रवींद्र कुलकर्णी

‘डायरी’तून गेल्या ७५ वर्षांत मराठीसह अनेक भाषांत पोहोचल्याने कित्येकांच्या लक्षात राहिलेली अ‍ॅन फ्रँक ४ ऑगस्ट १९४४ रोजी पकडली गेली आणि नाहीशीच झाली.. कुणी केले हे? याचा शोध घेतल्यावर नेमका माणूस सापडला; पण त्याहीपेक्षा समाजही दिसला!

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
man arrested for booking cab from Salman Khan house
गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानच्या पत्त्यावर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने बूक केली कॅब, एकाला अटक
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

भूतकाळात घडलेल्या सर्व गुन्ह्यांचा उलगडा होत नाही. कालप्रवाहात त्या विस्मरणात जातात किंवा त्यांची बोच कमी होते. त्यातल्या काही घटना मात्र संवेदनशील मनांच्या स्मरणातून जात नाहीत. नाझी छळछावणीत मरण पावलेल्या अ‍ॅन फ्रँकची स्मृती तिच्या डायरीने गेली ७५ वर्षे जिवंत ठेवली आहे आणि त्याचबरोबर ‘फ्रँक कुटुंबाला दगा कोणी दिला?’ हा  प्रश्नही जिवंत राहिला आहे. ख्रिस्ताबरोबर कोणी अज्ञात  ज्युडासही अमर व्हावा असे काहीसे या प्रकरणात घडले. अ‍ॅमस्टरडॅममधल्या ज्या इमारतीच्या खोलीत अ‍ॅनचे कुटुंब तब्बल दोन वर्षे यशस्वीरीत्या लपले होते त्याचा ठावठिकाणा, नाझी गेस्टपोच्या आधिपत्याखाली असणाऱ्या डच पोलिसांना कोणी सांगितला, हा अ‍ॅन फ्रँकच्या घराला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. 

२०१६ मध्ये तेजिस बेन्स या डच चित्रपटकर्त्यांला या प्रश्नावर माहितीपट निर्माण करावासा वाटला. या घटनेसंबंधित माहिती अनेक ठिकाणी विखुरली होती. २०१६ पर्यंत या घटनेत सामील असलेल्या बहुतेक सर्व व्यक्ती मरण पावल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी सांभाळलेली काही कागदपत्रे व पत्रव्यवहार, त्यांनी पुढच्या पिढीला सांगितलेल्या आठवणी, डच पोलीस दलाच्या १९४४ सालातल्या फायली अशा गोष्टींचा शोधाचा आधार असणार होता. अ‍ॅनचे वडील ऑटो फ्रँक यांनी तिच्या आठवणीचा व आदर्शाचा प्रसार करण्यासाठी दोन संस्था स्थापल्या होत्या. त्यातली ‘अ‍ॅन फ्रँक स्टििच्टग’ (स्टििच्टग किंवा स्टिष्टिन्ग म्हणजे डच भाषेत, प्रतिष्ठान) ही संस्था अ‍ॅमस्टरडॅममध्ये, फ्रँक कुटुंब लपलेल्या इमारतीतच आहे. दुसरी, अ‍ॅन फ्रँक फौंडेशन ही स्वित्र्झलडस्थित आहे. त्यांच्याकडेही काही माहिती होती.

अ‍ॅनच्या डायरीच्या तीन मुळातल्या प्रती होत्या. एक अ‍ॅनने लिहिलेली, दुसरी  तिनेच परत लिहिलेली व तिसरी झ्ॉटो फ्रँकने दुरुस्त्या करून संपादित केलेली. या साऱ्या माहितीच्या जंजाळातून मार्ग काढण्यासाठी  तेजिस बेन्स याने विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींचे पथकच बनवले, ज्याचे नेतृत्व अमेरिकेच्या एफबीआयमधून निवृत्त झालेल्या व्हिन्स पँकोके या, एकेकाळी  कोलंबियन ड्रग माफियांवर काम केलेल्या अधिकाऱ्याकडे दिले. त्याच्या पथकात सामाजिक व लष्करी इतिहासकार, मनोवैज्ञानिक, गुन्हेगारी विश्वावर डॉक्टरेट केलेले काही जण, विदाविश्लेषक (डेटा अ‍ॅनालिस्ट)  असे मिळमून इतर २७ लोक होते. या पथकाचे काम नंतर पाच वर्षे चालले. या शोधाची कहाणी रोझमेरी सुलेवान या कॅनेडियन कवयित्री व चरित्र लेखिकेने तिच्या ‘द बिट्रेयल ऑफ अ‍ॅन फ्रँक’ या पुस्तकात सांगितली आहे.

व्हिन्स पँकोकेने ‘लपलेला ज्यू पकडला जाण्या’चे मुख्य चार कारणविभाग निश्चित केले. त्यात पहिला भाग निष्काळजीपणाचा होता. ज्यात खिडकीबाहेर डोकावणे वा झाडलोटीसारखे काम करणाऱ्या अनोळखी माणसाला घरात घेणे असल्या घटना होत्या. दुसरा कारणविभाग- नशिबाचा होता. यात, पोलीस सायकली व रेडिओ शोधण्यासाठी अचानक धाडी टाकत. त्यातून  लपण्याच्या जागेचा शोध लागण्याची शक्यता असे. तिसरा कारणविभाग म्हणजे पोलीस ज्यू पकडण्याची मोहीमच काढत. त्या वेळी अंदाजपंचे धाडी टाकण्यात येत. शेवटचा विभाग हा कुणीतरी विश्वासघात केल्यामुळे पकडले जाण्याचा प्रसंग. यात कुणाचे वैयक्तिक शत्रुत्व असे वा कोणी बक्षिसाच्या आशेने पोलिसांकडे जाई.

निष्काळजीपणाचे एक उदाहरण ऑटो फ्रँकच्या बाबतच १९४१ला घडले होते.  ऑटोने कधीतरी आपल्या एका कर्मचाऱ्याशी बोलताना ‘जर्मनी युद्ध हरणार’ असे म्हटले होते. नंतर ऑटोने कामावरून काढून टाकल्यानंतर, त्या कर्मचाऱ्याने या जुन्या संभाषणातील वक्तव्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. टोनी आल्हर्स नावाच्या तरुणाने फ्रँक विरुद्धची ती तक्रार पोलीस स्टेशनच्या फाइलमधून लंपास करून ऑटोला आणून दिली. त्या बदल्यात तो पैसे घेऊन गेला. फ्रँक कुटुंब लपल्यानंतरही टोनीने ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळले होते. पण पुढे घेतलेल्या शोधानंतर टोनी आल्हर्सने फ्रँक कुटुंबाला पकडून दिल्याची शक्यता वजा करण्यात आली. 

व्हिन्स पँकोके याच्या टीमची संशयाची सुई फ्रँक कुटुंबाशी त्या काळात संबध आलेल्या प्रत्येकाच्या दिशेने फिरली. प्रत्येक महत्त्वाच्या शंकेला वाहिलेले एकेक प्रकरण लेखिकेने या पुस्तकात लिहिले आहे. यात त्या इमारतीतल्या मसाल्याच्या फॅक्टरीत काम करणारे चार कामगार, त्याच इमारतीत राहणारे व लपलेल्या ज्यूंना सांभाळणारे कुटुंब, या साऱ्यांवर शंका घेतली गेली. गेल्या ७५ वर्षांत आजूबाजूचा परिसर बदलला नसल्याने जवळच्या इमारतीतून यांना कुणी पहिले असेल का, हेदेखील विविध जागांवरून प्रत्यक्ष डोकावून, पाहून तपासण्यात आले. जुन्या शेजाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्या इमारतीत किराणा सामान व पाव देणाऱ्या माणसाने काही गडबड केल्याची शक्यताही तपासण्यात आली. कारण तो रोज जास्तीचे खाणे लपवून आणत होता. इमारतीत येणाऱ्या माणसांच्या वेळा व नंतर घडलेल्या घटना यांची सांगड घालण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची मदत घेण्यात आली.

कार्ल सिल्बरबॉर या ऑस्ट्रियन नाझी पोलिसाने फ्रँक कुटुंबाला पकडले होते हे, १९६३ साली त्याने पत्रकाराला मुलाखत दिली तेव्हापासून लोकांना माहीत होते. या सिल्बरबॉरच्या आठवणीप्रमाणे, ४ ऑगस्ट १९४४ रोजी काही खायला जावे या विचारात असताना डेटमान नावाच्या त्याच्या साहेबाचा फोन, डच डिटेक्टिव्ह सरजट अब्राहम केपरला आला व त्याने ‘प्रिन्सेनग्रच २३३’  या पत्त्यावर काही ज्यू लपले आहेत त्यांना पकडून आणायला कार्लला सांगितले. अर्थात साहेबाकडे हा पत्ता कसा आला हे कोणाला माहीत नव्हते.

१९४०च्या मे महिन्यात नाझी जर्मनीने हंगेरीवर ताबा मिळवला त्या वेळी जवळपास ८० हजार ज्यू अ‍ॅमस्टरडॅममध्ये राहात होते. बाहेरून आलेल्या नाझी अधिकाऱ्यांना शहराची कल्पना नव्हती म्हणून ज्यू समाजाविरुद्ध लगेच टोकाची कारवाई करण्यात आली नाही. या साऱ्याची तड लावण्यासाठी काही व्यवस्था निर्माण करणे जरुरीचे होते. त्यामुळे त्यांनी मदत करतील अशा स्थानिक लोकांना पैसे देऊन हाताशी धरले. विम हेनेकी हा गुन्हेगारी विश्वात असलेला अशाप्रकारचा माणूस होता. त्याने आपल्या हाताखाली माणसे ठेवून ज्यूंना पकडून देण्याचा धंदाच सुरू केला. एका ज्यूमागे साधारण ४७ डॉलर दिले जात व ते मिळाल्याची पावती घेतली जात असे. या प्रकारच्या ज्या पावत्या मिळाल्या त्याही तपासण्यात आल्या. यात अडचण ही होती की यात पकडलेल्या ज्यूंचे नाव नसे. फक्त संख्या व दिलेली रक्कम नोंदलेली असे.

ज्यूंचा निकाल लावण्यासाठी नाझी अधिकाऱ्यांनी ज्यू समाजाचीच मदत घेतली. अशाच वेळी एक ‘ज्युईश कोऑर्डिनेशन कौन्सिल’ स्थापण्यात आले. त्यातील पदांवर ज्यू समाजातील वजनदार व श्रीमंत व्यक्ती होत्या. महत्त्वाचे म्हणजे शहरातल्या सर्व ज्यूंचा पत्रव्यवहार या कौन्सिलमार्फत होत असे. याच व्यवस्थेतून ज्यू समाजाचे स्वत:चे एक संघटन निर्माण झाले व त्यांनी शहरातल्या असाहाय्य ज्यूंच्या लपण्याची व्यवस्था केली. दुर्दैवाने यातली काही ठिकाणे म्हणजे ज्यूंना फसवून पकडण्याचे सापळे होते.

एकदम सगळय़ा ज्यूंना छळछावणीत पाठवण्याची व्यवस्था नसल्याने नाझी व्यवस्थेने ज्यूंना वेगवेगळय़ा गटांत विभागले. वेगवेगळय़ा स्तरांनुसार त्यांना सवलती देण्यात आल्या. ठरावीक पैसे वा लाच घेऊन त्याप्रमाणे त्यांना ओळखपत्रे देण्यात आली, ज्यावर ‘पुढील सूचना येईपर्यंत मुक्त’ असे लिहिलेले असे. ज्या वेळी ही योजना जाहीर झाली तेव्हा कौन्सिलच्या ऑफिसमध्ये ओळखपत्रांसाठी  ज्यूंची झुंबड उडून मारामारी होण्याची वेळ आली. एक गट, जे ज्यू धर्मातर करून ख्रिश्चन झाले होते त्यांचा होता. तर दुसरा गट मिश्र विवाहातून जन्मलेल्या ज्यूंचा होता. त्यांना ‘नसबंदी करून घ्या किंवा छळछावणीत जा.’ असे दोन पर्याय देण्यात आले होते. तिथल्या डॉक्टरांनी पैसे घेऊन अनेकांना नसबंदीची खोटी प्रमाणपत्रे दिल्याने या योजनेचा फज्जा उडाला व सर्वानाच नंतर मृत्यूच्या दारात पाठवण्यात आले. याआधी मर्यादित काळासाठी दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळवण्याची परवानगी देण्यात आली. ऑटो फ्रँकने त्यासाठी अयशस्वी प्रयत्नही केला. हळूहळू परिस्थिती अवघड होत गेली. कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांवर नाझी व्यवस्थेचा दबाव वाढू लागला तशी त्यांच्यावर काही देवघेव करून स्वत:चा जीव वाचवण्याची वेळ आली आणि ‘‘ओ रिंग रिंग ओपन वाइड अ‍ॅण्ड लेट अस आउट..’’ ही अ‍ॅन फ्रँकची प्रार्थना व्यर्थ ठरली.

पुस्तकात शेवटी कुठल्या व्यक्तीने फ्रँक कुटुंबाचा पत्ता फोडला असण्याची शक्यता आहे, त्याचे नावही आहे. त्या व्यक्तीकडे फक्त पत्ता होता, त्या पत्त्यावर कोण होते ते त्याला माहीत नव्हते. ऑटो फ्रँक परत आल्यावर त्याने त्या व्यक्तीचे नाव शोधले होते. पण ते त्याने का उघड केले नाही हेदेखील, पुस्तक वाचल्यावर समजते.

पुस्तकातला हा निष्कर्ष म्हणजे कुठल्या व्यक्तीवरचे आरोपपत्र नाही. तज्ज्ञांनीही, ‘त्या व्यक्तीविरुद्ध जमवलेला पुरावा फार क्षीण आहे’ असे म्हटले आहे. पण  व्हिन्स पँकोके व त्याच्या टीमची शोधयात्रा अस्वस्थ करते. वाचताना, ‘माणूस असा असतो का?’ हा प्रश्न आपल्याला पडतो. काही घटना तर अशा आहेत की ज्यात लोकांनी, त्यांच्याकडून घडलेल्या लहानसहान गुन्ह्यात दंड भरावा लागू नये म्हणून ज्यू लपलेल्या जागा उघड केल्या. रशियन ‘गुलाग’मधून परत आल्याआल्या लेखक सोल्झेनित्सिनने म्हटले ते लेखिकेने प्रास्ताविकात उद्धृत केले आहे. ते विधान आहे, ‘‘प्रत्येक समाजाची वाईट गोष्टी वा संकट सहन करण्याची एक मर्यादा असते. एकदा ती सीमारेषा ओलांडली गेली, की काहीही घडू शकते.’’ पातळी वाढत जाणाऱ्या पाण्यात पिल्लासह उभी असलेली माकडीण आपल्याच पिल्लाला कधी पायांखाली घेणार हे अखेर तिच्या उंचीवर अवलंबून असते. हे पुस्तक ‘ज्यूंच्या नरसंहारावरचे टिपिकल पुस्तक’ नाही; तर टोकाचा दबाव असताना समाज कसा वागतो त्याचे हे चित्रण आहे.

द बिट्रेअल ऑफ अ‍ॅन फ्रँक

लेखिका : रोझमेरी सलायवान

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स

पृष्ठे : ३३६ , किंमत  : ७९९ रु.

kravindrar@gmail.com