scorecardresearch

चांदनी चौकातून : पश्चात्ताप होतोय?

राजकारणात कायमस्वरूपी काहीच नसतं. सत्तेची खुर्ची आणि ताकद कधी हातातून निसटून जाईल हे सांगता येत नाही.

चांदनी चौकातून : पश्चात्ताप होतोय?
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

दिल्लीवाला

राजकारणात कायमस्वरूपी काहीच नसतं. सत्तेची खुर्ची आणि ताकद कधी हातातून निसटून जाईल हे सांगता येत नाही. राजकारणातील हे वास्तव नेत्यांना चांगलं माहीत असतं. तरीही सत्ता गेल्याचं मनाला लागतंच. अशोक गेहलोत यांच्यासारखे सुदैवी विरळाच. गेहलोतांकडं राजस्थानचं मुख्यमंत्रीपद अजूनही आहे! गांधी कुटुंबाला आव्हान दिल्यानंतरही त्यांची सत्ता आणि पद या दोन्ही गोष्टी टिकलेल्या आहेत. त्यांच्या ओंजळीत पक्षाध्यक्षपद टाकलं गेलं होतं. मुख्यमंत्रीपद सोडून पक्षाध्यक्षपद. सत्तेच्या एका खुर्चीतून सत्तेच्या दुसऱ्या खुर्चीत बसायचं होतं. निर्णय काहीही घेतला तरी सत्ता हातातून जाणार नव्हती. पण त्यांनी पक्षाध्यक्षपद न घेता मुख्यमंत्रीपद निवडलं. गेहलोतांसाठी मुख्यमंत्रीपद अधिक महत्त्वाचं होतंच, पण सचिन पायलटांकडं ते पद जाऊ नये, यासाठी केलेला खटाटोप त्याहूनही जास्त होता. मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्ष झाले, आता गेहलोतांना काही करता येणार नाही. ‘भारत जोडो’ यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळय़ा राज्यांतील नेत्यांची एकमेकांची गाठभेट होतेय. मग, गप्पा रंगतात. अशाच गप्पांमध्ये गेहलोतांनी पक्षाध्यक्षपदाचा विषय काढला होता म्हणतात. कोणा नेत्यानं विचारलं असेल बहुधा. पक्षाध्यक्षपद उगाच धुडकावलं असं गेहलोतांना वाटू लागलंय, असं या नेत्याचं म्हणणं. गेहलोत पक्षाध्यक्ष झाले असते तर, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय त्यांना विचारूनच घेतला गेला असता. मग, पक्षाध्यक्षही तुम्ही, मुख्यमंत्रीही तुमचा! पण, गेहलोतांनी ती संधी गमावली. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होईल. काँग्रेची सत्ता टिकली तरी मुख्यमंत्रीपद टिकेल असं नाही. सत्ता गेलीच तर पदाचा प्रश्न उद्भवत नाही. हे सगळं खरं पण, गेहलोत मुरलेले राजकारणी. आपला पश्चात्ताप त्यांनी कदाचित गांधी कुटुंबाच्या निष्ठावानासमोरही व्यक्त केला असेल.

तुम्ही सांगा, माझं काय चुकलं?

नववर्षांच्या पूर्वसंध्येला काँग्रेसच्या मुख्यालयात झालेली राहुल गांधींची पत्रकार परिषद दिलखुलास म्हटली पाहिजे. वार्तालापाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले, ‘तुमचे प्रश्न झाले की मी तुम्हाला प्रश्न विचारणार’! सुमारे ४५ मिनिटांचा वार्तालाप संपल्यावर राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय जायचं नाही. तुम्ही सांगा, माझं काय चुकलं? तुम्ही मला बोलताना टेलिप्रॉम्टर का देत नाही? मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं उत्स्फूर्त द्यायची, असं तुम्ही का करता? तुम्ही अदानींना खुर्ची बदलण्याचा पर्याय देता, मला का देत नाही? तुम्ही पत्रकार माझ्याबाबतीत दुजाभाव करता हे बरोबर नाही’.. असे सगळे प्रश्न विचारून राहुल गांधी पत्रकारांची फिरकी घेत होते! पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलंही भाषण टेलिप्रॉम्टरशिवाय करत नाहीत, समोर लिहिलेलं वाचून दाखवतात. एका आंतरराष्ट्रीय परिषदेत मोदी दूरसंचार माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. मोदींचं भाषण सुरू असताना टेलिप्रॉम्टर बंद झाल्यामुळं त्यांचं भाषणही अपूर्ण राहिलं होतं. उद्योजक गौतम अदानी यांनी वृत्तवाहिनीला नुकतीच दिलेली मुलाखत त्यांच्या विधानांपेक्षा खुर्ची बदलल्यामुळं अधिक चर्चेत राहिली. अदानी प्रश्नांची उत्तरं टेलिप्रॉम्टरवर बघून देत होते की उत्स्फूर्त हे माहीत नाही, पण त्यांनी खुर्ची बदलली हे चाणाक्षांच्या लक्षात आल्यामुळं समाजमाध्यमांवर त्यावर टीका-टिप्पणी केली गेली. त्याचा संदर्भ घेऊन राहुल गांधी यांनी, ‘मलाही टेलिप्रॉम्टर हवा’, अशी पत्रकारांकडं गमतीने मागणी केली. मुख्यालयातील मोठय़ा सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली असली तरी, बाहेर थंडी असल्यानं दार लोटलेलं होतं. राहुल गांधी इथंही टी शर्ट घालून आले होते. ‘तुम्ही इथं स्वेटर घालून कसे बसू शकता, मला उकडायला लागलं आहे,’ असं म्हणत त्यांनी खोलीतील एसी लावायला सांगितला. ‘मला अजून तरी थंडी वाजलेली नाही. खरोखर थंडी वाजली तर मी यात्रेत तुमच्यासारखा स्वेटर घालेन,’ असं म्हणत त्यांनी टी शर्ट पुराण संपवून टाकलं. यात्रेतील अचंबित करणारे अनुभवही त्यांनी सांगितले. मी भारत जोडो यात्रेमध्ये हजारो तरुण-तरुणींशी बोललो. सगळय़ांना डॉक्टर, वकील, न्यायाधीश, अभियंता किंवा प्रशासकीय अधिकारी व्हायचं असतं. या पाच पर्यायांशिवाय कोणाला आयुष्यात वेगळं काही करायचं नाही. मी एका मुलीला सांगितलं की, एका वर्षांत दीडशे-दोनशे आयएएस होऊ शकतात, इतक्या कमी जणांना संधी मिळते हे ऐकून ती रडायला लागली.. मला भेटलेल्या तरुणांपैकी फक्त एक मुलगा म्हणाला, मेकॅनिक व्हायचं आहे! ‘भारत जोडो’ यात्रेमुळं अनुभवांचं भांडार त्यांच्याकडे जमा होऊ लागलं आहे.

धनखडांचं बंगाली प्रेम!

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे मूळचे राजस्थानचे. तिथंच त्यांचं शिक्षण झालं, तिथंच त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला. मग त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. ते अचानक चर्चेत आले पश्चिम बंगालचे राज्यपाल झाल्यावर. राज्यपालपदाच्या कारकीर्दीत त्यांचं पश्चिम बंगालवर प्रेम जडलं असावं. पश्चिम बंगालचा विषय निघाला की, त्यांना राहावत नाही. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले, ‘माझा प्रिय पश्चिम बंगाल’.. त्यांना लगेच थांबवून धनखड म्हणाले, ‘माझा म्हणू नका, आपला म्हणा. माझेही पश्चिम बंगालवर प्रेम आहे’! धनखडांच्या या वाक्यावर ओब्रायन यांना काय बोलावं कळेना. पश्चिम बंगालबद्दल धनखड आणखी काही बोलतील या अपेक्षेने ते तसेच थांबले. पण धनखड नंतर काही म्हणाले नाहीत. संसदेत अनेक विषय प्रलंबित राहतात, त्यावर चर्चा होत नाही, केंद्र सरकार निर्णयही घेत नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा द्यायला विरोधक तयार असतानाही केंद्र सरकार हे विधेयक संसदेत आणत नाही. राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसच्या खासदारांपैकी ३३ टक्क्यांपेक्षा जास्त महिला खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसने आरक्षण न देताही महिलांना संसदेत प्रतिनिधित्व दिलं, असा मुद्दा ओब्रायन पटवून देत होते. या विषयाची सुरुवात त्यांनी ‘माझा प्रिय पश्चिम बंगाल’ अशी केली होती. संसदेच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळय़ासमोर विरोधी पक्षांनी चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर निदर्शनं केली होती. तिथं तृणमूल काँग्रेसचे खासदार न दिसल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. या खासदारांना निरोप पोहोचला नसावा बहुधा. इतर विरोधी पक्षांचे खासदार आले असताना एकटय़ा तृणमूल काँग्रेसला निमंत्रण न पाठवण्याचा वेडेपणा खरंच कुणी केला असेल का?

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2023 at 00:05 IST

संबंधित बातम्या