scorecardresearch

Premium

बुकबातमी: पुस्तकविक्रीच्या आकडेवारीचं बुकरोत्तर आकलन..

आयर्लंड या युरोपातील देशाचे क्षेत्रफळ ८४ हजार ४२१ चौ. कि.मी इतके आहे. (महाराष्ट्राच्या ३०,८००० चौ. कि.मीहून किती कमी ते कळू शकेल.

Booknews A post book understanding of bookselling statistics
बुकबातमी: पुस्तकविक्रीच्या आकडेवारीचं बुकरोत्तर आकलन..

आयर्लंड या युरोपातील देशाचे क्षेत्रफळ ८४ हजार ४२१ चौ. कि.मी इतके आहे. (महाराष्ट्राच्या ३०,८००० चौ. कि.मीहून किती कमी ते कळू शकेल. पण २,४३, ६१० चौ. कि.मी आकार असलेला आख्खा ब्रिटनही आपल्यापेक्षा लहानच आहे). २०२१ च्या जनगणनेनुसार आर्यलडची लोकसंख्या ५०.३ लाख इतकी आहे. आता क्षेत्रफळाची तुलना केली तर महाराष्ट्रातील मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या किंवा पुस्तके वाचू शकणाऱ्यांची संख्याही आर्यलडच्या तुलनेत कितीतरी पटीत बसू शकते. पण पुस्तकांविषयी, पुस्तक विकत घेण्याविषयीची दरडोई अनास्था तिकडे किती ‘नसते’ हे ‘आयरिश टाइम्स’च्या दोन दिवसांपूर्वीच्या बातमीतून उघड झाले.

पॉल लिंच या सप्ताहारंभी बुकर मिळालेल्या आयरिश लेखकाच्या निमित्ताने या आकडेवारीचे कुतूहल महत्त्वाचे. नॉर्दर्न आर्यलडमधल्या लेखिका अ‍ॅना बर्न्‍स यांच्या ‘मिल्कमन’ या कादंबरीचे बुकरसाठी नामांकन २०१८ साली झाले, तेव्हा आर्यलडसह ब्रिटनमधील मुख्य पुस्तक दालनांतील संगणकीय नोंदींनुसार बुकरच्या ‘मिल्कमन’च्या खरेदीत काहीच आठवडय़ांत ८८० पटीने वाढ झाली. (यात मुद्रित आणि ईबुक्स पायरसीचा समावेश नाही) नामांकनापूर्वीच्या आठवडय़ांत ९६३ प्रती विकल्या गेल्या होत्या. नामांकनानंतरच्या आठवडय़ात ९,४४६ प्रती खरेदी झाल्या. गंमत म्हणजे पारितोषिक या कादंबरीला मिळाले, तेव्हा फक्त एका आठवडय़ात १८, ७८६ प्रतींची विक्री झाली. (आपल्याकडच्या एका पुस्तकाच्या अठरा किंवा छत्तीस आवृत्त्या धरता येतील.)

Maharashtra State Backward Classes Commission the survey of Maratha community and open category citizens has started pune news
पुण्यात मराठा सर्वेक्षणाला वेग: ‘एवढ्या’ कुटुंबांची माहिती झाली संकलित
MPSC exam fees
‘एमपीएससी’च्या परीक्षेसाठी अर्ज करता, शुल्क भरताना अडचण आल्यास या सूचनांचे पालन करा
Share Market Highlights Sensex crosses 71000 mark print
Stock Market Today : सेन्सेक्स पुन्हा ७१ हजारांवर विराजमान
Revata Tadvi First voter of Maharashtra resides in Gujarat Chhatrapati Sambhajinagar
महाराष्ट्रातील पहिल्या मतदाराचे वास्तव्य गुजरातमध्ये!

मार्टिन डॉयल या बातमीदाराने गेल्या पाच सहा वर्षांतील बुकर विजेत्या पुस्तकांच्या अधिकृत आकडेवारीचाच पाठपुरावा करीत ही उत्तम बातमी केली आहे. त्याच्या बातमीतील ताजी खूण ‘बी िस्टग’ या पॉल मरे या यंदाच्या बुकर लघुयादीतील आणखी एका आयरिश स्पर्धकाच्या पुस्तकविक्रीचे आकडेही सांगते. ‘बी स्टिंग’ ही भरगच्च कादंबरीच विजेती ठरेल असा ब्रिटनमधील भाकितकारांचा, सट्टेबाजांचा आणि ऑनलाइन समीक्षकांचा दावा होता. त्यामुळे ‘बी स्टिंग’चा खप लघुयादीत जाण्याच्या विकान्तापर्यंत १०,००४ इतका होता, तर विजेत्या ठरलेल्या ‘प्रॉफेट साँग’ या पॉल लिंच यांच्या कादंबरीचा तेव्हापर्यंतचा खप २, ६४३ इतका होता. गेल्या आठवडय़ापर्यंत ‘बी स्टिंग’ची विक्री १८ हजार ५२६ प्रती इतकी होती, तर ‘प्रॉफेट साँग’ची विक्री ८,०९५ इतकी होती. आता या विकान्तापर्यंत अर्थातच पॉल लिंच यांच्या पुस्तकाची विक्री दहा-पंधरा पटींनी वाढलेली असेल आणि पुढल्या विकान्तापर्यंत (पायरसीवेगाने) भारतातील रस्ता-पुस्तक दालनांतील विक्रेत्यांनाही पॉल लिंच हे नाव परिचितही झालेले असेल.

मार्टिन डॉयल यांच्या बातमीतील आकडेवारीचा मुद्दा क्षेत्रफळाने भारतातील राज्यांपेक्षा लहान असलेल्या भागातील लोकांची पुस्तकहौस दर्शविणारा आहे. आपल्याकडे साहित्य अकादमी लाभलेल्या पुस्तकांचे काही स्थानिक भाषांत वेगेवेगे अनुवाद होताना दिसतील. पण पुस्तकासाठी लोक उत्सुकतेने दुकानांत जाताना याच्या निम्मे तरी दिसतील का, याबाबत शंका आहे. याचे कारण भाषिक अस्मितेची आपली दंडथोपटणी केवळ उत्सवांत आणि व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठांवर ‘फॉरवर्डी मॅसेज’ फॉरवर्डण्यापर्यंतच मर्यादित असण्यात आहे. ती दंडथोपटणी ग्रंथांकडे गेली, तर अभिजात भाषेच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल पडलेले असेल. टीव्हीवरील सवंग विनोदाच्या बेटकुळीदर्शक मालिकांमुळे भाषिक जाण होत नसते, तर भवतालाचे भान समकालीन कथा-अकथनात्मक साहित्यच देते हे जपान, दक्षिण कोरिया आणि स्कँडेनेव्हियन राष्ट्रांतील नागरिकांनी सर्वाधिक जाणले आहे. परिणामी या चिमुकल्या राष्ट्रांची आर्थिक आणि सामाजिक प्रगती जगासाठी नजरेत भरणारी आहे. तिथला ग्रंथनिर्मितीसह विक्रीचा आणि अनुवाद होऊन निर्यातीचा वेग महाकाय राष्ट्रांनाही नेहमीच लाजवणारा असतो.

आता मुद्दा पॉल लिंच यांचा. ते गेल्या सोमवारपासून दररोज किमान चार तास आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र आणि संस्थांना मुलाखती देण्यात गुंतले आहेत. बुकरोत्तर विजयापश्चात प्रत्येक दिवशी निद्रावर्धक गोळय़ांद्वारेच झोपू शकत आहेत. बुकरच्या पन्नास हजार पौंडाच्या पुरस्कारापेक्षा अधिक बेगमी पुढल्या काही दिवसांत ते करणार आहेत. पण त्याआधी त्यांच्याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे. ‘द सण्डे ट्रिब्यून’ या डब्लिनमधील वृत्तपत्रात काही वर्षे पत्रकारिता करताना चित्रपट समीक्षक हा अतिरिक्त लेखनभार ते सांभाळत. पुढे देशात वाढते स्थलांतर, त्यातून होणारा वांशिक विद्वेष आणि हिंसाचार पाहात त्यांची ‘रेड स्काय इन द मॉर्निग’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ब्रिटनमधील सहा प्रकाशकांच्या लिलावानंतर ती प्रकाशित झाली. फ्रान्समधील महत्त्वाच्या आंतराष्ट्रीय कादंबरीसाठीच्या पुरस्काराच्या स्पर्धेत ती पोहोचली आणि नंतर पुढल्या कादंबऱ्यांत वास्तव आणि कल्पिताची या लेखकाने गंमत उडवून दिली. ‘प्रॉफेट साँग’ ही कादंबरी लिंच यांनी २०१८ साली लिहायला घेतली. तेव्हा सीरियामधील भीषण स्थितीच्या बातम्या जागतिक बनल्या होत्या.

‘‘नजीकच्या भविष्यातील आर्यलड मांडताना मी सीरियामधील वातावरणात ती घडवत असल्यासारखे लिहीत होतो. ती सीरियामधल्या वातावरणाचाच अंश म्हणून लिहिली जात होती. पण  पूर्ण झाली तेव्हा ती सीरियाबाबत किंवा आर्यलडबाबत बिलकूल नव्हती. तिच्यातील वातावरण हे वैश्विक राजकारणाचे संदर्भ दाखविणारे होते.’’ असे लिंच यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. राजकीय कादंबरी नसूनही दडपशाहीची कहाणी मांडणाऱ्या या आयरिश कादंबरीला बुकर मिळाल्याने या देशातील पुस्तकखरेदीत (आधी होते त्याहून) आणखी प्राण फुंकले आहेत. यंदा चार आयरिश लेखक घाऊकरीत्या बुकरच्या स्पर्धेत असल्यानेही ते घडले असावे!

आकाराने वीसपंचवीसपट असलेल्या महाराष्ट्रात पुस्तकखरेदीतला ‘आयरिश’पणा जेव्हा येईल, तेव्हा भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी चाललेली राजकीय बुभुक्षित खेळी जाणण्याचे आकलन प्रत्येकात आपसूक उतरेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Booknews a post book understanding of bookselling statistics amy

First published on: 02-12-2023 at 00:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×