क्रोएशियातल्या डुब्रोनिक विमानतळाहून हॉटेलमध्ये घेऊन जाणार्या टॅक्सीचालकाशी गप्पा मारताना सहज विचारलं, ‘‘तू कुठचा?’’ उजवीकडे एक डोंगररांग होती… तिकडे हात करून तो म्हणाला, ‘‘बोस्नियाचा’’. चेहर्यावरचं आश्चर्य बघून तो म्हणाला… ‘‘त्या डोंगराच्या पलीकडे बोस्निया. रोज सकाळी इकडे येतो क्रोएशियात आणि संध्याकाळी घरी. काय करणार… आमच्या देशात नोकर्या तितक्या नाहीयेत.’’
दुसर्या दिवशी भल्या सकाळी आम्ही बोस्नियाकडे. या प्रांताविषयी मला ऐतिहासिक कणव आहे. नाव बोस्निया- हर्झगोवेनिया ऐकलेलं असतं अनेकांनी. पण त्याविषयी फारशी काही माहिती नसते कोणाला. बाकी काही नाही तरी शालेय वयात इतिहासाच्या पुस्तकात पहिल्या महायुद्धाच्या निमित्तानं या प्रांताचा उल्लेख वाचलेला असतो. या प्रांताची राजधानी सारायेवो इथं ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्याचा वारसदार राजपुत्र फर्डिनंड द लेसेप्स याचा स्थानिक तरुणानं खून केला आणि त्यातनं उद्भवलेल्या परिस्थितीतनं पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. या राजपुत्राला मारणारा तरुण सर्बियन. त्याचा मुद्दा अगदी स्थानिक. सर्ब्स आणि बोस्नियन यांच्यातला वाद. पण तो एकदम महायुद्धाच्या पातळीलाच गेला. हे म्हणजे येडशी बुद्रूक गावातल्या उत्सवात दोन मंडळांतल्या वादातनं एकदम भारत-पाकिस्तान युद्धच सुरू व्हावं तसं काही.
खरं तर ऑस्ट्रो-हंगेरी साम्राज्याआधी तो सगळा प्रदेश ऑटोमन साम्राज्याचा भाग होता. ऑटोमन म्हणजे टर्की. आताचं तुर्कीये. काँन्स्टॅटिनोपल ते आताचं इस्तंबुल ही त्याची राजधानी. युरोपात फार कमी ठिकाणी या ऑटोमनांच्या खुणा आढळतात. बोस्निया हे त्यापैकी एक. कुर्रेदार इस्लामी शैलीतल्या इमारती. नक्षीकाम वगैरे. परत यहुदी- म्हणजे ज्युईश- देखील इथं आहेत. ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स, कॅथलिक, इस्लामिक आणि ज्युईश असा संस्कृतीचा चौरंगच हा. काही काळ राहिले गुण्यागोविंदानं. नंतर सुरू झाला संघर्ष. या महासत्तांच्या साठमारीत कधी जिवाला शांतताच मिळाली नाही बोस्नियाला.
त्याच्या खुणा दिसतात तिथं आजही. बोस्निया आहे भौगोलिकदृष्ट्या युरोपात. अगदी समृद्ध अशा क्रोएशियाला खेटून. पण तरी हा प्रदेश युरोपीय संघाचा भाग नाही. कारण गरीब आहे इतरांच्या तुलनेत. बोस्नियात शिरताना अगदी कसून तपासणी झाली. मुख्य म्हणजे युरोपचा व्हिसा ‘मल्टिपल एन्ट्री’ आवश्यक. तो होता. नाही तर परत घेतलं नसतं क्रोएशियात. हे तपासणी नाके ओलांडण्याचं सव्यापसव्य झाल्यावर आपण बोस्नियात शिरतो आणि युरोपात असूनही हा देश युरोपीय संघात नसण्याच्या दुर्दैवाची जाणीव व्हायला लागते. सुंदर युरोपइतकाच. पण ते सौंदर्य ‘सांभाळणं’ आणि ‘सादर करणं’ यात तो कमी पडत होता, हे दिसत होतं. युरोपसारखाच निसर्ग. तशीच हवा. हिरवंगार सगळीकडे. अनाघ्रत वाटावं असं सौंदर्य. प्रवासात एका तळ्यापाशी थांबलो. झाडांनी गच्च भरलेलं. त्या तळ्यातला प्रफुल्लित हिरवेपणा झाडांवर पसरलाय की झाडांचा प्रसन्न पोपटी हिरवेपणा तळ्यात उतरलाय… ते कळणारही नाही. लांबून पाहिलं तर तळ्यातली हिरवाई आणि आसपासचं जंगल एकाच रेषेत. तळ्यापाशी गेलो तर तळापर्यंत अगदी स्वच्छ, निवळशंख पाणी. माशांच्या रांगाच्या रांगा. आसमंतातही तळ्यातला आणि आसपासच्या जंगलाचा निवांतपणा. तळ्यापाशी एक छोटीशी टपरी म्हणावं असं दुकान. तिथला मुलगा घरी बनवलेली जांभळ्या बेरीची वाइन विकत होता. या बेरी दिसतात कशा विचारलं तर त्यानं दाखवल्या. आपल्याकडे ज्याला आपण तुती म्हणतो ती फळं. समोरच्या जंगलातनंच खुडलेली. घरी त्याची आई त्यापासनं वाइन बनवते. चव शब्दांत सांगता येणं केवळ अशक्य अशी. मनोमन त्या माउलीला वंदन केलं. तिचा हातगुण उतरलेल्या द्रव्यानं दिलेल्या उत्साहानं पुढच्या मुक्कामावर गेलो. मोस्टार गाव.
तिथं एकदम टान्स्फर सीन. प्रवासात एखाद्या मैदानात जत्रा भरल्यावर जसं दिसेल तसं वातावरण. कमालीचं उत्साही आणि उत्सवी. बाहेरच्या प्रदेशाशी जोडणारा एक मोठा रस्ता. त्याला जोडणार्या लहान गावाकडे जातो. कोणत्याही गल्लीतनं गेलं तरी पोहोचायची जागा एकच. त्या गल्ल्यांच्या दोन्ही बाजूनं स्थानिक वस्तूंची दुकानं. त्यात हस्तकला, भरतकामाचे कपडे. त्या गल्ल्यांतनं वाहनांना यायला/जायला मनाई आहे. त्यामुळे चालणारे रवंथ करत, मजा घेत घेत फिरत होते. सगळ्या गल्ल्यांतल्या फिरस्त्यांची दिशा एकच. आम्हीही त्याच प्रवाहात सामील झालो. पुढे गल्ली अधिकाधिक अरुंद होत गेली. आणि समोर एक पूल दिसायला लागला.
लहानपणी चित्रकला विषय ‘शिकत’ असताना प्रत्येकानं स्वप्नातला एक पूल रेखाटलेला असतो. तसा हा. किंवा इंद्रधनुष्यासारखा. खाली एक नदी. अरुंद. तिच्या दोन्ही तटांवर टेबलं-खुच्र्या टाकून निवांत बसलेले अनेक. नदी लहानखोरीच. म्हणजे या बाजूला बसलं तर त्या बाजूला असलेल्याला ‘काय कसं काय’ विचारता येईल अशी. पण खोल असणार चांगलीच. कारण तिच्यावरचा पूल. त्या पुलाच्या मध्यावरनं खाली थेट पात्रात उड्या मारायची होडच लागलेली. नदीच्या पात्रापासनं पूल कमानीच्या मध्यापर्यंत एखाद्या दहा-बारा मजली इमारतीइतकी उंची असेल. तिथल्या एकानं या उड्या मारण्याच्या प्रथेचा इतिहास सांगितला. गावातल्या एखाद्या तरुणीचं एखाद्या तरुणावर प्रेम जडलं किंवा हा प्रवास उलटाही झाला की ते प्रेम सिद्ध करण्याची चाचणी म्हणजे ही उडी ! या असल्या गोष्टी सिद्ध करण्याची वेळ इतिहासकालापासनं पुरुषांवरच असते. आम्ही गेलो त्याही वेळी त्या थंडीत उघडेबंब तरुण ‘तिचं’ लक्ष वेधून घेण्यासाठी उडी मारण्याच्या तयारीत होते.
खरा धक्का बसतो तो या पुलाच्या इतिहासाचा. ऑटोमन साम्राज्यात ‘सुलेमान द मॅग्निफिसंट’ हा त्याच्या कर्तृत्वासाठी ओळखला जातो. तुर्कीयेचं साम्राज्य त्याच्या काळात युरोपात पार खोलवर गेलं. हा सोळाव्या शतकातला. तो १५६६ साली गेला. आपल्याकडे हा काळ सम्राट अकबराचा. इकडे अकबर आणि तिकडे सुलेमान एकाच वेळी असणं हा वेगळाच योगायोग. तर या सुलेमाननं हा पूल बांधला. आजही ‘त्या’ काळच्या वास्तुकलेचा, किंवा खरं तर वास्तुअभियांत्रिकीचा, उत्कृष्ट नमुना म्हणून त्याकडे पाहिलं जातं.
हे असे इस्लामी इतिहासाचे नमुने खूप दिसतात या परिसरात. चार-चार धर्मांना एकत्र नांदवणारा प्रदेश म्हणून मला बोस्नियाचं खूप आकर्षण. वेगळ्या दोन धर्मीयांना एकत्र जगणं अवघड केलं जात असताना चार-चार धर्मीयांना सामावून घेणं किती आव्हान असेल ते कळतं. हे धर्मीय सौहार्द १९९० च्या दशकात संपलं. अमानुष कत्तली झाल्या. बाहेरचे इस्लामी अतिरेकी घुसले. त्यांनी इथल्या इस्लामींचीच हत्याकांडं केली. का? तर हे इस्लामी ‘पाक’ नाहीत म्हणून. किती वर्ष बोस्निया खदखदत होता. शेवटी सगळ्या धर्मांतले शहाणे एकत्र आले आणि संयुक्त राष्ट्राच्या मदतीनं शांतता प्रस्थापित केली त्यांनी. त्यातला एक तोडगा फारच भारी आहे. अनेक धर्मीय, वांशिक गट असले समाजात की सगळं घोडं अडतं राजकीय वर्चस्व कोणाचं या मुद्द्यावर. बोस्नियानं मार्ग दाखवलाय.
या देशात एकाच वेळी तीन अध्यक्ष असतात. बोस्नियाक, क्रोएट आणि सर्ब. प्रत्येक समुदायाचा एक. तिघांचे अधिकार एकसारखे. एकच एक कोणी निर्णय घेऊ शकत नाही. अन्य दोघांची सहमती लागतेच. आता तीन दशकं झाली या व्यवस्थेला. शांतता नांदायला लागल्यापासून म्हणजे १९९६ पासून ही व्यवस्था आहे. या तिघांचं उद्दिष्ट एकच एक. बोस्नियाला युरोपीय संघात प्रवेश मिळेल इतकी (किमान) आर्थिक प्रगती साधायची.
त्यासाठी तिथल्या अर्थव्यवस्थेला जमेल तितकी मदत आणि शुभेच्छा देऊन जड पावलांनी परत युरोपात जावं लागलं. सांस्कृतिक चौरंगावरचा हा ‘त्रि’रंगा धर्म बाजूला ठेवून आर्थिक उन्नतीचं स्वप्न बघतोय ही सुखद भावना तिथून परतताना उबदार वाटत होती. (क्रमश:)
