डॉ. जयदेव पंचवाघ

विशिष्ट वेळेसाठी, विशिष्ट उद्देशाने आणि ‘व्यायाम’ म्हणूनच केलेली हालचाल मेंदूची रचना व कार्य यांनाही उपकारक ठरते..

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
lokmanas
लोकमानस: सरकारचे घुसखोरीला प्रोत्साहन?

फक्त वेदनेच्या दृष्टीनेच नाही, तर व्यायामाचा मेंदूच्या एकूणच रचनेवर आणि क्षमतांवर कसा परिणाम होतो हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. एक तर मनोशारीरिक आजारांबदल आज बहुसंख्य लोकांना माहिती आहे. मानसिक असंतुलनाचा शरीरावर परिणाम होतो, त्यातून रोग उद्भवतात हे सर्वसाधारणपणे माहीत आहे. उदा.- मानसिक ताणतणावाने होणारी किंवा वाढणारी डोकेदुखी, कंबरदुखी, अस्थमा, काही त्वचेचे विकार.. इ. यांबाबत काही महिन्यांपूर्वी, इरॅझिस्ट्रेटस या इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात होऊन गेलेल्या डॉक्टरची अत्यंत आश्चर्यकारक कथा मी लिहिली होती.

मात्र मानसिक आजारांचा शरीरावर जसा गंभीर परिणाम होतो तसा शारीरिक आजारांचा मेंदूवर आणि मानसिक ऊर्जेवर कसा आणि काय परिणाम होतो, याविषयीची माहिती महत्त्वाची असण्याचं कारण म्हणजे जसा शारीरिक आजारांचा गंभीर मानसिक परिणाम होतो तसा विविध प्रकारच्या व्यायामांचा मेंदूवर आणि मानसिक ऊर्जेवर सकारात्मक परिणामसुद्धा होतो. 

खरं तर मेंदू, विचार, भावना आणि शरीराचे अवयव, शारीरिक हालचाली यांचा परस्परसंबंध असणं यात आश्चर्यजनक काहीच नाही. आपलं शरीर आणि त्याचे वेगवेगळे अवयव मातेच्या गर्भात कसे तयार होतात हे नीट आठवलं तर याचा क्षणात उलगडा होईल. इंजिन, टायर, सीट, काचा वगैरे स्वतंत्र तयार करून ते एकमेकांना जोडून मोटारगाडी तयार करण्यात येते, तसं मानवी शरीराचं नाही. स्त्री आणि पुरुष बीज यांचा संयोग होऊन सुरुवातीला फक्त एक पेशी असते. या एका पेशीपासून संपूर्ण शरीर तयार होतं. आपल्या पायाचा अंगठा आणि मेंदू हे दोन्ही भाग एके काळी एकच पेशी होते, हे समजून घेतलं तर सगळाच उलगडा क्षणात होईल. म्हणजेच आपलं संपूर्ण शरीरच एका पेशीची प्रसरण पावण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे शरीराच्या एका भागाचा दुसऱ्या भागावर परिणाम होत नसेल तरच उलट नवल म्हणावं लागेल. त्यामुळेच जसा मानसिक ऊर्जेचा शरीरावर परिणाम होतो तसाच शारीरिक हालचालींचा फक्त भावना आणि विचारच नाही तर मेंदूच्या सूक्ष्म रचनेवरसुद्धा परिणाम होतो. त्यामुळे मनोशारीरिक परिणामांप्रमाणे शरीर- मानसिक परिणामसुद्धा तेवढेच तीव्र असतात. भारतात प्राचीन काळी विकसित झालेलं मर्म-विज्ञान ही याचीच पावती आहे ज्याला आज आपण अ‍ॅक्युप्रेशर आणि अ‍ॅक्युपंक्चर म्हणतो हे मर्म-विज्ञानापासूनच निर्माण झालेले आहेत.

हालचालींमध्ये सुसूत्रता लागणारे खेळ, व्यायाम, नृत्य, योग यांचा मेंदूच्या आणि एकूणच मज्जासंस्थेच्या आजारांवर सकारात्मक परिणाम होतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. व्यायामाचा फक्त विचार व भावनाच नव्हे, तर मेंदूच्या प्रत्यक्ष रचनेवरही परिणाम होतो हे आता सिद्ध झालं आहे. व्यायामामध्ये वयोपरत्वे होणारी मेंदूची झीज (ब्रेन अ‍ॅट्रोफी) कमी करण्याची क्षमता आहे. योगासनांचा मेंदूवर होणारा परिणाम अभ्यासणारे शोधनिबंध गेल्या वीस वर्षांत खूपच मोठय़ा प्रमाणात प्रसिद्ध झाले. त्यातल्या चांगल्या प्रतीच्या संशोधनांचा एक समान निष्कर्ष असा की, योगासनांच्या नियमित अभ्यासाने मेंदूतील पेशी वयानुसार झडण्याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी होते.

मेंदूचा जो पृष्ठभागालगतचा चेतापेशी आणि त्यांच्या एकमेकांमधल्या संपर्क स्थानांचा भाग असतो त्याची जाडी योगासनांमुळे वाढते. विशेषत: हिप्पोकॅम्पस, व्हेंट्रोलॅटरल फ्राँटल ब्रेन (व्हीएलएफबी), सिंग्युलेट गायरस, ईन्सुला आणि अमिग्डेला या भागातल्या चेतापेशींच्या थराची (ग्रे मॅटर) जाडी वाढते. या भागांचा विशेषत: स्मरणशक्ती, भावना, वेदनेचे पृथ:करण, ताणतणाव नियंत्रण या कार्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. व्यक्तीमध्ये शांत, कणखर आणि स्थिर भावनिक पार्श्वभूमी बनवण्यात या भागांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान असतं.

मेंदूच्या या भावनिक आणि वैचारिक ‘पार्श्वभूमी’ला डिफॉल्ट मोड नेटवर्क (डीएमएन) असं नाव आहे. साध्या शब्दांत सांगायचं झालं तर विशिष्ट कुठलंही कार्य न करता शांत स्थितीत असलेल्या मेंदूमध्ये पार्श्वभूमीत ज्या चेतापेशींचं जाळं (नेटवर्क) कार्यान्वित असतं त्याला ‘डीएमएन’ म्हणतात. हे नेटवर्क प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडय़ाफार फरकानं वेगवेगळं असतं. ‘फंक्शनल एमआरआय’ या तपासणीद्वारा हे जाळं दिसू शकतं. सध्या मानसिक स्वास्थ्याचा एक निदर्शक म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि त्यावर मोठय़ा प्रमाणात संशोधन चालू आहे. निरनिराळय़ा मानसिक आजारांत या नेटवर्कमध्ये बदल झालेले दिसतात. योगासनं आणि एकूणच नियमित व्यायामांमुळे या नेटवर्कमध्ये चांगले बदल होतात, असं प्रयोगाअंती दिसून आलं.

फक्त योगच नव्हे तर नेहमी केल्या जाणाऱ्या व्यायामाचा मेंदूची रचना व कार्यावरचा परिणामसुद्धा अत्यंत खोलवर तपासला जात आहे. या संदर्भात जे संशोधन आतापर्यंत झालं त्याचे निष्कर्षही आशादायी आहेत. या ठिकाणी व्यायाम या शब्दाचा अर्थ फक्त शरीराची हालचाल करणं असा नाही. उदाहरणार्थ भाजी घेऊन येण्यासाठी झालेलं चालणं यात धरलेलं नाही. विशिष्ट वेळासाठी, विशिष्ट उद्देशानं आणि ‘व्यायाम’ म्हणूनच केलेली हालचाल यात अभिप्रेत आहे. चेतापेशींचं मेंदूमध्ये जे जाळं असतं, त्यात या पेशींपासून निघणाऱ्या चेतातंतूंचे एकमेकांशी येणारी संपर्कस्थानं (सायनॅप्स) महत्त्वाची असतात. व्यायामामुळे हे जाळं आकारानं मोठं होऊ शकतं. विविध भागांतील चेतापेशींमधला संपर्क सकारात्मक किंवा नकारात्मक दृष्टय़ा बदलला जाऊ शकतो. आपल्या आयुष्यात येणाऱ्या निरनिराळय़ा अनुभवांमुळे, आव्हानांमुळे आणि आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कार्यामुळे मेंदूतल्या एकमेकांपासून दूर असलेल्या भागांमध्ये संपर्क नव्यानं स्थापन होतात. मेंदूच्या या क्षमतेला ‘न्यूरोप्लास्टिसिटी’ म्हणजेच चेताकार्य परिवर्तनशीलता असं म्हटलं जातं.

ही परिवर्तनशीलता आयुष्याच्या पहिल्या दहा वर्षांमध्ये सर्वोच्च असते. उदा.- एखाद्या दीड वर्ष वयाच्या बाळाच्या मेंदूचा एक अर्ध-भाग काही कारणाने निकामी झाला किंवा विशिष्ट शस्त्रक्रियेनं तो काढावा लागला तरीसुद्धा हळूहळू दुसऱ्या अर्ध-भागातील चेतापेशी कायमच्या गेलेल्या भागाचं कार्य काही प्रमाणात शिकू शकतात, म्हणजेच अशी व्यक्ती मोठेपणी व्यवस्थित चालू शकते किंवा दोन्ही हातांचा उपयोगही करू शकते. याउलट एखाद्या मध्यमवयीन व्यक्तीमध्ये जर अशा प्रकारे मेंदूचा अर्ध-भाग नाहीसा झाला तर त्याच्या विरुद्ध बाजूचे हात आणि पाय हे कायमच अपंग होतात म्हणजेच पॅरालाइज्ड होतात. (अशा स्थितीतसुद्धा काही नेटानं, वारंवार केलेल्या व्यायाम प्रकारांमुळे (फिजिओथेरपी) जगल्या-वाचलेल्या चेतापेशी हे कार्य काही प्रमाणात शिकू शकतातच. पण अल्प प्रमाणात)

वयोमानानुसार चेतापेशी हळूहळू झडत जातात आणि आयुष्यभर आलेल्या विविध कडूगोड अनुभवांमुळे या चेतापेशींमधल्या संपर्क-जाळय़ामध्येसुद्धा अनिष्ट बदल होत जातात. नियमित केल्या गेलेल्या व्यायामामुळे हे बदल कमी प्रमाणात होतात. एवढेच नाही तर चेतापेशींची संख्या, चेतातंतूंना फुटणाऱ्या शाखा आणि त्यातील नवीन संपर्कस्थानं बदलत आणि सुधारत जातात.

आता पुढचा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो की, सर्व व्यायामप्रकारांपैकी या कारणासाठी उपयुक्त ठरणारा व्यायाम कुठला? खरं तर सर्वच प्रकारच्या नियमित व्यायामामुळे फरक पडतो; पण विशेषत: तीन प्रकारचे व्यायाम यात उपयुक्त ठरतात – पहिला म्हणजे एरोबिक व्यायाम. उदाहरणार्थ विशिष्ट वेगानं चालणं, पळणं, डोंगर चढणं, सायकिलग करणं, पोहणं इत्यादी. दुसऱ्या प्रकारचा व्यायाम म्हणजे, ज्यात शरीराच्या विविध भागांच्या अत्यंत सुसूत्र हालचाली केल्या जातात. या हालचाली करण्यासाठी आणि त्या अत्यंत अचूकपणे करण्यासाठी मेंदूतील विविध केंद्रं एकाच वेळी उद्दीपित करावी लागतात. भारतीय शास्त्रीय नर्तन कला या प्रकारच्या हालचालींचं उत्कृष्ट उदाहरण ठरू शकेल.

तिसरा महत्त्वाचा व्यायाम प्रकार योग हा आहे. परंतु याचा खरा उपयोग होण्यासाठी त्याचं मर्म नीट समजून घेणं गरजेचं ठरेल. हा फक्त लवचीकतेसाठी केला जाणारा व्यायाम प्रकार म्हणून केला तर म्हणावा तितका उपयोग होणार नाही. एखाद्या आसनात जाणं म्हणजे विशिष्ट प्रकारे कष्ट घेऊन शरीर वाकवणं असं नसून मानसिक ऊर्जा आणि त्याचं संपूर्ण लक्ष विशिष्ट स्नायूंवर केंद्रित करून तो स्नायू समूह शिथिल करण्याची प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवून केलेला योग अत्यंत उपयुक्त ठरतो. योगाचार्य अय्यंगार गुरुजी म्हणायचे त्याप्रमाणे त्या योगासनामध्ये त्रास न होता शिथिलता, शांती व समाधानाची स्थिती निर्माण होणं गरजेचं आहे.

‘विशिष्ट प्रकारच्या मानसिक ताण-तणावाचा विशिष्ट स्नायू समूहावर परिणाम होऊन ते उत्तरोत्तर कडक होत जातात आणि योगासनांमुळे यावर सकारात्मक फरक होतो’ या गृहीतकावर आज संशोधन सुरू आहे. खरं तर या विषयावर लिहावं तितकं थोडं इतका हा विषय मोठा. शब्दमर्यादेमुळे इथं थांबणं गरजेचं आहे.

(लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

brainandspinesurgery60@gmail.com