जम्मू-काश्मीरमध्ये बारा वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात पुराने हाहाकार माजवला होता. त्या पुरातून सावरल्यानंतर तिथल्या लेखकांनी एक कथा-वाचनमंडळ सुरू केले. दर शनिवारी एका घरात जमून काश्मिरी किंवा ऊर्दू भाषेतील कथन साहित्य वाचायचे. त्यावर चर्चा-संवाद आणि टीका करायची. पुढल्या शनिवारी पुन्हा त्याच कथेचे इंग्रजी भाषांतर करून त्याचेही वाचन करायचे. या प्रयोगाचा ‘फ्रण्टलाइन’ने केलेला वृत्तलेख दखल घेण्याजोगा. भाषा आणि साहित्य टिकवायसाठी प्रयत्न म्हणून हा उपक्रम. पण आपलीच गोष्ट नव्या पिढीने अंगीकारलेल्या इंग्रजी पेहरावात कशी दिसते, तेही उमजून घेण्याची तयारी. सतत धगधगत्या बातम्यांसाठी परिचित असलेल्या शहरातील कथाप्रेम उमजून घेण्यासाठी हा दुवा पडताळून पाहा.
https:// tinyurl. com/ nav72 mk4
कथा-निबंधखंडांची मुखपृष्ठे…
मारिनर बुक्सतर्फे (पूर्वाश्रमीची एचएमएच) निघणारे ‘बेस्ट अमेरिकन’ मालिकेतील कथा-निबंध, रहस्य-विज्ञान-पर्यटन आणि खाद्यविषयक लेखनाचे वार्षिक खंड यंदा २० ऑक्टोबर रोजी एकत्रित प्रकाशित होतील. अगदीच साध्या आणि एकसाची मुखपृष्ठांनी शंभराहून अधिक वर्षे हे खंड प्रकाशित झाले. पण गेल्या वर्षापासून प्रत्येक खंडाला आकर्षक चित्रांनी सजविण्यात येते. यंदाची सारी मुखपृष्ठे आधीच जाहीर करण्यात आलीत. व्हिएत थान न्युइन या व्हिएतनामी-अमेरिकी कादंबरीकाराचे संपादन यंदाच्या कथाखंडाला लाभलेय. त्याच्या मुखपृष्ठासह कथाखंडात कुणा-कुणाच्या वीस कथा निवडण्यात आल्यात त्याचा तपशील जाणून घेण्यासाठी खालील दुवे उपयुक्त.
https:// tinyurl. com/5 yh8 pvc4 n https:// tinyurl. com/5 yxtakpz
शब्दकोशकार आणि रहस्यकथा…
ऑक्सफर्ड प्रेसमध्ये शब्दकोशाचे काम बरीच वर्षे केलेल्या सुझी डेण्ट या लेखिका रहस्यकादंबरीकार म्हणूनही ओळखल्या जातात. ब्रिटनमधील एका टीव्ही कार्यक्रमात त्या सातत्याने झळकतात- हा कार्यक्रम डोक्याला ताण देणारा… शब्द आणि गणिताची उकल करणारा! भाषा या विषयावरील अकथनात्मक पुस्तके देखील त्यांनी लिहिलीत. पण सध्या त्यांचे नाव चर्चेत आहे, ते ‘डेथ रिट लार्ज’ या कादंबरीसाठी. याच आठवड्यात कादंबरीचे प्रकाशन झाले. ‘ऑब्झर्व्हर’ने यानिमित्ताने गेल्या आठवड्यात त्यांची मुलाखत घेतली. शब्दकोशकारांना त्या एकप्रकारचे ‘डिटेक्टिव्ह’ मानतात. निरनिराळ्या शब्दांच्या अर्थासंबंधी ऑक्सफर्ड प्रेसमध्ये चालणार्या प्रक्रियेला कथानकाचा भाग करतात. त्यांच्या कथानकातील शब्दकोशकार पोलिसांना गुन्हेउकलीस मदत करतात. या मुलाखतीत शब्दकोशकार म्हणून डेण्ट यांच्या कामाचा तपशील कळेल. नवीन शब्दांचा ‘डिक्शनरी’त सहभाग होताना काय रान घडू शकते, त्याची सोदाहरण चर्चा देखील इथे आलीय. ‘कोच पोटॅटो’ या शब्दावरून घडलेल्या वादाबद्दलही माहिती होईल. पण नुसते तेच का? शब्दांवर चिंतन असलेली त्यांची जुनी मुलाखत यूट्यूबवर पाहाता येईल. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये शब्दार्थप्रेम कसे निर्माण करावे, हे सांगणारा टिपायुक्त लेख आपल्याकडच्या ताज्या पालकांनाही उपयुक्त ठरावा.
https:// tinyurl. com/2 z22 bv6 d
https:// tinyurl. com/ mtx4 c343
https:// tinyurl. com/4 w9 wwwxr
