दिल्लीवाला
संसदेच्या अधिवेशनामध्ये सकाळच्या दोन तासांमध्ये गोंधळ घातला जातो. दुपारच्या सत्रात फारसा गोंधळ होत नाही. काही महत्त्वाचे विषय असतील तर सकाळचा गोंधळ संध्याकाळपर्यंत चालू राहतो हा भाग वेगळा. विरोधकांच्या गोंधळात सत्ताधार्‍यांना कामकाज चालवायचं नसेल तर सभागृह तहकूब होतं. केंद्र सरकारला एखादं विधेयक मंजूर करून घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी हा गोंधळ पथ्यावर पडतो. विधेयकं विनाचर्चा, झटपट मंजूर होतात. सभागृहात काय चाललंय हे कळायच्या आत विधेयक मंजूर होऊन जातं. विधेयक मंजूर करायचं नसेल तर मात्र कामकाज चालवण्याची सत्ताधार्‍यांना गरज भासत नाही. इतर वेळी दुसर्‍या सत्रात कामकाज नीट, शांततेत चालू असतं.

दुपारच्या भोजनानंतर सदस्यांना चर्चा करण्यात रस असतो. या आठवड्यामध्ये दोन्ही सदनांमध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे. काही पुरवणी मागण्यांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तरही दिलेलं आहे. राज्यसभेत ग्रामीण विकास मंत्रालयाशी निगडित पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू होती. केंद्रीय कृषी व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान बसलेले होते. काँग्रेसचे शक्तिसिंह गोहील बोलत होते. ग्रामीण विकासचा विषय निघाला की ‘मनरेगा’वर चर्चा होतेच. ही योजना आता ‘जी रामजी’ योजना झाली आहे. या योजनेचं तुम्ही राम…राम केलेलं आहे. तिरडी उठली की राम राम म्हणतात तसं तुम्ही केलंय. ‘मनरेगा’चं राम राम केलंय… गोहील म्हणाले, मुँह में राम बगल में छुरी… असा तुमचा प्रकार आहे. रामाचं नाव घ्यायचं आणि चांगली योजना मारून टाकायची, हे योग्य नाही… मग, गोहील केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडं बघून म्हणाले, मंत्रीमहोदय, तुम्हाला सगळे मामा म्हणतात. तुम्ही चांगले मामा बना, कंस मामा बनू नका. तुमचं पंतप्रधान किती ऐकतात हे माहीत नाही, पण त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा… या टोमण्यावर शिवराजसिंह तरी काय बोलणार? त्यांनी नेहमीप्रमाणं स्मितहास्य केलं आणि म्हणाले, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन.

नितीश आणि हरिवंश

बिहारचे पायउतार होणारे मुख्यमंत्री नितीशकुमार आता राज्यसभेत येणार आहेत, त्याचवेळी त्यांचे विश्वासू उपसभापती हरिवंश राज्यसभेतून बाहेर जाणार आहेत. हरिवंश २०१४ पासून म्हणजे १२   वर्षं राज्यसभेत आहेत. ते एप्रिलमध्ये निवृत्त होतील. जनता दलाचे नवे दोन उमेदवार राज्यसभेत येतील, त्यामध्ये एक आहेत नितीशकुमार. हरिवंश यांना नितीशकुमार यांनी तिसर्‍यांदा संधी दिली नाही. त्यांची जागा आता नितीशकुमार स्वत:च घेतील. गेल्या १२ वर्षांत हरिवंश यांनी सत्ताधारी पक्षासाठी मोठी कामगिरी केली होती. वादग्रस्त कृषी विधेयकं राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळात मंजूर केली गेली. त्यावेळी पीठासीन अधिकारी हरिवंशच होते. त्यांनी मतविभागणी घेण्यास नकार दिला होता. आवाजी मतदान सत्ताधार्‍यांच्या पथ्यावर पडलं होतं. नंतर हे कायदे मागे घेतले गेले हा भाग वेगळा. त्यावेळी विरोधी सदस्यांनी संसदेच्या आवारात धरणं आंदोलन केलं होतं. रात्रभर ते संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्याशेजारी थंडीत बसले होते. त्यावेळी अधिवेशन जुन्या ऐतिहासिक संसद भवनात भरत असे. त्याच्यासमोर महात्मा गांधींचा पुतळा शाबूत होता. आता हा पुतळा इतक्या कोपर्‍यात गेला आहे की, तिथं कोणीही खासदार धरणं धरायला जाणार नाही. जगदीप धनखड सभापती होते तेव्हाही हरिवंश आपली जबाबदारी नीट सांभाळत होते. महत्त्वाच्या विधेयकांच्या मंजुरीच्या प्रक्रियेवेळी अनेकदा पीठासीन अधिकारी म्हणून हरिवंश काम पाहात असत. आधी सभापतीपदी व्यंकय्या नायडू होते, मग, धनखड आले, आता सी. पी. राधाकृष्णन आहेत. या तीनही सभापतींच्या बरोबरीने हरिवंश यांनी राज्यसभा सांभाळली होती. ते जनता दलाचे असले तरी आणि नितीशकुमार यांनी कधी ‘एनडीए’ तर कधी ‘महागठबंधन’ अशा आघाड्या बदलल्या तरी, हरिवंश तिथंच राहिले. त्यांच्या नेत्याने भूमिका आणि आघाड्या बदलल्या पण, हरिवंश यांनी कधीही सत्ताधार्‍यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. त्यामुळं हरिवंश यांना भाजपच्या नेत्यांनी आपलं मानलं होतं. त्यामुळंच कदाचित त्याचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं असं मानलं जातं. धनखड पायउतार झाले पण, ते कसे गेले हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांना निरोप दिला गेला नाही. आता हरिवंश यांच्यासाठी निरोप समारंभ होतो का बघायचं.

वायुनिर्मितीवर हास्यनिर्मिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विरोधकांनी कधीही एवढं ‘कौतुक’ केलं नसेल. पंतप्रधानांची आठवण इतक्या वेळा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काढली तितकी गेल्या ११ वर्षांत काढली नसेल. ही थोडी अतिशयोक्ती असेल पण, विषयही तसा अतिशयोक्तीचा होता. हा विषय समाजमाध्यमांवर पूर्वीच व्हायरल झाला होता, तो विरोधी पक्षांनी पुन्हा व्हायरल केला. या आठवड्यात जे जे आक्रमक विरोधी नेते सभागृहात बोलले त्यांनी पंतप्रधानांंच्या नाल्यातून वायुनिर्मितीवर भाष्य केलं नाही असं झालं नाही. पंतप्रधान कधी काळी म्हणाले होते की, नाल्याच्या सांडपाण्यातून वायुनिर्मिती करता येते. या वायूचा वापर करून शेगडी पेटवता येऊ शकते, स्वयंपाक करता येऊ शकतो. हे तर एकदम सोपं तंत्रज्ञान आहे, असा तर्क पंतप्रधानांनी मांडला होता. या ‘विज्ञानवादी’ भूमिकेच्या चित्रफिती व्हायरल झाल्या, त्याची विरोधी सदस्यांना आठवण झाली. त्यांच्या उपहासाने चर्चेत जबरदस्त रंग भरला. तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद म्हणाले की, २०१७ मध्ये पंतप्रधानांनी जे सांगितलं होतं (वायुनिर्मितीचं तंत्रज्ञान) ते या सरकारनं ऐकलं असतं, संशोधन आणि विकास केला असता, अगदी पुरवणी मागण्यांत काय मुख्य अर्थसंकल्पात तरतूद केली असती तरी गटारीच्या वायूमधून एलपीजीचा तुटवडा भरून निघाला असता. या देशात सगळ्या घरांच्या खाली गटार आहे, पाइप कसा न्यायचा, भांडं उलटं करून कसं ठेवायचं. मग, वायू कसा मिळतो हे सगळं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. असं झालं असतं तर सरकारचे पैसेही वाचले असते… राज्यसभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही टोमणे मारले. पंतप्रधानांचे आपापले विचार असतात. कोणी विज्ञानवादी असतात, कोणी अंधश्रद्धावादी असतात, कोणी अंधभक्त असतात, कोणी भक्त असतात. पं. नेहरूंच्या काळातदेखील गटारं होती, पण  नेहरूंनी कधीही सांगितलं नाही की, गटारातून गॅस काढा आणि चहा बनवा… ही विरोधी नेत्यांची दोन उदाहरणं झाली. अनेकांनी वायुनिर्मितीवर हास्याची निर्मिती करून टाकली. तिकडे संसदेच्या मकरद्वारावरच नव्हे तर विरोधकांनी संसदेमध्येही ‘नाम नरेंद्र, काम सरेंडर’ची घोषणाबाजी करून पंतप्रधानांची वारंवार आठवण काढली.

कॅमेराही कॉम्प्रोमाइज्ड झालाय!

विरोधी पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची भाषणं लक्षवेधी असतात. महुआ मोईत्रा, कल्याण बॅनर्जी, काकोली घोष-दस्तीदार आक्रमक तर आत्ता गटनेत्या झालेल्या शताब्दी रॉय मार्मिक बोलतात. त्या बीरभूमच्या खासदार आहेत. म्हणजे टागोरांच्या शांतिनिकेतनच्या भूमीतील. या तृणमूलच्या खासदारांमध्ये भर पडली आहे ती, सायोनी घोष यांची. त्या अभिनेत्री आहेत, गायिका आहेत, आता खासदार आहेत. त्यांच्या बोलण्यात उपहास जास्त असतो. त्या हसतहसत सत्ताधार्‍यांना चिमटे काढतात. शेरोशायरी, प्रासंगिक विनोदांनी त्यांचे भाषण भरलेले असते. या आठवड्यातील त्यांचं भाषण ऐकण्याजोगं होतं… ‘बघा, आम्ही विरोधक संसदेबाहेर बोललो तर ईडी, सीबीआयची आमच्यावर कारवाई होणार. संसदेत बोललो तर निलंबित होणार, आमचे निलंबित सहकारी अजूनही बाहेर बसले आहेत. तुम्ही संसदेबाहेर आणि संसदेतही बुलडोझर चालवणार, असे नाही चालत… ये ताकद की बुलंदी पलभर का तमाशा है, जिस डाल पे बैठे है वो टूट भी सकती है, ख्वाब जरूर देखीए, लेकीन ख्वाबो में घर बनाने की गलती मत किजिएगा…’ हा त्यांनी वाचून दाखवलेला शेर वाहवा मिळवून गेला. सभागृहात आम्ही आमच्या नेत्याचं नाव दोन वेळा घेतलं तरी आम्हाला रोखलं जातं, इथं सत्ताधारी मात्र त्यांच्या नेत्याचा जप करत असतात. या सदनातील कॅमेरेदेखील हे सगळं बघून कॉम्प्रोमाइज्ड झाले आहेत असं वाटतं. आम्ही बोलतो पण, दाखवलं जातं सत्ताधार्‍यांना. आमचं म्हणणं टोचू लागतं तेव्हा माइक आपोआप बंद होतात. मासिकं, पुस्तकं दाखवणं, बोलणं यांची राहुल गांधी, अखिलेश यादव, अभिजीत बॅनर्जी यांना मुभा नाही, पण ब्ल्यू आईड बॉयला (निशिकांत दुबे) सगळ्याची मुभा आहे…’ सायोनी घोष यांनी वाक्यावाक्यातून सत्ताधार्‍यांना शालजोडीतील मारले.  प्रभावी भाषण म्हणजे काय असतं हे सायोनी घोष प्रत्येक वेळी दाखवून देतात. तृणमूलचे एक-एक खासदार सत्ताधार्‍यांना असे पुरून उरतात की इतर पक्षांच्या खासदारांची खरं तर गरजच पडू नये.