देशभरातील राजभवनांत विराजमान महामहिमां-विषयीचा भ्रम दूर केल्याबद्दल ओडिशाचे नियोजित महामहीम ब्रजमोहन राम यांचे त्रिवार अभिनंदन! घटनात्मक पदावर नियुक्ती झाल्याची घोषणा होताच त्यांनी ओडिशात जाऊन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी काम करेन, पक्षाला अधिकाधिक मते मिळावीत यासाठी जिवापाड प्रयत्न करेन असे म्हटले. यातून त्यांनी देशभरातील विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात ‘अतिसक्रिय’ महामहिमांना दिशा दाखवली आहे. पक्षाकडून तीनदा खासदार झालेल्या या सत्यवचनी रामांचा इतिहासच परखड बोलणे असा आहे म्हणे! राजकारणविरहित पदावर नियुक्ती झाल्यावरही ते या सवयीला जागले हे महत्त्वाचे. त्यांच्या प्रामाणिकपणाला दादच द्यावी लागेल.

राजकीय हेतू डोक्यात ठेवून राजभवनात येणार्‍या महामहिमांची आजवर गोची होत असे. पदाची झूल अंगावर पांघरून पक्षहितासाठी काम करताना अनेकांना बंद दाराचा आधार घ्यावा लागे. ‘कुछ लेते क्यू नही’च्या धर्तीवर ‘पार्टी मे आते क्यू नही’ असे विरोधी नेत्यांच्या कानाजवळ जाऊन विचारावे लागे. यात ‘होशियारी’चा (कोशियारी नाही) कस लागे. केंद्राचा दूत की पक्षाचा असा संभ्रम मनात ठेवून काम करावे लागे. ‘मी पक्षविरहित’ असे भाव चेहर्‍यावर सतत ठेवताना मनाला होणार्‍या यातना सहन कराव्या लागत. यातून आता सर्वांची सुटका होईल.

अलीकडे महामहीम व पक्षनिष्ठा यांतील सीमारेषा तशीही धूसर झालीच होती. रामांनी ती एका झटक्यात पुसून टाकली. त्यामुळे केंद्रानेही आता विनाविलंब घटनादुरुस्ती करून राज्याराज्यातले महामहीम हे पक्षप्रतिनिधीच असतील असे विधेयक मंजूर करून घ्यावे. ‘ना रहेगा बास, ना बजेगी बांसुरी!’ तसेही घटनात्मक पदावर विराजमान व्यक्तीने तटस्थता राखणे ही संकल्पनाच आता कालबाह्य ठरली आहे. त्यावर या नवनियुक्तांनी शिक्कामोर्तब करून कार्यरत महामहिमांनाच नाही तर अहोरात्र झटणार्‍या लाखो कार्यकर्त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

आता राजभवनातच पक्षाचे मेळावे घेता येतील. अंतर्गत कुरबुरीवर उपाय शोधता येतील. प्रबोधन शिबिरे आयोजित करता येतील. पक्षविस्तार करून थकल्याभागल्या कार्यकर्त्यांसाठी सरकारी खर्चाने ‘राजभोज’ आयोजित करता येतील. राजभवनावर तिरंग्याबरोबरच पक्षाचा झेंडाही डौलाने फडकवता येईल. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचे उद्योग थांबतील.

इतके दिशादर्शक वक्तव्य केल्याबद्दल सर्व महामहिमांनी एकत्र येत या नवनियुक्तांचा सत्कार तातडीने करायला हवा. त्यांच्या या उघड भूमिकेमुळे आता कोणताही विरोधक महामहिमांना ‘केंद्राच्या हातचे बाहुले’ म्हणण्यास धजावणार नाही. ओडिशात बीजेडी नावाचा गलितगात्र झालेला एक विरोधी पक्ष आहे. नवनियुक्तांना या टीकाखोर पक्षाचा बंदोबस्त तातडीने करावा लागेल. तो केला की ते पक्षविस्तारासाठी मोकळे! त्यांना फक्त एकच काळजी घ्यावी लागेल. तिथे पक्षाचेच मुख्यमंत्री असल्याने दुसरे सत्ताकेंद्र निर्माण होणार नाही याची.

बिहारच्या मौर्य घराण्याच्या सम्राट अशोकाने ओडिशाच्या कलिंगावर स्वारी करून युद्ध लादले. त्यातील नरसंहार पाहून अशोकाला पश्चात्ताप झाला. या विधानाबद्दल असा काही पश्चात्ताप होणार नाही याची काळजी हे नवनियुक्त महामहीम नक्की घेतील व जोमाने पक्षकार्यासाठी झोकून देतील हे निश्चित.