देशाच्या उत्तरेकडच्या सीमांवरचं आयुष्य खूपच खडतर. सतत कोसळणार्‍या दरडी आणि हिमस्खलनामुळे वारंवार बंद होणारे रस्ते, मानवी शारीरिक क्षमतांची परीक्षा पाहणारं हवामान आणि सीमेपलीकडून कधी काय होईल याची शाश्वती नाही अशा या सार्‍या अनिश्चिततेतही स्थानिकांना आणि पर्यटकांना एक विश्वास दिलासा देतो, तो म्हणजे- संकटात सापडलो, तर ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेनश’ (बीआरओ) किंवा लष्कर नक्की मदतीला येईल.

विरळ हवेशी झगडणारा रुग्ण असो वा रस्ता बंद होऊन कोंडीत अडकलेले प्रवासी असोत, यापैकी कोणीतरी मदतीला धावून येतंच. बीआरओचं मुख्य काम खरं तर रस्ते बांधण्याचं, पण त्यापलीकडेही अनेक जबाबदार्‍या ती या भागात पार पाडते. रस्ते, बोगदे, पूल, रुग्णालयं, दवाखाने या यादीत आता भर पडली आहे ती अनोख्या छोटेखानी ग्रंथ केंद्रांची. लष्करानेही जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळच्या गावांसाठी एक वाचनालय सुरू केलं आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात शाळा आणि पर्यटनस्थळांवर ‘कीप अ बुक, टेक अ बुक’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या ग्रंथ केंद्रांमुळे विद्यार्थी, स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना पुस्तकं सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. वाचून झालेली पुस्तकं ठेवून त्या बदल्यात नवी मिळू लागल्यामुळे वाचनातील वैविध्यही वाढलं आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये वाचनाची आवड वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

या ग्रंथ केंद्रांची रचना पारंपरिक ग्रंथालयांसारखी अजिबात नाही. ग्रंथालयांचा बंदिस्त साचा मोडून खुल्या हवेत आणि रम्य वातावरणात वाचनाचा आनंद ही ग्रंथालये मिळवून देतात. या स्वरूपामुळे तिथे येणार्‍या वाचकांना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि आपले अनुभव इतरांना सांगण्याचीही संधी मिळते. रस्त्यांचं जाळं उभारणार्‍या या संस्थेने वाचन केंद्रांच्या माध्यमातून वाचनानुभवांचंही जाळं विणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या ‘प्रोजेक्ट वर्तक’ या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीच्या उपक्रमाअंतर्गत ही ग्रंथ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

भारतीय लष्करानेदेखील जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रणरेषेजवळच्या गावांत राहणार्‍या मुलांसाठी एक ग्रंथालय सुरू केलं आहे. सदैव अनिश्चितता आणि दहशतीच्या सावटाखाली जगणार्‍या आणि इतर भागांतील मुलांना सहज उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या या मुलांना पुस्तकं आणि शैक्षणिक साधनं उपलब्ध व्हावीत, त्यांच्या अभ्यासात आणि सर्वांगीण विकासात खंड पडू नये, हे या उपक्रमामागचं उद्दिष्ट आहे.

शहरी भागांतील विद्यार्थी आणि सीमा भागांतील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या संधींतील दरी भरून काढण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. हे वाचनालय राजौरी भागात आहे. वाचनालयात पाठ्यपुस्तकं तर आहेतच मात्र गोष्टी, कविता आणि सामान्य ज्ञानाची पुस्तकंही उपलब्ध आहेत.