कुठल्याशा गोष्टीने झपाटून जाऊन एखादी नवी कलाकृती निर्माण करणे सहजशक्य आहे, पण त्या कलाकृतीचा दर्जेदारपणा आणि लोकप्रियता सातत्याने कैक वर्षे टिकवून ठेवणे ही महाकठीण गोष्ट. खासगी वाहिन्यांच्या सुरुवातीच्या दिवसांत गुन्हेगारी विश्वाचे नाट्य उलगडणारी ‘सीआयडी’ ही मालिका सुरू झाली. दोन दशके या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक कायम राखत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. ओटीटीसारख्या नवमाध्यमावरही दाखल होत ‘सीआयडी’ने आपला लौकिक कायम राखला. या सातत्यपूर्ण यशाचे श्रेय एकाच व्यक्तीकडे जाते ते म्हणजे या मालिकेचे संकल्पनाकार, निर्माते आणि दिग्दर्शक बी. पी. सिंह.

मूळचे डेहराडूनचे असलेल्या ब्रिजेंद्र पाल सिंह यांनी एफटीआयआयमधून सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी १९७३ साली दूरदर्शन वाहिनीवर वृत्त विभागात कॅमेरामन म्हणून कामाला सुरुवात केली. हळूहळू दूरदर्शनवरच विविध कार्यक्रमांमध्ये ते रमले. सिनेमॅटोग्राफी क्षेत्राचा अधिकाधिक अनुभव घेण्यावर भर देत दशकभराहून अधिक काळ कॅमेरामन म्हणून काम केले. सिनेमॅटोग्राफीच्या तंत्रावर त्यांची इतकी हुकमत होती की शेवटपर्यंत उत्तम कॅमेरामन म्हणून ते ओळखले गेेले. त्यांच्या या कौशल्याची प्रचीती ‘सीआयडी’ मालिकेला सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने प्रसारित करण्यात आलेल्या ‘सीआयडी १११’ या विशेष भागाच्या निमित्ताने आली. संपूर्ण १११ मिनिटांचा भाग एकसलग चित्रित करण्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली.

एखादी गोष्ट खोलात जाऊन समजून घेत काम करण्याचा त्यांचा स्वभाव हेच त्यांच्या दीर्घकालीन यशाचे इंगित म्हणता येईल. दूरदर्शनसाठीच त्यांनी सुरुवातीला केलेल्या ‘सिर्फ चार दिन’ या चित्रपटाच्या निमित्ताने मुंबईतील पोलीस अधिकार्‍यांशी त्यांचा संबंध आला. पोलिसांचे तपासकार्य कसे चालते, गुन्हेगाराचा माग कसा काढला जातो, या सर्व गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष पोलिसांबरोबर राहून अनुभवल्या आणि त्यांना एकूणच या प्रकारात रस वाटू लागला. या नव्या अनुभवातून जन्माला आलेली गुन्हेगारी विश्वाची उकल करणारी पहिलीवहिली मराठी मालिका ‘एक शून्य शून्य’. या मालिकेमुळे अभिनेते शिवाजी साटम यांच्यासह मराठी कलाकारांबरोबर त्यांची मैत्री जमली. कथाशैलीच्या बाबतीत त्यांची प्रयोगशीलता हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.

‘सीआयडी’ हा क्राइम ड्रामा, त्याआधी भयपट हा प्रकार दूरचित्रवाहिनीवर फारसा हाताळला गेला नव्हता, त्याची सुरुवातही १९९५ साली बी. पी. सिंह यांनी ‘आहट’च्या माध्यमातून केली. ‘अदालत’ ही कोर्टरूम ड्रामावर आधारित मालिका, ‘सुपरकॉप वर्सेस सुपरव्हिलन’ ही सायफाय मालिका असे प्रयोग त्यांनी निर्माता-दिग्दर्शक म्हणून केले. तंत्रज्ञान आणि बदलत्या काळाची चाहूल घेत त्यांनी केलेल्या या मालिका दूरचित्रवाहिनीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरल्या. आणि म्हणूनच प्रयोगशील आणि सातत्याने दर्जेदार मनोरंजक आशय देणारे निर्माता-दिग्दर्शक ही त्यांची ओळख अधिक सार्थ ठरली.