scorecardresearch

Premium

बुकरायण : वाचणाऱ्यांचे ‘बुकर’वर्ष..

‘बुकरायण’ हे नैमित्तिक सदर यंदाच्या नवव्या वर्षी निराळय़ा स्वरूपात सुरू राहणार आहेच, पण ‘बुकर पारितोषिका’च्या लघुयादीतल्या पुस्तकांकडे वळण्यापूर्वी, कॅनडा आणि आफ्रिकेतल्या ‘बुकर’तुल्य पुरस्कारांवरही एक नजर..

booker award Board of Examiners
‘बुकर’चे यंदाचे परीक्षक मंडळ.. लघुयादीतल्या सहा पुस्तकांसह

पंकज भोसले

नुकतीच ‘बुकर’ पारितोषिकासाठी सहा पुस्तकांची लघुयादी जाहीर झाली, तशी कॅनडामध्येही दर वर्षी, सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘गिलर’ पारितोषिकाची १२ कादंबऱ्यांची दीर्घ यादी घोषित होते. या ‘गिलर’च्या यंदाच्या यादीत मनेका रामन विल्म्स या भारतीय वंशाच्या लेखिकेची ‘रूफटॉप गार्डन’ ही कादंबरी नामांकित आहे. ‘ग्लोब अ‍ॅण्ड मेल’मध्ये पत्रकारिता करणाऱ्या मनेका आधी ‘ओटावा बुक्स ऑफ रिव्ह्यू’मध्ये पुस्तकांवर लिहीत. ‘सीबीसी’ या तेथील राष्ट्रीय वाहिनीच्या कथास्पर्धेत त्यांची कथा गाजली. याशिवाय कॅनडातील कथाकारांचे परमोच्च दैवत असलेल्या अ‍ॅलिस मन्रो यांच्या नावे चालणाऱ्या वार्षिक महोत्सवात मनेका रामन विल्म्स ही युवा पुरस्कार पटकावणारी लेखिका म्हणून चर्चेत होती. तिच्या पहिल्याच कादंबरीला ‘गिलर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. गिलर पुरस्काराच्या स्पर्धेत यंदा बुकरच्या लघुयादीत असलेले सारा बर्नस्टाईन यांचे ‘स्टडी फॉर ओबीडियन्स’ हे पुस्तक देखील आहे. (या बर्नस्टाईन यांचे मूळ कॅनडा असल्यामुळे. त्या राहतात स्कॉटलंडमध्ये आणि तिथे विद्यापीठांत साहित्य शिकविणे हा त्यांचा पेशा.) शिवाय मागे गलेलठ्ठ पुस्तक लिहून बुकर मिळविणाऱ्या एलेनॉर कॅटन यांची ‘बिरनाम वुड’ ही कादंबरी देखील आहे. (कॅटन यांचा मायदेश न्यूझीलंड. मात्र सध्याचे वास्तव्य कॅनडा.) गिलरच्या यादीत इरूम शाजिया हसन हे आणखी एक भारतीय वाटणारे नावही आहे. (पण त्या पाकिस्तानी-कॅनडाजन्मी आहेत) .

yuhan force , Norwegian Nobel Prize in Literature to Euan Foss
नॉर्वेच्या युआन फोस यांना साहित्याचे नोबेल
Sudhir Mungantiwar praised Soham uikey
आयएएसचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ध्येयवेड्या सोहमचे मुनगंटीवार यांनी केले कौतुक!
Harsha Bhogle Cricket Commentary Viral News
क्रिकेटच्या पहिल्या समालोचनासाठी हर्षा भोगलेंना किती मानधन मिळालं? ४० वर्षांपूर्वीची ‘Payslip’ केली शेअर, म्हणाले…
edith grossman
व्यक्तिवेध : एडिथ ग्रॉसमन

‘कॅनडाच्या बुकर’चा तपशील यासाठी दिला, कारण जवळपास ब्रिटनमधल्या बुकर पुरस्कार काळात इतर जगासाठी ही यादी झाकोळली जाते. पण तरी याद्यांतील स्थानाने पुस्तकविक्रीला मोठा हातभार लागतो. बुजुर्ग असो वा नवथर, तिथल्या वाचकांमध्ये नव्या लेखकांना आणि त्यांच्या विचारांना जाणून घेण्याची किती उत्सुकता आहे, हे अशा प्रकारच्या वार्षिक या पुरस्कार सोहळय़ाची धामधूम सुरू झाली की कळू लागते. कॅनडासारखाच ‘आफ्रिकेचा बुकर’ म्हणून ओळखला जाणारा- पण फक्त कथांसाठीचा- ‘केन’ पुरस्कारही या कालावधीतच साजरा होतो. शेकडो कथांमधून निवडल्या गेलेल्या पाच ते सहा कथा या खंडातील विविध देशांतून आलेल्या असतात. यंदा नायजेरियाच्या दोन आणि बोटस्वाना, सेनेगल, युगांडा या देशांतील एकेक कथा पुरस्काराच्या स्पर्धेत आहेत. या लेखकांच्या एकेक कथा म्हणजे आपापल्या देशातील भौगोलिक-सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांना चित्रबद्ध करणाऱ्या कादंबऱ्या आहेत.

या पुरस्कार स्पर्धामधील विजेते आणि उपविजेतेही तारांकित व्यक्तींसारखे आपले लेखकपण मिरवत राहतात, हे त्यांचे वैशिष्टय़. यंदा बुकरची दीर्घ यादी घोषित झाली, तेव्हा एक गमतीशीर बाब दिसली. इकडे भारतीय वाचकगणांना चेतना मारू या भारतीय वंशाच्या लेखिका आणि त्यांची ‘वेस्टर्न लेन’ ही कादंबरी (जणू काही आपल्या देशाचीच प्रतिनिधी) असल्यासारखी वाटली. मुंबईतील प्रसिद्ध आंग्लग्रंथ दुकानांत गेल्या शनिवारी या पुस्तकाच्या विक्रीसाठी आलेल्या सर्व प्रती संपल्या होत्या. तर ब्रिटनमध्ये आपल्या देशाची एकमेव लेखक प्रतिनिधी बुकरच्या लघुयादीत आहे, म्हणून चेतना मारूच्या पुस्तकांवर वाचकांच्या उडय़ा पडत होत्या. दुसरी गमतीशीर गोष्ट म्हणजे लघुयादीमध्ये पॉल लिंच, पॉल मरे हे दोन आयरिश आणि पॉल हार्डिग्ज हे अमेरिकी असे तीन नामबंधू लेखक आहेत. दीर्घयादीत आणखी एखादा पॉल असता, तर त्याचेही नशीब लघुयादीत फळफळले असते, असे वाटण्याइतपत ही निवड आहे.

अ‍ॅसी अ‍ॅद्युजन यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या यंदाच्या बुकर निवड समितीत अभिनेते रॉबर्ट वेब, अभिनेत्री अ‍ॅजुआ अ‍ॅण्डो, कवयित्री मेरी जीन चॅन आणि विल्यम शेक्स्पिअर यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक जेम्स शपिरो यांचा समावेश होता. सहा पुस्तके स्पर्धेत दाखल होण्यापूर्वी १६३ पुस्तकांचा फडशा त्यांनी गेल्या वर्षभरात पाडला आहे. अ‍ॅसी अ‍ॅद्युजन या स्वत: समकालीन कादंबरीकार असून कॅनडाचा गिलर पुरस्कार त्यांना दोन वेळा मिळाला आहे. यंदाच्या बुकर लघुयादीमध्ये नवनवख्या नावांचाच समावेश आहे. गेल्या दोनएक दशकात चार वेळा दीर्घ यादीपुरते स्थान मिळविणाऱ्या एका दिग्गज लेखकाला यंदा पाचव्यांदाही यादीतून बाहेर जावे लागले. आयर्लड, कॅनडा, ब्रिटन आणि अमेरिका या राष्ट्रांतील पुस्तके लघुयादीत आहे. पैकी जोनाथन एस्कोफेरी यांचा पहिलाच कथासंग्रह अमेरिकी असला, तरी आपल्याला दिसणाऱ्या अमेरिका आणि अमेरिकनांपेक्षा वेगळय़ा जगाची माहिती करून देणारा आहे. बुकर, गिलर, केन आणि अमेरिकेतील ‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड’ व ‘पुलित्झर’ पारितोषिकांतून समोर येणाऱ्या कथात्मक पुस्तकांची नावे ही नवे वाचणाऱ्या/अनुभवू इच्छिणाऱ्यांसाठी खूप काही असतात. समकालाचे आकलन करून देणारी ही ताजी साहित्य निर्मिती असते. दीर्घ याद्यांतील ग्रंथ मिळवले, तरी उत्तम वाचनाचा वर्षभर आनंद मिळू शकतो. किंबहुना या निवडक पुस्तकांच्या वाचनासाठी एक संपूर्ण वर्षही कमी पडू शकते. आपली वाचन आणि विचारांची प्रक्रिया सुदृढ करण्याच्या दृष्टीने ते एक पाऊल ठरू शकते.

‘लोकसत्ता’मधून गेल्या आठ वर्षांपासून ‘बुकरायण’ हे सदर बुकरच्या लघुयादीतील पुस्तकांची ओळख करून देते. यंदा किंचित बदललेल्या स्वरूपात ते अनुभवता येणार आहे.

काही वाचन-दुवे :

अमेरिकी लेखक जोनाथन एस्कोफेरी यांची  एक कथा : http://www.passagesnorth.com/archives/issue-38/in-flux-by-jonathan-escoffery

मनेका रामन विल्म्स यांची जुनी कथा  : 

https://www.cbc.ca/books/literaryprizes/black-coffee-by-menaka-raman-wilms-1.5083159 केन पारितोषिकाच्या यंदाच्या स्पर्धेतील पाचही कथा  :   http://www.caineprize.com/

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bookrayan booker awards booker award board of examiners ysh

First published on: 30-09-2023 at 00:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×