इतिहासाची व्याप्तीच इतकी की प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या वाटणीचा न्याय मिळणं अशक्यच. काही व्यक्तींचा महिमा शतकानुशतकं गायला जातो, काहींची केवळ नोंद घेतली जाते, तर काही काळाच्या उदरात गडप होऊन जातात. चाँद बीबी हे यातल्या दुसर्या वर्गातलं व्यक्तिमत्त्व. ती माहीत तर असते, पण तिच्या क्षमतेचा आवाका आणि कार्याचा परीघ परिचित नसतो. सोळाव्या शतकातली ही सुलताना नेमकी होती कशी, भारताच्या आणि महराष्ट्राच्याही इतिहासातलं तिचं नेमकं स्थान, योगदान काय, हे सांगणारं पुस्तक उपलब्ध झालं आहे. डॉ. सारा वहीद यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं शीर्षक आहे ‘चाँद बीबी- द लाइव्हज अँड लेजेंड्स ऑफ अ वॉरियर क्वीन’. हिंदू आणि मुस्लीम पूर्वापार परस्परांचे विरोधकच होते, असे बिनबुडाचे दावे छातीठोकपणे केले जात असलेल्या या काळात हे पुस्तक महत्त्वाचं ठरू शकेल. सोळाव्या शतकातल्या या मुस्लीम साम्राज्ञीने मुघलांचा साम्राज्यविस्तार कसा रोखला याची ही कथा मिथकांना सुरुंग लावू शकते.
अनेक पुराभिलेख, मौखिक परंपरेतून पुढे आलेला इतिहास, ऐतिहासिक स्थळं, सालार जंग वस्तुसंग्रहालय, तेलंगणा राज्य पुरातत्त्व विभागासारखी संग्रहालयं, उर्दू भाषेतील जुनी पुस्तकं आणि हैदराबाद व दख्खन परिसरात झालेल्या संशोधनाच्या आधारे लिहिण्यात आलं आहे. इतिहास अभ्यासाच्या या विविध साधनांतून हाती लागलेले माहितीचे तुकडे जोडून त्यांचा तर्कशुद्ध कोलाज तयार करण्यात आला आहे. सत्ता, स्मृती आणि इतिहासाची पुनर्रचना कशी होते, याची झलक हे पुस्तक दाखवतं. हे केवळ इतिहासाचं पुस्तक नाही. सार्वभौमतेचे आयाम, एका साम्राज्ञीच्या राजकीय भूमिका, त्यातही सत्तास्थानी असलेल्या मुस्लीम स्त्रीचं व्यक्तिमत्त्व असे अनेक पैलू या ग्रंथाला आहेत. ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
