चौदा कादंबर्‍या, दहा नॉन-फिक्शन ग्रंथ, तीन कथासंग्रह, चार गुन्हेगारी कादंबर्‍या (डॅन कॅव्हानॉग या टोपणनावाने) लिहिणारे बुकर पारितोषिकाने सन्मानित लेखक ज्युलियन बार्न्स यांनी नुकतीच प्रकाशित झालेली ‘डिपार्र्चर्(स)’ ही आपली अखेरची कादंबरी असल्याचे जाहीर करून ब्रिटिश वाचकांसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

बार्न्स यांच्या तीन कादंबर्‍यांवर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्या साहित्याचा ५० भाषांत अनुवाद झाला आहे, यावरून त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना येते. जगभरात त्यांच्या पुस्तकांच्या एक कोटीहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. २०२०मध्ये बार्न्स यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. आपला दिनक्रम सुरळीत सुरू असला, तरी हा दुर्धर रोग अखेरपर्यंत सोबत राहणार असल्याची जाणीव झाल्याने कादंबरीलेखन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींत म्हटले आहे.

‘डिपार्र्चर्(स)’ मध्ये वास्तव आणि कल्पितात एक धूसर रेषा आहे. काल्पनिक कथा, आत्मचरित्र आणि निबंध या प्रकारांचा मिलाफ यात दिसतो. एका प्रेमकथेभोवती कादंबरी बेतलेली आहे. विद्यार्थीदशेत असतानाच दुरावलेले दोघे अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटतात आणि पुढे काय होते, हे ‘डिपार्र्चर्(स)’ सांगते. कादंबरीतील पात्रे वास्तवात अस्तित्वात आहेत की पूर्णपणे काल्पनिक आहेत, याचे स्पष्ट उत्तर देणे बार्न्स यांनी टाळले आहे.

कथेच्या सूत्रधाराचेही नाव ज्युलियन असून तो बार्न्स यांच्यासारखाच लेखक आहे. तोही रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे आणि त्याच्या पत्नीचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला आहे. बर्न्स यांच्या पत्नीचाही २००८मध्ये ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला होता. निदान झाल्यानंतर अल्पावधीत त्यांचे निधन झाले होते. बार्न्स यांचा पाळीव श्वान जिमी असून या कादंबरीतही याच नावाच्या श्वानाचे पात्र आहे. त्यामुळे कादंबरी कल्पित की बर्न्स यांच्या आयुष्यावर आधारित याविषयी संभ्रम असून हे गूढ कायम ठेवण्यास लेखकाने पसंती दिली आहे.

बार्न्स यांचे पहिले पुस्तक ‘मेट्रोलँड’ १९८० मध्ये प्रकाशित झाले आणि सुरुवातीपासूनच त्यांच्या लेखनाला चांगला प्रतिसाद मिळाला. १९८३ साली ‘ग्रांटा’ने प्रसिद्ध केलेल्या ब्रिटनमधील २० सर्वोत्कृष्ट तरुण कादंबरीकारांच्या यादीत त्यांचा समावेश होता. (सलमान रश्दींचे नावही या यादीत होते). बुकरच्या लघुयादीत तीनदा समावेश झाल्यानंतर २०११ मध्ये त्यांच्या ‘द सेन्स ऑफ ॲन एंडिंग’ या अकराव्या कादंबरीला बुकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. बार्न्स यांनी मुलाखतींतून दिलेली माहिती पाहता त्यांची त्यांच्या आजाराविषयी तक्रार असल्याचे दिसत नाही. मृत्यूविषयीचे मंथन सुरुवातीपासूनच त्यांच्या कादंबर्‍यांच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसते. आपल्या मृत्यूविषयक कल्पना, भीती, भयस्वप्ने यांचे त्यांनी अनेकदा पुस्तकांतून आणि मुलाखतींतून वर्णन केले आहे. ज्युलियन बार्न्स यांनी लेखननिवृत्ती स्वीकारल्यामुळे गेली सुमारे साडेचार दशके ब्रिटिश साहित्यविश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या साहित्यिकाच्या कारकीर्दीची सांगता झाली आहे.