scorecardresearch

Premium

ग्रंथमानव : जुन्या चित्रांकडे नव्यानं पाहणारा विद्वान..

जुन्या चित्रांमधून त्यांनी नेमके पोत, डिझाइन्स आणि पॅटर्न या फॅशन डिझायनरांपर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे याचंही पुस्तक झालं.

books by b n goswamy tribute to b n goswamy
बी. एन. गोस्वामीं

बी. एन. गोस्वामींच्या नावातली ‘बीएन’ ही अक्षरं ब्रिजेन्द्रनाथ या त्यांच्या नावाची आहेत, हे त्यांच्या मृत्यूनंतरच अनेकांना कळलं असणार. या नावाचा संबंध कृष्णलीलांच्या व्रजभूमीशी आहे आणि ती भूमी किती प्राचीन हे सांगायला नकोच. गोस्वामींची कर्मभूमी असलेलं चंडीगढ मात्र नव्यानं वसवलं गेलेलं  (तेही फ्रेंच वास्तुविशारदाकडून वगैरे) शहर.. या शहराचा सांधा प्राचीन कलाप्रवाहांशी जोडण्यात गोस्वामींचा मोठा वाटा होता. चंडीगढच्या पंजाब विद्यापीठातलं कला संग्रहालय गोस्वामींमुळे नावारूपाला आलं. राज्यस्तरीय ललित कला अकादम्या अनेक आहेत, पण पंजाबच्या ललित कला अकादमीचं नाव संशोधनासाठी अधिक झालं ते गोस्वामींच्या अनेक शिष्यांमुळे. गोस्वामी यांनी किमान २७ पुस्तकं, भारताच्या दृश्यकला-वारशाबद्दल लिहिली. त्यातही चित्रांबद्दलची पुस्तकं अधिक, हे विशेष. कारण प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अभ्यास पुरातत्त्वशास्त्राच्या अंगानं होतो आणि त्याला कलेतिहास म्हणूनही मान्यता मिळते. पण हातात धरून पाहाता येण्याजोगी (या चित्रांना ‘लघुचित्रं’ म्हणून ओळखलं जातं, पण गोस्वामींना या शब्दानं चित्राच्या आशयावर अन्याय होतो असं वाटे, म्हणून ‘हॅण्ड हेल्ड पेंटिंग्ज’) चित्रं कागद अथवा कापडावर रंगवण्याच्या कितीतरी शैली भारतात सोळाव्या शतकापर्यंत विकसित झालेल्या होत्या.  या चित्रांचे चित्रकार मात्र अज्ञात होते, किंवा चित्रावर कुठंतरी नावाचा उल्लेख असूनही त्या गतकालीन चित्रकारांना स्वत:ची अशी काही ओळखच नव्हती.. ही ओळख मिळवून देण्याचं काम पहिल्यांदा बी.एन. गोस्वामी यांनी केलं. ते कसं?

हेही वाचा >>> देशकाल : मध्य प्रदेश बदलाच्या उंबरठय़ावर..

dr ashok da ranade archives, dr ashok da ranade archives pune, dr ashok da ranade archives pune information in marathi
वर्धापनदिन विशेष : प्रयोगकलांसाठी कटिबद्ध ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज’
Manasamajhavan a disturbing novel by sangram gaikwad
अस्वस्थ करणारी कादंबरी
do you know these animals that traveled in space
माकडांपासून ते माश्यांपर्यंत ‘या’ प्राण्यांनी केला आहे अंतराळ प्रवास! जाणून घ्या ‘ही’ रंजक माहिती….
kalakaran Artwork Examinations for Arts Courses
कलाकारण: माध्यमांची परीक्षा पाहणाऱ्या कलाकृती

नैनसुख या चित्रकाराबद्दल गोस्वामींनी अख्खं पुस्तक लिहिलं. अठराव्या जसरोटा संस्थानचे राजे बलवंतसिंग यांच्या पदरी चित्रकार म्हणून नैनसुख हा गुलेर या गावातून आला होता. त्यासाठी गोस्वामी गुलेरला गेले. नैनसुखची वंशावळ त्यांनी शोधली. या भारतीय चित्रकलेत केवळ विविध शैलींचीच वैशिष्टय़ं जपली जात होती असं नाही, तर अनेक कुटुंबं होती आणि ती आपापल्या विशिष्ट पद्धतीनंच काम करायची, हे गोस्वामींनी सिद्ध केलं. या चित्रकार-कुटुंबांचा शोध घेण्यासाठी त्यांनी काय करावं? अनेक तीर्थक्षेत्रांमधल्या पंडय़ांकडे ते गेले,

तुमच्याकडे कुणा यजमानाचा उल्लेख चित्रकार म्हणून आहे का, असं विचारू लागले. यापैकी अनेक पंडय़ा लोकांनी गोस्वामींना मदत केली.. म्हणजे अख्खं बाड धुंडाळू दिलं. त्यातूनही अनेक चित्रकारांची नावं-गावं मिळाली. त्यांची ही वणवण कुठेकुठे स्फुटलेखन, भाषणं, क्वचित शोधनिबंध स्वरूपात कारणी लागत होतीच, पण ‘पहाडी मास्टर्स – कोर्ट पेंटर्स ऑफ नॉर्दर्न इंडिया’ या पुस्तकातून तिचं सार्थक झालं. या पुस्तकाची १९९० मधली आवृत्ती जर्मन भाषेतली (म्हणजे अनुवादित) आहे आणि तोवर हायडेलबर्ग विद्यापीठात गोस्वामी अभ्यागत प्राध्यापक म्हणून जाऊ लागले होते हेही

कुठकुठल्या संग्रहात असलेल्या कलाकृतींचा अभ्यास करणं, हे कलेतिहासकारांचं कामच. ते गोस्वामी यांनी अनेक प्रकारे केलं. उदाहरणार्थ, शीख गुरुद्वारांमधून आणि देशी- विदेशी संग्रहालयांतून शीख धर्माशी संबंध असलेल्या चित्रांचा अभ्यास करून ‘आय सी नो स्ट्रेंजर- अर्ली सिख आर्ट न इंडिया’ हे पुस्तक सिद्ध झालं. ‘द वर्ड इज सेक्रेड’ या पुस्तकातून सचित्र पोथ्यांचा तौलनिक अभ्यास त्यांनी मांडला.  म्हैसूरमध्ये एकोणिसाव्या शतकात रंगवलं गेलेलं, पण पुढे एडविन बिन्नी यांनी सॅन दिएगो संग्रहालयाला दिलेल्या तब्ब्ल १४०० कलाकृतींचा भाग म्हणून अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात आलेलं ‘भागवत पुराणा’चं सचित्र हस्तलिखितही अभ्यासून गोस्वामींनी ‘द ग्रेट मैसोर भागवता’ हे २०० चित्रांबद्दल टिप्पणी करणारं पुस्तक लिहिलं.

अहमदाबादच्या कॅलिको वस्त्र संग्रहालयाबाबत याच्या बरोब्बर उलटा प्रकार घडला. इथं जुन्या काळाच्या काही अंगरखे वा अन्य पोशाखांच्या प्रतिकृती बनवून हव्या होत्या, त्यासाठी तरुण ताहिलियानी, रितू कुमार वगैरे अव्वल फॅशन डिझायनर काम करायला तयार होते. पण ‘त्या काळातल्यासारखेच’ पेहराव बनवणार कसे? त्यासाठी बी. एन. गोस्वामी यांचीच मदत घेणं अपरिहार्य ठरलं. जुन्या चित्रांमधून त्यांनी नेमके पोत, डिझाइन्स आणि पॅटर्न या फॅशन डिझायनरांपर्यंत पोहोचवले. विशेष म्हणजे याचंही पुस्तक झालं.

हेही वाचा >>> अग्रलेख: ‘सहाराश्रीं’ची श्रीशिल्लक!

गोस्वामींची अनेक पुस्तकं कॉफीटेबल बुकांसारखी, दिखाऊ आहेत असं कुणाला वाटेल. पण आकार जरी दिखाऊ पुस्तकांसारखा मोठा असला तरी गोस्वामींच्या लिखाणात अभ्यासाबरोबरच, चित्राचं मर्म लोकांपर्यंत पोहोचवण्याची कळकळ असायची. भारतीयतेचा शोध आपण घ्यायचा आहे, हे भानसुद्धा त्यांच्या लिखाणात दिसायचं. ‘द स्पिरिट ऑफ इंडियन पेंटिंग’ हे जाडजूड पुस्तक या भारतीयतेबद्दलचं गोस्वामी यांचं विधान ठरणारं होतं. वैविध्य हा भारतीयतेचा प्राणच, पण हे वैविध्य आपापल्या परीनं जपलं जाण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीपेक्षा – विशेषत: ‘दिलेल्या’ किंवा ‘नाकारलं गेलेल्या’ स्वातंत्र्यापेक्षाही- कलाकारांना असणारी ‘स्वत्वाची जाणीव’ अधिक महत्त्वाची असते, असा अध्याहृत संदेश या पुस्तकातनं अलगदपणे मिळत होता. २०१४ च्या डिसेंबरात प्रकाशित झालेल्या त्या पुस्तकाबद्दल ‘बुकमार्क’ पानावर अभिजीत ताम्हणे यांचा ‘भारतीय लघुचित्रांचे मोठेपण सांगणारा ग्रंथराज’ हा लेख ३ जानेवारी २०१५ रोजी आला होता. ज्यांची अनेक पुस्तकं येणाऱ्या काळासाठी महत्त्वाची ठरतील, अशा ग्रंथमानवांपैकी गोस्वामी निश्चितच होते. त्यांना ‘लोकसत्ता’तर्फे आदरांजली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Books by b n goswamy the spirit of indian painting book by b n goswamy tribute to b n goswamy zws

First published on: 18-11-2023 at 05:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×