इस्मत चुगताई आणि मंटो या दोन पाकिस्तानी कथालेखकांच्या नावांनंतर भारतीयांचे तिथले कथाआकलन संपते. आधुनिक मराठी लघुकथाकार पांडवांतील अरविंद गोखले यांनी १९८५ ते ८७ या काळात पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील कित्येक लेखकांची ओळख मराठी वाचकांना करून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरच्या अफसाना निगारांची (लेखक-लेखिकांची) भलीमोठी फौज ऊर्दू आणि इंग्रजीतून कथा लिहित आहे. कमीला शम्सी, मोहसीन हमीद, हमीद कुरेशी आणि बीना शाह हे लेखक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी नामांकित आहेत. त्या पंगतीत फराह अली ही कराचीमधील नवी लेखिका शिरकाव करीत आहे.
‘पिपल वॉण्ट टू लिव्ह’ हा गेल्यावर्षी आलेला तिचा कथासंग्रह अमेरिकेत बराच चर्चेत राहिला. गेल्या काही वर्षांत तिच्या कथा महत्त्वाच्या अमेरिकी मासिकांत झळकल्या. त्यातल्या काही पारितोषिकप्राप्त देखील ठरल्या. पाकिस्तानी मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीयांचे जगणे हा फराह अलीच्या कथांचा केंद्रबिंदू. ‘पिपल वॉण्ट टू लिव्ह’मधील एक कथा आपल्याकडे चालणाऱ्या ‘शिवनेरी’सारख्या वाहनाचा चालक होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीवरची आहे. वाहन चालविण्याचे कौशल्य असले तरी दहशतवादी हल्ल्यापासून पूर्ण कवच असलेल्या त्या गाडीचे चालक होण्यासाठी शिफारसपत्र मिळवताना त्याचा होणारा जाच हा कथेचा विषय.
एक कथा एअर कंडिशनवरची आहे, तर एक कथा तिथल्या मुर्दाड वस्तीवरची. पाकिस्तानातील मृत नदीवर या लेखिकेने ‘द रिव्हर, द टाऊन’ नावाची कादंबरी लिहिली आहे. ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणाऱ्या या कादंबरीचे मुखपृष्ठ दोन आठवडय़ांपूर्वी अमेरिकी साहित्यिक मासिकांसाठी बातमीचा विषय ठरले होते. या लेखिकेचा कथासंग्रह किंवा या वर्षांत येणारी कादंबरी सापडली नाही, तरी ‘व्हर्जिनीआ क्वार्टरली रिव्ह्यू’च्या (व्हीक्यूआर) ताज्या अंकामध्ये ‘ए सिक्वेन्स ऑफ स्मॉल अॅण्ड बिग इव्हेण्ट्स’ ही कथा मात्र वाचायला उपलब्ध आहे. आताच्या पाकिस्तानी कथालेखकांच्या पिढीच्या एका प्रतिनिधीची तरी या निमित्ताने ओळख होईल.
ही कथा येथे वाचता येईल-