निखिलेश चित्रे
‘इटर्नल रिटर्न’ म्हणजेच ‘चिरंतन पुनरागमन’ ही कल्पना पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात पहिल्यांदा स्टोइक तत्त्वज्ञांकडून मांडली गेली. या कल्पनेनुसार काळामध्ये विश्वाचा विलय होतो आणि ते पुन्हा नव्यानं निर्माण होत राहतं. माणसाला एकच गोष्ट पुन:पुन्हा अनुभवावी लागते (उदाहरणार्थ सिसिफससारखा शाप), असाही या संकल्पनेचा अन्वयार्थ लावता येतो. पण पौर्वात्य तत्त्वज्ञानात मात्र हे पुनरागमन एका नव्या संधीसारखं, म्हणजे सुधारणा किंवा विकासाच्या शक्यता घेऊन येणारं पुनरुत्थान मानलं जातं. जातककथा किंवा समराइच्चकहा सारख्या जैन कथाग्रंथामधून पुनर्जन्माची संकल्पना अशाप्रकारे आध्यात्मिक विकासावर आधारित आहे. त्यानंतर अनेक शतकांनी नित्शंनं (मराठीत नीत्शे असा उच्चार प्रचलित आहे) या संकल्पनेवर आधारित एक नैतिक तत्त्व मांडलं: आपलं आयुष्य शेवटपर्यंत पुन:पुन्हा जगावं लागणार आहे असं गृहीत धरूनच माणसानं वागलं पाहिजे आणि आपल्याला आयुष्य इतकं आवडायला हवं की आपण ही पुनरावृत्ती मनापासून स्वीकारू.

हीच ‘चिरंतन पुनरागमना’ची कल्पना पुढं अनेक कथा-कादंबऱ्यांचा आणि सिनेमांचा पाया बनली विशेषत: ‘टाइम लूप’ म्हणजेच आवर्ती काळ असलेल्या कथा-कादंबऱ्या हा तर आता विज्ञानकथांमध्ये स्वतंत्र उपप्रकारच मानला जातो. यामध्ये सर्वात जुनं उदाहरण म्हणजे १९१५ मधली पी. डी. उस्पेन्स्कीची ‘द स्ट्रेंज लाइफ ऑफ इव्हान ओसोकिन’ ही रशियन कादंबरी. त्यातल्या नायकाला आयुष्यातल्या चुका सुधारायच्या उद्देशानं परत आपल्या भूतकाळात जायची संधी मिळते. पुढे हा विषय अनेक लेखकांनी हाताळला. उदाहरणार्थ, कुर्ट व्हॉनगटच्या ‘टाइमक्वेक’ या कादंबरीमध्ये काळ आणि अवकाशात झालेल्या बिघाडामुळे संपूर्ण मानवजातीला एक दशक पुन्हा जगावं लागतं. किंवा नोबेल विजेता मो यानच्या ‘लाइफ अँड डेथ आर वेअरिंग मी आउट’ या कादंबरीतला नायक बौद्ध आणि जैन कथामधल्या पात्रासारखा अनेकदा मरून प्रत्येक वेळी वेगळ्या प्राण्याच्या रूपात पुन:पुन्हा जन्म घेतो.

डॅनिश लेखिका सोलव्हाय बाल्ले ( Solvej Balle) हिच्या ‘ऑन द कॅलक्युलेशन ऑफ व्हॉल्यूम’ या प्रस्तावित सप्तखंडात्मक कादंबरीच्या पहिल्या खंडाचा इंग्रजी अनुवाद या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाच्या अंतिम पाच पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झाला होता. बाल्लेची ही बहुचर्चित कादंबरी आवर्ती काळाच्या संकल्पनेवर आधारित आहे.

या कथेची नायिका तारा सेल्टर ही अठराव्या शतकातल्या चित्रमुद्रित पुस्तकांची तज्ज्ञ असलेली जुन्या पुस्तकांची विक्रेती. ती कामासाठी पॅरिसला गेलेली असते. १८ नोव्हेंबर रोजी ती पॅरिसमधल्या एका हॉटेलमध्ये झोपते — आणि दुसऱ्या दिवशी उठल्यावर तिच्या लक्षात येतं की, काहीतरी विचित्र घडतंय : आज पुन्हा १८ नोव्हेंबरच आहे.

घरी परतल्यावर तिच्या लक्षात येतं, की आपला नवरा थॉमस आणि बाकी सगळे लोक या आवर्ती काळामध्ये आपल्यासारखेच अडकले आहेत, मात्र त्यांना याची जाणीव नाही. फक्त आपल्यालाच पुनरावृत्त होणाऱ्या दिवसाचं भान आहे.

तिथून पुढे ही गोष्ट या जोडप्याच्या संघर्षाकडे वळते. हा काळाच्या भूलभुलैयातून बाहेर पडण्याचा संघर्ष आहे, जिथं प्रत्येक दिवस पुन:पुन्हा तोच असतो; पण त्याचा अर्थ सतत बदलत जातो. हळूहळू त्यांच्यातलं अंतरही वाढत जातं…

कारण थॉमसला कालचं काहीच आठवत नाही;

आणि ताराला सगळं सारखं आठवत राहातं.

हा संघर्ष केवळ काळाशी नाही, तर एकमेकांशीही आहे. विस्मरण आणि स्मरण, यांच्यातली ही अदृश्य भिंत दररोज अधिक घट्ट होत जाते.

या मालिकेच्या दुसऱ्या भागात तारा वेगवेगळे ऋतू अनुभवण्यासाठी वेगवेगळ्या शहरांत प्रवास करते. अर्थात तारीख मात्र १८ नोव्हेंबरच राहते. पण वेगवेगळ्या अक्षांशांवर, वेगवेगळ्या हवामानांमध्ये तीच तारीख अनुभवली तर काय होतं, हे ताराला बघायचं असतं. तारा या अनेक १८ नोव्हेंबरांचं मिळून एक नवं जग उभं करते. त्या जगात तिला एकाच दिवशी उन्हाळा, वसंत आणि हिवाळाही अनुभवता येतो.

या अनिश्चित आणि गोंधळलेल्या आयुष्यात काळाची हरवलेली एकरेषीयता परत मिळवण्यासाठी तारा डायरी लिहिण्याचा मार्ग शोधते. लेखन आणि गोष्ट सांगणं हे काळावर ताबा मिळवण्याचं साधन ठरतं आणि काळाचं भान जिवंत ठेवण्याचा मार्गसुद्धा. त्यामुळे कादंबरीचं निवेदन डायरीच्या नोंदीच्या स्वरूपात येतं. या खंडित, तुटक निवेदनातून नायिकेच्या आयुष्याचं एकाच दिवसात सतत विभागलं जाणंही सुचवलं जातं.

ही कादंबरीमालिका केवळ चमत्कृतीपुरती मर्यादित नाही. त्यामुळेच या कादंबरीच्या आशयाला अस्तित्ववाद, मानवी एकटेपणा, निर्धारवाद आणि स्वेच्छेची संकल्पना यांसारखे विविध गंभीर पैलू आहेत. हे सगळे घटक एकत्र येऊन काळ आणि स्मृती, एकटेपणा, अस्तित्व आणि प्रेम यांचा खोलवर शोध घेणारं वाङ्मयीन आख्यान आकार घेत जातं.

ही कादंबरी विज्ञानकथेच्या चौकटीतच अडकून न राहाता ‘काळ’ ही संकल्पना केंद्रस्थानी असणाऱ्या गंभीर, तात्त्विक साहित्यपरंपरेशी संवाद साधते. उदाहरणार्थ, मार्सेल प्रूस्तच्या ‘इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम’मध्ये नायकाच्या आठवणींचा प्रचंड प्रवास आहे झ्र तिथं एक मेडलिन केक भूतकाळात झेप घेण्याचं निमित्त ठरतो. व्हर्जिनिया वुल्फच्या ‘ऑरलँडो’ मध्ये काळ ही एक लवचीक, प्रवाही आणि व्यक्तिनिष्ठ जाणिवा असलेली संकल्पना म्हणून समोर येते. तर हर्मन मेलव्हिलच्या ‘बार्टलबी, द स्क्रिव्हनर’ या कथेतला कर्मचारी काळाच्या आणि जगाच्या तटस्थतेतच गोठून गेल्याप्रमाणे ऑफिसमध्ये अडकलेला असतो.

सोलव्हाय बाल्लेचं लेखन या सर्व साहित्यिक परंपरांशी नातं सांगतं. ती काळाचा विचार केवळ घटनांचं पुनरावर्तन म्हणून करत नाही; तर काळ म्हणजे नेमकं काय, स्मृती म्हणजे काय, आणि या पसाऱ्यात माणसाचं स्थान काय असे प्रश्न विचारते.

या कादंबरीमालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे, ही कादंबरी एक अत्यंत ओळखीची आणि बऱ्याचदा वापरलेली संकल्पना घेते आणि तिचा उपयोग करून अस्तित्वाच्या मुळाशी जाणाऱ्या प्रश्नांना स्पर्श करते.

चित्रपट, मालिका, कादंबऱ्या आणि व्हिडीओ गेम्समध्येही आवर्ती काळाची ही कल्पना खूपदा पाहायला मिळते. बहुतेक वेळा अशा कथा एका ठोस शेवटाकडे जातात— सगळं एखाद्या अचूक यंत्रासारखं चालतं, आणि शेवटी पात्राला काळाच्या गोफातून बाहेर पडता येतं. सगळं काही परिपूर्ण आणि बंदिस्त वाटतं. पण सोलव्हाय बाल्ले हिचा दृष्टिकोन यापेक्षा पूर्ण वेगळा आहे. सोलव्हाय बाल्लेची ही कादंबरी केवळ एका आकर्षक कल्पनेचा चटपटीत वापर करून रिझवत नाही. ती एका खोल, चिंतनशील कवितेसारखी आहे.

या कादंबरीतली मुख्य व्यक्तिरेखा तारा दररोज नेमकी त्याच ठिकाणी, त्याच परिस्थितीत जागी होत नाही. ती विविध ठिकाणी प्रवास करू शकते, आजूबाजूच्या गोष्टींवर परिणाम करू शकते, आणि घरीसुद्धा परत जाऊ शकते. तिचं हे बंधनातलं स्वातंत्र्य तिच्या अनुभवाला एक वेगळं परिमाण देतं.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्यासाठी काळ खरंच पुढे जात असतो. तिच्या शरीरावर आणि मनावर काळाचा परिणाम होतो— ती आजारी पडते, थकते, भावनिकदृष्ट्या कोसळते. म्हणजेच ती काळाच्या कृत्रिम आवर्तात अडकलेली नाही, तर तिला सरणाऱ्या काळाची पूर्णपणे जाणीव आहे— फक्त तिच्या भोवतालचं जग ते लक्षात घेत नाही.

‘ऑन द कॅलक्युलेशन ऑफ व्हॉल्यूम’ ही कादंबरी एक स्पष्ट, ठरावीक संकल्पनेचा विस्तार करणाऱ्या विज्ञानकथांप्रमाणे मांडलेली नाही. ती एका स्त्रीच्या आयुष्यातल्या दिवसांची मालिका आहे— एक अशी स्त्री जिचा काळ कुठल्यातरी अज्ञात कारणामुळे थिजवलेला आहे. पण या अवस्थेकडे ती बघते त्या दृष्टिकोनात एक विलक्षण उत्कंठा आहे.

तारा सतत विज्ञान आणि तत्त्वज्ञान याच्या सीमारेषेवर वावरते. तिच्या डायरीतून आपल्याला तिच्या विचारांचा आणि भावनांचा नेमका, स्पष्ट आलेख वाचायला मिळतो. ती काळाच्या आवर्तनात अडकलेली आहे, पण स्थिर नाही. आणि हाच तिच्या प्रवासातल्या बदलांचा गाभा आहे. कारण ती स्वत:ला समजून घेते, आपल्या भोवतालाचं निरीक्षण करते, आणि सतत चिंतन करते.

ही कादंबरी आकारानं मोठी नाही, पण ती झपाट्यानं वाचून संपवण्यासारखीही नाही. ती नाट्यपूर्ण घटनांनी भरलेली नाही. उलट, त्यातलं एकेक वाक्य, एकेक पान सर्वसामान्य तपशिलांवर भर देत पुढे जातं. ही कादंबरी आपल्याला हळूहळू एका ओळखीच्या, पण तरीही नव्यानं अनुभवण्याजोग्या कथाविष्कारात अलगद घेऊन जाते. ती आपल्याला विचार करायला लावते आणि जगण्याशी भिडवते.

ताराचा रूपकात्मक आणि प्रत्यक्ष प्रवास जगाकडे पाहण्याच्या एका विशिष्ट दृष्टिकोनाशी संबंधित आहे— विशेषत: अवकाश आणि काळ यांच्या परस्परसंबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. सोलव्हाय बाल्ले हिनं ‘आवर्ती काळ’ या परिचित संकल्पनेला एक वेगळं परिमाण दिलं आहे : ताराच्या जगात वस्तू कधी अचानक गायब होतात आणि पुन्हा मूळ ठिकाणी परततात, तर कधी तिथेच राहतात. या विचित्र प्रकारामुळे ताराच्या विश्वाला अर्थाचा आणखी एक भौतिक स्तर जोडला जातो आणि ती स्वत:च्या या भौतिकतेमुळे हळूहळू रूपांतरित होत जाते. तिच्या भौतिकतेचं ओझं, तिची स्मृती, आणि तिचं एकटेपण— हे सगळं मिळून तिच्या अस्तित्वालाच वेगळं रूप देतं.

या कादंबरीला खऱ्या अर्थानं वेगळं करणारा घटक म्हणजे हा भौतिक प्रवास. काळाच्या गाठी उकलण्यासाठी उत्तरं शोधणं किंवा स्पष्टीकरणं मिळवणं हे या कादंबरीचं मुख्य उद्दिष्ट नाही. त्याऐवजी, आपल्यासमोर मांडला जातो तो हळूहळू घडत जाणारा ताराच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास. काळ तिच्यासाठी ठप्प झालेला असतो, पण ती मात्र आतून सतत बदलत जाते. तिच्या मनाचा, शरीराचा, जाणिवेचा हा विकास आपल्याला खिळवून ठेवतो. आणि म्हणून ही कादंबरी दिसते त्यापेक्षा कितीतरी खोल आणि अर्थवाही असल्याचं लक्षात येतं.

ऑन द कॅल्क्युलेशन ऑफ व्हॉल्यूम

लेखिका – सोलव्हाय बाल्ले

प्रकाशन – फॅबर अँड फॅबर

पृष्ठे – १६१ मूल्य – १२७९ रुपये

निखिलेश चित्रे (लेखक, समीक्षक)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

satantangobela@gmail. com