दिल्लीवाला

बेंगळूरुमध्ये विरोधकांच्या महाआघाडीची बैठक म्हणजे काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन म्हणता येईल. काँग्रेसच्या मंडळींनी आधीपासून वातावरणनिर्मिती केली होती. खरं तर बैठक एकाच दिवसाची होती, पण ती दोन दिवसांमध्ये रूपांतरित केली गेली. पाटण्यामध्येही नेत्यांनी सल्ला-मसलतीसाठी एकच दिवस दिला होता. तिथं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सगळय़ांची अडचण केली होती. या वेळी ही चूक होऊ नये, याची दक्षता काँग्रेसने घेतली. तरीही नितीशकुमार पत्रकार परिषदेत न आल्यानं पाटण्याची पुनरावृत्ती एक प्रकारे झाली! तिथं केजरीवाल आले नाहीत, इथं नितीशकुमार. नेत्यांनी काहीही केलं तरी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करायचं असं काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं होतं. पाटण्यात दिल्लीच्या वटहुकमावरून केजरीवालांनी मोडता घातला होता. बेंगळूरुमध्ये पत्रकार परिषद झाल्यावर रीतसर निवेदन पत्रकारांना दिलं गेलं. त्यामध्ये जागावाटप आणि समन्वयक हे दोन मुद्दे वगळता सगळय़ा महत्त्वाच्या विषयांचा समावेश केलेला होता. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा मुद्दा चर्चेसाठी आणला गेला नाही. आत्ता कुठं महाआघाडी स्थापन झाली आहे, ती स्थिरस्थावर होऊ दे, मग वादाचे विषय हाताळू असं सामंजस्य नेत्यांमध्ये आधीच झालेलं होतं. म्हणूनच मल्लिकार्जुन खरगेंनी जागावाटप वगैरे हे मुद्दे छोटे असून त्यावर नंतर विचार करू असं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. विसंगतीने भरलेल्या विरोधकांच्या महाआघाडीतील नेत्यांच्या कलाकलाने जात पुढं गेलं पाहिजे असंही काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. सगळय़ाच विषयांचा गलका आणि विचका झाला तर, वाद होऊन दुफळी निर्माण होईल. त्यापेक्षा टप्प्याटप्प्याने बैठका घ्यायच्या, प्रत्येक बैठकीमध्ये एक-एक निर्णय घ्यायचा अशी आखणी झालेली आहे. समन्वय समितीचा निर्णय झाला, पण समन्वयक कोण यावर मुंबईत खल होईल. त्यानंतर कदाचित चेन्नई वा कोलकातामध्ये बैठक होईल. घटक पक्षांच्या राज्यांमध्ये बैठकीचा एखादा तरी फेरा होईल. मग, कदाचित महाआघाडीचे निर्णय दिल्लीत घेतले जातील. महाआघाडीचे केंद्रीय सचिवालय उभे राहणार असेल तर, दिल्लीत रीतसर कार्यालय असू शकेल. महाआघाडीचे नेते एकमेकांशी किती जुळवून घेत आहेत, एकमेकांना आपले मानतात, हे पुढील दोन आठवडय़ांमध्ये संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दिसेल.

chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
Shekap Janyat Patil
VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”
anand sharma latter to mallikarjun kharge
“बेरोजगारीसह सामान्यांच्या प्रश्नांवर जात जनगणना हा उपाय नाही”, काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा अहेर

शिंदेंचं अचूक टायमिंग!

दिल्लीत पाच दिवसांपूर्वी अशोका हॉटेलमध्ये झालेल्या ‘एनडीए’च्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचं स्थान दिलेलं होतं. भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात उत्सवमूर्ती मोदीच असतात. त्यामुळं त्यांचं स्वागत हादेखील सोहळा असतो. मोदींच्या स्वागताची संधी मिळणं हा त्या नेत्यासाठी प्रतिमा उंचावण्याचा क्षण असतो, मोदींचा आपल्यावर किती विश्वास आहे हेही दाखवता येतं. राजकारणातील स्थान भक्कम झालं असा भास होऊन त्या नेत्याला बरंही वाटू शकतं. ‘एनडीए’च्या बैठकीच्या वेळी मोदींचं स्वागत करणाऱ्या चार नेत्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. बिहारमधील नेते जीतनराम मांझी, तमिळनाडूतील अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी, नागालँडचे मुख्यमंत्री निफू रिओ आणि शिंदे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी बिहार, महाराष्ट्र आणि तमिळनाडू ही तीनही राज्ये महत्त्वाची आहेत, हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदेंसह इतरांना आदराचं स्थान दिलेलं होतं. बैठकीत घटक पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसंदर्भातील ठराव मांडण्याची जबाबदारीही भाजपने शिंदेंना दिली होती. मोदींशी शिंदेंनी अनेकदा भेट घेतलेली होती. पण, ‘एनडीए’त आल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच मोदींना भेटले. तिथं वागण्यातील अवघडलेपणा काही केल्या त्यांना लपवता आला नाही! अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याशी मोदींनी शिंदेंविना चर्चा केली आणि शिंदेंच्या बैठकीतील नेतेपणावर पाणी फेरलं गेलं. त्याची परतफेड शिंदेंनी शनिवारी केली. शिंदेंनी फडणवीस व अजितदादा यांच्याविना मोदींना भेटण्याची संधी अचूक साधली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस एकाच दिवशी. त्यामुळं शनिवारी राज्यात दोघे चर्चेत. पण, शिंदेंनी थेट दिल्ली गाठली, इथं त्यांनी सहकुटुंब मोदींची भेट घेतली. दिल्लीतून दोघांनाही ‘मुख्यमंत्री मीच’ हे पुरतं दाखवून दिलं. राजकारणात टायिमग महत्त्वाचं, शिंदेंनी पुन्हा एकदा टायिमग अचूक साधलं!

वाचाळ नेता

भाजपचे सर्वात वाचाळ नेते दिल्लीत राहात नाहीत, तरीही ते दिल्लीत अधिक चर्चेत असतात. दिल्ली दरबारी नाव चर्चेत ठेवायचं असेल तर स्वत:च प्रयत्न करावे लागतात. हे मार्केटिंगचं तंत्र त्यांनी गेल्या तीन-चार वर्षांमध्ये शिकून घेतलेलं आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र अशा देशातील कुठल्याही राज्यातील विरोधी पक्षांवर ते हल्लाबोल करतात. बेंगळूरुमध्ये विरोधकांनी महाआघाडीचं नाव ‘इंडिया’ ठेवलं तर सर्वात आधी या नेत्यानं ट्वीट करून ‘भारत-भारत’ असा उद्घोष केला. स्वत: पंतप्रधान मोदी ‘मेड इन इंडिया’ असं सारखं म्हणतात, तरीही या नेत्याने ‘इंडिया’ म्हणायला आक्षेप घेतला आहे. हे नेते मूळचे काँग्रेसचे. त्यांचं राहुल गांधींशी पटलं नाही. त्यांनी पूर्वाश्रमीच्या हायकमांडची टिंगल करण्याची संधी सोडलेली नव्हती. भाजपमध्ये गेल्यावर त्यांनी नव्या सहकाऱ्यांना काँग्रेसमधील नेत्यांच्या गोष्टी चवीचवीने सांगितल्या असं म्हणतात. काँग्रेसमधील एका नेत्याला कुर्त्यांची फार आवड. त्याची या वाचाळ नेत्यानं यथेच्छ टिंगल केली. हा नेता पक्ष कार्यकर्त्यांपेक्षा पाळीव प्राण्यांमध्ये कसा रमतो, नेत्यांच्या बैठकीमध्येही पाळीव प्राण्यांचे लाड कसे करतो वगैरे सत्य-असत्य कथा सांगून भाजपच्या नेत्यांमध्ये त्याने स्थान मिळवलं. मग, भाजपच्या काही नेत्यांनीही संबंधित काँग्रेस नेत्याच्या कथा सांगायला सुरुवात केली. काँग्रेसचा हा नेता झेड दर्जाची सुरक्षा घेऊन आइस्क्रीम खायला जातो. एका वेळी किती आइस्क्रीम खातो तुम्हाला माहिती आहे का, अशा भन्नाट कथा प्रचलित केल्या गेल्या. ज्या भाजपच्या नेत्याने आइस्क्रीमची कथा सांगितली, त्यातील आइस्क्रीम विक्रेता खरा होता. बाकी कथेत सत्य किती हे भाजप नेत्यालाच माहिती. या काँग्रेस नेत्याच्या घराजवळ एक आइस्क्रीम विक्रेता उभा असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. कदाचित या विक्रेत्याकडून अधूनमधून हा काँग्रेसचा नेता आइस्क्रीम खातही असेल. कोणी पाळीव प्राण्यावर प्रेम करावं वा कोणी आइस्क्रीम खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण त्यांची मस्करी करून वादग्रस्त होण्यात धन्यता मानणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली असेल तर त्या राज्याची आणि पक्षाची अवस्था कशी असेल, केवळ कल्पना केलेली बरी.

विस्तार काय कामाचा..

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन दिवस झाले असले तरी काही खासदार सोमवारपासून हजेरी लावतील असं दिसतंय. जे खासदार आले, त्यांना मस्टरवर सही करायला धावावं लागत होतं. संसदेची दोन्ही सदनं सकाळी लगेच तहकूब होत असल्यानं लेट लतिफांची तारांबळ उडत होती. या सगळय़ा धावपळीतही मराठी खासदारानं नाराजी बोलून दाखवली. अधिवेशनाच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नसल्यानं त्यांच्या मनातील नाखुशी ओठावर आली. मंत्रिपदाच्या संभाव्य नावांमध्ये या खासदाराचं नाव अजून तरी चर्चेत आलेलं नाही. ‘केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार मोदींना माहिती. तो झाला वा नाही झाला तरी काय फरक पडणार आहे?’ असं ते एकदम म्हणाले. त्यांची ही नाखुशी अजितदादा गटामुळं तर नव्हे? हा प्रश्न विचारताच त्यांना दैनंदिन भत्त्याची आठवण झाली. ‘सही करून येतो, नाही तर भत्ता मिळायचा नाही,’ असं म्हणत ते संसदेच्या इमारतीत गायब झाले. खासदार सुटाबुटात होते म्हणून मंत्रीपदासाठी फोन आला का, असा विचारल्यावर, ‘नाही आला तरी आपण सूट शिवलेला असतो. जुना झाला हा सूट,’ असं म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीची आठवण करून दिली. या मराठी खासदाराची प्रतिक्रिया प्रातिनिधिक भासली. अनेक दिवसांपासून मोदी आता मंत्रिमंडळाचा विस्तार करणार अशी चर्चा होत असली तरी, मुहूर्त मिळत नाही असं दिसतंय. खासदार-नेते वाट पाहून कंटाळले असावेत.