नक्षलवादाच्या उच्चाटनासाठी २००९ साली राखीव पोलिसांसह विशेष दले स्थापण्याचा निर्णय तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी अमलात आणला, तो सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे नेला आणि देशाला ‘नक्षलमुक्त’ घोषित केले. या वाटचालीत सहभागी सुमारे ३७ हजार जवान आणि अधिकारी हे बिग्रेडियर (निवृत्त) बसंतकुमार (बी.के.) पोन्वर यांचे विद्यार्थी! भारतीय स्थलसेनेतील सेवेनंतर छत्तीसगडमध्ये कंकेर येथे २००५ पासून स्थापन झालेल्या ‘काउंटर टेररिझम ॲण्ड जंगल वॉरफेअर कॉलेज’चे प्रमुख या नात्याने त्यांनी हे विद्यार्थी घडवले. मध्य प्रदेशातील महू येथे वयाच्या ७७ व्या वर्षी, २७ जुलै रोजी त्यांचे निधन झाले. ‘बीके’ म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या ब्रिगेडियर पोन्वर यांनी १९७१ च्या बांगलादेश मुक्तिलढ्यातही ‘मुक्तिबाहिनी’सह जमिनीवर कामगिरी केली होती. ‘विशिष्ट सेवा मेडल’ आणि ‘अति विशिष्ट सेवा मेडल’ने त्यांना गौरवण्यात आले होते.

पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) त्यांनी १९६९ मध्ये ‘मराठा लाइट इन्फंट्री’च्या पहिल्या बटालियनमध्ये प्रवेश केला. बांगलादेश मुक्तियुद्धाच्या वेळी ते ‘९५ माउंटन ब्रिगेड’मध्ये होते. या युद्धात बक्षीगंज व कमालपूरचे मोर्चे सांभाळताना, तंगैल येथे सातशे-साडेसातशे भारतीय सैनिक पॅराशूटने सुखरूप उतरावेत यासाठीचा बंदोबस्त करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यानंतरचा बहुतेक काळ बांगलादेशलगतच्या राज्यांत आणि विशेषत: त्या वेळी अनेक सशस्त्र आततायी गटांमुळे अस्वस्थ असलेल्या मिझोरम, आसाम, नागालॅण्ड आदी राज्यांमध्ये त्यांनी काम केले. त्रिपुरामध्ये आसाम रायफल्सचे उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असताना, नागालॅण्डच्या ‘स्वातंत्र्या’साठी १९९९ मध्ये अतिजहाल आयझॅक-मुइवा गटाने काढलेल्या सशस्त्र ‘लाँग मार्च’ला नेस्तनाबूत करण्याची कामगिरी ‘बीके’ यांनीच केली. या कारवाईत १३ नागा फुटीरतावादी ठार झाले होते. परंतु नागांचा लाँग मार्च ही देशविरोधी कारवाईच असल्याचे पुरेसे स्पष्ट असल्यामुळे ते ‘बीके’ यांचे हे आदेश वादग्रस्त ठरले नाहीत. ‘जंगल वॉरफेअर कॉलेज’ हा लघुपट बीके यांच्याच छत्तीसगडमधील कारकीर्दीबाबत २०१३ साली तयार झाला. पण ‘काउंटर टेररिझम ॲण्ड जंगल वॉरफेअर कॉलेज’ ही काही मुळात छत्तीसगडची संस्था नव्हे.तिचा इतिहास १९६७ पासूनचा आहे आणि मिझोरमच्या वैरिंगटे येथे ती १९७० पासून कार्यरत आहे. या संस्थेत आधी ‘बीकें’ची नेमणूक झाली. तिथे त्यांनी ‘गनिमी काव्याला गनिमी काव्यानेच उत्तर’ ही रणनीती प्रादेशिक आव्हानाच्या संदर्भात विकसित केली व तेव्हापासून, अतिरेकी उच्छादाविरोधात आधुनिक रणनीती आखणार्‍या तज्ज्ञांमध्ये बीके यांचे नाव घेतले जाऊ लागले.

त्यांचे या रणनीतीतले योगदान म्हणजे ‘मच्छीमारांच्या जाळ्यासारखी स्थितिस्थापक व्यूहरचना’ त्यांनी दुर्गम भागांत वापरली. या जाळ्याच्या ‘गाठी’ असुरक्षित टापूमध्ये पाच-सहा किलोमीटरवर, तर तुलनेने सुरक्षित भागांमध्ये दहा ते २० कि.मी.वर असाव्यात. ‘कॉल’ येताच चारही किंवा गरजेनुसार दोन वा तीन ‘गाठीं’च्या तळांवरची दले धडक देणार, अशी ही रचना. अर्थात, ‘केवळ बंदुकीच्या बळावर नक्षलवाद शमणार नाही- त्यासाठी अन्य उपायही हवेत’ हे म्हणणे निव्वळ शौर्याचेच आकर्षण असलेल्यांच्याही गळी उतरवण्याइतके उमदेपण ‘बीके’ यांच्या ठायी होते!