या मजकुराच्या वाचकांपैकी कुणाचे नातेवाईक अमेरिकेत लॉस एंजलिस किंवा सान होजेला राहातात का? त्यांच्या पैकी कुणी डेमॉक्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत का? समजा असतील, तर त्यांना कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरांच्या पुस्तकाबद्दल कदाचित आधीच माहीत असेल! ज्यांना हे माहीत नसू शकते अशा बाकीच्यांसाठी थोडी प्राथमिक माहिती… अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गेव्हिन न्यूसम यांचं ‘यंग मॅन इन अ हरी’ हे पुस्तक अवघ्या दोन महिन्यांपूर्वी (२६ फेब्रुवारी) प्रकाशित झालं आणि तेव्हापासून, म्हणजे अगदी इराणयुद्ध वगैरे धामधूम चालू असूनसुद्धा या पुस्तकाचा खप ९७ हजार प्रतींवर गेला. पण तो कसा?
हीच तर बातमी. गेव्हिन न्यूसम हे तसे मुरलेले राजकारणी. वयाच्या ३७ व्या वर्षी ते सॅन फ्रान्सिस्कोचे मेयर झाले. तसे २०११ पासून ते कॅलिफोर्नियाचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि २०१९ पासून गव्हर्नरच आहेत. मध्यंतरी २०२१ मध्ये अमेरिकेतला ‘पदावरून परत बोलावण्याचा मतदारांचा अधिकार’ त्यांच्यावर वापरण्याचा प्रयत्न झाला, तो निष्प्रभ ठरवून पुन्हा २०२२ मध्ये ते निवडून आले. तेव्हा त्यांचं आत्मचरित्र वाचनीयच असणार असा अंदाज बांधणं चूक नाही, पण पुस्तक वाचनीय असल्यामुळेच ९७ हजार प्रती खपल्या हे मात्र साफ चूक!
झालं असं की, न्यूसम यांनी घोषणाच करून टाकली- माझ्या समर्थक गटाला (पोलिटिकल ॲक्शन कमिटीला) जमेल तितकी मदत करा… देणार्याने या कमिटीला किती डॉलर दिले, हे न पाहाता प्रत्येक दात्याला माझ्या पुस्तकाची प्रत मोफत मिळेल. न्यूसम यांच्या या पुस्तकाची सवलतीतील किमतसुद्धा २१ डॉलर आहे. पण या घोषणेनंतर ६७ हजार समर्थकांच्या घरांत, कार्यालयांत या प्रती पोहोचल्या. म्हणजेच, या पुस्तकाच्या सुमारे ७० टक्के प्रती मोफतच वाटल्या गेल्या… मराठीतल्या हौशी कवी लोकांनी आपले कवितासंग्रह पाहुुण्यारावळ्यांना मोफत देणं निराळं हो; पण कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरनंही तेच करावं? बरं, यात न्यूसम यांच्या खिशाला खार काहीच नाही… १,५६१,८७५ एवढे डॉलर मोजून या प्रती विकत घेण्याचा आर्थिक भार त्यांच्या पोलिटिकल ॲक्शन कमिटीनंच उचलला. ही बातमी ‘न्यू यॉर्क टाइम्स’नं दिली असून त्यात ‘या मोफत प्रतींसाठी न्यूसम यांनी लेखकाची रॉयल्टी घेतलेली नाही’ असा खुलासाही आहे.
पुस्तकाच्या खपासाठी लेखक, प्रकाशक काय काय करतात, ते आपण ऐकून असतोच, पण पुस्तकाच्या खपासाठी राजकारणदेखील करता येतं, याची प्रेरणा आता भारतात कोणी या न्यूसम यांच्याकडून घेतल्यास नवल वाटणार नाही.
