या एवढ्याशा बेटावर चित्रं विकून त्याचं भागतं. ‘तिकडच्या’ शहरांत कोण जाईल राहायला…
‘हे असं कसं काय इथे(च) असतं?’ हा प्रश्न यावेळच्या मध्य युरोपातल्या काही देशांत भटकताना सारखा पडला.
या भटकंतीची सुरुवात झाली ती क्रोएशियात. त्या देशाच्या भूमीवर पाऊल ठेवताना एक गोरान इवानिसेविच- आणि अलीकडचा लुका मॉद्रिच- सोडला तर मला क्रोएशिया या देशाचं म्हणून कोणीही माहिती नव्हतं. ‘पॅरीसच्या भूमीवर पाय ठेवताना मला जनरल द गॉल सोडले तर फ्रान्सचं अन्य कोणी माहीत नव्हतं’, असं पुलं फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवताना म्हणाले होते. तसं हे दोघे खेळाडू सोडले तर क्रोएशियाचं एकही व्यक्तिमत्त्व मनात नव्हतं. त्यामुळे तिथं पोहोचताना मनाची पाटी अगदी कोरी होती. त्यात झालं असं की तिकडे पोहोचलो आणि दोनेक दिवसांनी पंतप्रधानांचं आवाहन आलं ‘परदेश प्रवास करू नका’ वगैरे. मनात ८ नोव्हेंबर २०१६ ची काळरात्र आठवून धस्स झालं. त्या रात्री जशा आपल्या मूल्यवान चलनी नोटा ‘कागज के टुकडे’ ठरल्या तसं म्हटलं आपल्या विमानतळावरचे अधिकारी परदेशी निघालेल्या भारतीयांना कुठले तरी टुकडे ठरवून ‘‘चला… जा घरी परत’’ असं सांगणार की काय असं वाटून गेलं. पण म्हटलं आता तर आपण परदेशात पोहोचलोय… पूर्वलक्ष्यी प्रभावानं आपल्याकडे कर आकारता येतो; पण आपला दौरा काही तसा रद्द करता येणार नाही. भरपेट जेवण झाल्यावर यापुढे लंघन करायचं बरं का… असं ज्या प्रमाणे खवय्ये मनाला बजावतात तसं पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मनाला बजावलं… पंतप्रधान सांगत नाहीत तोपर्यंत परत परदेश प्रवास करायचा नाही बरं… असं. आणि समोर उलगडत जाणार्या क्रोएशियाचा आनंद घ्यायला सुरुवात केली.
पहिली भावना दाटली ती अपराधीपणाची. हा इतका अप्रतिम भूप्रदेश आपल्या यादीत आधी नव्हता आणि आपण उगाच त्याला कमी लेखत गेलो, याबद्दल मनातल्या मनात त्या देशाची माफी मागून टाकली. अगदी पहिल्या मुक्कामानं- डुब्रोनिकनंच जीव लावायला सुरुवात केली. तिथलं वातावरण पाहून वाटलं या शहरात फक्त तरुणच राहातात की काय ? नंतर हा प्रश्न समग्र क्रोएशियाबाबतच पडायला लागला. एकतर या देशात सगळे- स्त्री/ पुरुष – चांगले उंच. सरासरी उंची साडेपाच-सहा फुटांची. उभयतांची शरीरं इतकी डौलदार की हेवा वाटावा. अंगावर बोटभरही अधिकची चरबी नाही. सगळं काही कमनीय आणि जेवढ्यास तेवढं. या देशातले पुरुष ग्रीक, रोमन पुरुषांशी स्पर्धा करू शकतील आणि ्त्रिरया मेडिटरेनियन देशातल्या महिलांशी. सगळे कसे ताठ. खांदे पाडून चालणारा पुरुष आणि स्त्री या देशातल्या वास्तव्यात औषधालाही सापडली नाही. अर्थात अशा काही औषधाची गरज होती असं नाही. पण हे रंगरूप जाणवण्याइतकं ठसठशीत होतं. आमच्या हॉटेलच्या मॅनेजरला हे बोलून दाखवलं. तर अभिमानानं म्हणाला… वुई आर टॉलेस्ट इन युरोप.
क्रोएशियनांची सरासरी उंची खरंच इतरांपेक्षा जास्त असते. देशच्या देश असा निरोगी पाहून नाही म्हटलं तरी गहिवरूनच आलं. इतक्या गावांत गेलो. कुठेही जा. वर निळंनिळं आकाश. त्यात कापसाचे वाटावेत असे पांढर्या ढगांचे तरंगते पुंजके. भारतातल्या एकाला या निळाईचं कौतुक फोटो पाठवून केलं तर तो राष्ट्रप्रेमी म्हणाला… आपल्याकडे मेघालयातही असंच निळं आकाश असतं. त्याला म्हटलं बाबारे… मी या देशाच्या मुंबई आणि दिल्लीत आहे आणि तरी वरचं आकाश निळं आहे. त्यावर त्याचं अजून उत्तर नाही. असो. तर या देशातल्या भटकंतीत गवसलेल्या एका बेटाची ही कहाणी…
क्रोएशियाविषयीच मुळात दोनपाच शहरं सोडली तर इतकं अज्ञान होतं की त्यात ही बेटं माहीत असायची शक्यताच नव्हती. आम्ही निघालो होतो आकाशातली निळाई समुद्रात कशी उतरत जाते ते पहायला. आणि त्या प्रवासात हे बेट लागलं. नक्की काय वाटलं त्या बेटावर पाऊल टाकल्यावर…? सांगणं अवघड…
चंद्रकोरीच्या आकाराचा एक जमिनीचा तुकडा. दोन टोकांच्या मध्ये समुद्राची नाजूकशी पुळण. तशीच वळणदार. तिथं बोटी, याट वगैरे तरंगतायत. लांबून पाहताना असं वाटलं की सगळं बेटही असं तरंगतय की काय ! पण तसं नव्हतं. या चंद्रकोरीच्या एका टोकाला आमची बोट थांबली. उतरताना पाण्यात पाहिलं. आश्चर्य वाटलं. बोटीची सावली पाण्याच्या तळावर पडलेली स्वच्छ दिसत होती. खोली विचारली तर आमचा बोटवाला म्हणाला दहा फुटाच्या आसपास आहे. आणि तरीही तळ दिसतोय? असं काही पहायची सवय नसल्यानं मी गप्प बसलो. काय बोलणार?
तिथून बेटावर पाय टाकताना चंद्रकोरीचं दुसरं टोक हे असं समोर दिसत होतं इतकं हे बेट लहान. या चंद्रकोरीच्या दोन टोकांत जसा समुद्र तसं मागच्या वळणदार भागासमोर एक टेकडी. हिरवीगार. तिच्यातनं लफ्फेदार रस्ता गेलेला. बेटावर चालायला लागलो. त्या बांधावर दोन हॉटेल्स. शेजारी शेजारी. त्यांना हॉटेल असं म्हणायलाही पाप वाटावं इतकी सुंदर. आयताकृती. मोकळी. एका बाजूचं किचन सोडलं तर अन्य तीन बाजूंनी अगदी उघडी. वर पाहिलं तर छतही नाही.
हे एवढंसं बेट. इतकं शांत. संयत. समाधानी. कसं शक्य आहे? त्या हॉटेलच्या दाराशी स्वागताला एक कॉलेजची वाटावी अशी तरुणी होती. तिला विचारलं… काय लोकसंख्या असेल इथे. ‘साडेतीनशे घरं आहेत’; ती म्हणाली. सगळेच एकमेकांना ओळखतात. प्रश्न पडला इथे हॉटेलात येतं कोण? ती म्हणाली तुम्ही आणि गाववालेही. ती फक्त पाच महिने इथं काम करते. मूळची माँटेनेग्रो या ‘देशाची’. कंटाळा नाही येत इतक्या शांततेचा? ‘‘आला की आम्ही इटलीला जाऊन येतो… हे इथे तर आहे’’.
युरोपची ही गंमत अद्भुत आहे. सगळे एकमेकांचे शेजारी. तरी एकमेकांची प्रायव्हसी, ओळख आणि स्वतंत्र चेहरा जपणारे. त्या तरुणीला म्हटलं…काय सुंदर बेट आहे हे. तर ती म्हणाली : आमचं माँटेनेग्रो यापेक्षाही सुंदर आहे.
मग गावात चक्कर मारली. अध्र्या तासात या टोकापासनं त्या टोकापर्यंत चालत गाव संपतं. सगळी घरं भरलेली. कोणी अंगणात क्रोशाचं काहीबाही करत बसलंय. एखादी आजी पलीकडे- म्हणजे क्रोएशिया, इटली वगैरे- राहणार्या आपल्या नातवासाठी लोकरीचा स्वेटर विणत बसलीये. या चंद्रकोरीच्या मधोमध ऊन खात बसलेल्या गाववाल्यांमुळे आपोआप तयार झालेला एक काफे. दोन आजोबांच्या ग्लासात सकाळी ११ वाजता काहीतरी सोनेरी चमकत होतं. त्यांना चिअर्स करत मागच्या गल्ल्यांत गेलो.
घड्याळ नामक एक यंत्र असतं, ते काळ मोजतं वगैरे काही संकल्पनांचा स्पर्शच या गावाला नाही की काय असं वाटावं असं वातावरण. एका घरात पाहिलं तर एक तरुण उभं राहून चित्र काढत होता. पाहून हसला. म्हटलं येऊ का आत. अगदी उत्साहात या म्हणाला. त्याला विचारलं तू इथलाच का? तर म्हणाला… हो जन्मापासनं इथलाच. सोडून नाही जावं वाटलं कुठे कधी? ‘‘कशाला जायचं? इतकी सुखी-समाधानी जागा असताना…’’, त्याचं उत्तर. एव्हाना माझ्यातला नोकरदार जागा झाला. भीड बाजूला ठेवत विचारलं… पोटा-पाण्याचं काय? त्यानं चित्रांकडे बोट दाखवलं. त्यातलं ‘स्वस्तातलं’ चित्र दोनेक हजार युरोचं (एक युरो साधारण ११४ रुपयांना पडतो.) होतं. कोण खरेदी करतं? ‘‘तुमच्यासारखे पर्यटक किंवा ऑनलाइन’’.
त्या आसमंतातली शांतता रंगात मिसळून त्याच्या कॅनव्हासवर उतरली होती. हे बेट रात्री कसं दिसतं याचं चित्र तो काढत होता. ही चित्रं विकून त्याचं भागतं. ‘तिकडच्या’ शहरांत कोण जाईल राहायला… अशी त्याची प्रतिक्रिया होती.
परतताना बोर्ड लावलेला दिसला. ‘‘भूमध्य समुद्रातल्या शेवटच्या काही उरलेल्या नंदनवनात आपलं स्वागत’’.
बालकवींची ‘चार घरांचे गाव चिमुकले…’ आणि पी. सावळारामांचं ‘मानसीचा चित्रकार तो…’ एकाच वेळी आठवलं.
(क्रमश:)
girish.kuber@expressindia.com
@girishkuber
