्झलड हा युरोपातला तटस्थ देश, त्यामुळे या ‘टाइम शेल्टर’मध्ये युरोपभरातून कुठूनही लोक येऊन राहू लागतात. पण बल्गेरियनांची संख्या वाढते तेव्हा गॉस्टिन त्या देशात स्वतंत्र शाखाच काढतो. शाखाविस्तारानंतर कथानक वळण घेतं.. व्यवसायवृद्धीच्या क्लृप्त्या. गॉस्टिन ठरवतो : स्मृतिभ्रंश न झालेल्यांनाही इथं प्रवेश द्यायचा. या, तुमच्या आवडीचा काळ निवडा नि जगा त्यात खुश्शाल! पण यासाठी मोठी जागा, गुंतवणूक हे सारं आलं. त्यापेक्षा लोकांच्याच जागेवर- म्हणजे प्रत्यक्ष समाजातच हे केलं तर? – हिकमती गॉस्टिन आणि त्याला साथ देणारा निवेदक तसंही करतात. हे तर इतकं लोकप्रिय होतं की गावंच्या गावं पुढे येऊ लागतात, आम्हाला हा अमका काळ हवाय!
कहर म्हणजे ‘युरोपियन युनियन’ (ईयू) पर्यंत गॉस्टिनच्या प्रयोगाची कीर्ती पोहोचते. मग ‘ईयू’त बरीच चर्चा होते आणि तोडगा निघतो : प्रत्येक सदस्य देशाने आपापला काळ निवडण्याची मुभा सदरहू प्रत्येक सदस्य देशाला राहील. परंतु अशा प्रत्येक सदस्य देशाने, भौगोलिक सीमांच्या अंतर्गत कोणता काळ राबविणेचे आहे याचा निर्णय त्या-त्या देशातील सर्व नागरिकांच्या अथवा त्यापैकी बहुतेकांच्या – सार्वमताने घेण्याची अट राहील!
..मग सुरू होते भन्नाट स्पर्धा.. आम्हाला हवाय तोच काळ देशभरानं निवडला पाहिजे, असं म्हणणारा एखादा दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा समूह, एखादा पहिल्या महायुद्धापूर्वीचा, एखादा समूह मध्ययुगातलाच.. अशा साऱ्यांची चढाओढ. हे सारे जण आपापल्या काळाच्या नखशिखान्त पोशाखांमध्ये, आपापल्या काळातल्या वस्तू, त्या-त्या काळातलं खाणं- पिणं यांचं वैभव दाखवण्याच्या मागे! बल्गेरियात गॉस्टिननं कादंबरीच्या निवेदकाला मुद्दाम पाठवलंय.. सार्वमताच्या आधी काय काय होत आहे याच्या तपशीलवार नोंदी करण्यासाठी. त्यातली एक नोंद अशी की, नाटय़प्रयोग बंदच पडलेत. आता नाटकांचा कपडेपट लोक घरात आणि रस्त्यांवर वापरताहेत, खूप मागणी आहे अंगरखे आणि शिरोभूषणांना.
त्या सार्वमतापूर्वीच्या निरीक्षण आणि अभ्यासांतून असं ढोबळ अनुमान निघतं की, अधिकाधिक युरोपीय स्त्री-पुरुषांना १९३९ पूर्वीचा काळ हवाय. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या नुकता आधीचा. प्रगती तर झालीय, पण शांतताही बऱ्यापैकी आहे, असा. पण ईयूपुढे प्रश्न असा की, त्या काळात तर युरोपीय राष्ट्रं एकमेकांशी भांडत होती.. नेमके टिपेच्या भांडणांचे काळच दोन तत्कालीन शत्रुराष्ट्रांनी निवडले, तर? आणि कादंबरीच्या अखेरीस, स्वत:ला ऑस्ट्रिया-हंगेरीचा युवराज फ्रान्झ फर्डिनांड मानणाऱ्या कुणा नटाला वाटतं की ज्याचा खून झाल्यामुळेच तर पहिलं महायुद्ध पेटलं तो युवराज फर्डिनांड आता जर आपण आहोत, तर आपल्या खुनाचा प्रयत्न तरी व्हायला नको? म्हणून तसा प्रयत्न घडवून आणला जातो, पण खून खरोखर होतो आणि मग संघर्षच पेटतो.. इथं कादंबरी संपते. म्हणजे प्रत्यक्षात ती, युक्रेनयुद्धापाशी संपत असणार, असं वाचकानं समजायचं! वरवर पाहाता काळांची भेळ करणारी, पण काळाबद्दलचं चिंतनही मांडणारी, ही कादंबरी आहे. ‘बालपणीचं घर नेहमी अंतरलेलंच असतं’, किंवा ‘एकाच वेळी किती काळांचं संरक्षण करता येईल?’ यांसारखी साधी वाक्यं चिंतनाच्या प्रदेशात नेणारी आहेत.
वाचकाला इथं नक्की ‘ब्रेग्झिट’च्या सार्वमताची आठवण येईल, असं ब्रिटिश समीक्षकांनी म्हटलंय तर आणखी कुणी, पुतिन यांना हवा असलेला ‘पूर्वीप्रमाणेच सामथ्र्यशाली’ रशिया, ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’मधला ट्रम्पना अपेक्षित असणारा ‘ग्रेट’ काळ यांच्या आठवणी काढतंय.. फार संख्येनं भारतीयांनी ही कादंबरी अद्याप नाही वाचली.. पण वाचली असती, तर कुणा महाभागानं ती वाचून ‘सेन्गोल’बद्दल काय लिहिलं असतं कोण जाणे!