दिल्लीवाला
पक्षाचा प्रचार कसा करावा हे भाजपकडून शिकावं. सध्या दिल्लीत मोदी सरकारच्या नऊ वर्षपूर्तीचं गुणगान सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाने आदेश देण्याचीही गरज आता उरलेली नाही. केंद्रीय मंत्री स्वत:हून केंद्रातील भाजपच्या राजवटीचं कौतुक करण्यासाठी धावत आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये भाजपच्या मुख्यालयात, वेगवेगळय़ा मंत्रालयांमध्ये केंद्रीय मंत्री पत्रकार परिषद घेऊन कथित यशाचा गौरव करून घेत आहेत. स्वत:हून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची संधी केंद्रीय मंत्र्यांना वा नेत्यांना क्वचितच मिळते! सत्तेतील नऊ वर्षांनिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने जे. पी. नड्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधणं अपेक्षित होतं. पण, सेन्गोलवरून वाद झाला, त्यात महिला कुस्तीगिरांनी केंद्राला नामोहरम केलं. मग, सत्तेतील यशाबद्दल काय सांगणार असा प्रश्न नड्डांना पडला असावा. पण, मंत्र्यांचा मात्र नऊ वर्षांनिमित्त विरोधकांवर तोंडसुख घेऊन ‘आपणही कमी नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न दिसत होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असून कोणाला डिच्चू मिळेल सांगता येत नाही. एकीकडे मंत्र्यांच्या प्रचारमोहिमा सुरू असताना भाजप नेते देशभर धावताहेत. भाजपच्या १६० लोकसभा मतदारसंघांतील प्रवासी कार्यक्रम अजून जिथे सुरू आहे, तिथं मंत्र्यांना-नेत्यांना पाठवलं जातंय. त्यात प्रत्येक राज्यामध्ये प्रदेश भाजपच्या नेत्यांना एकेक लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा आदेश दिलेला आहे. भाजपचे मुख्यमंत्री तर याच कामात अडकलेले दिसताहेत. भाजपने महासंपर्क मोहिमेत समांतर मोहिमा आखलेल्या आहेत. भाजपचा प्रत्येक ज्येष्ठ नेता, पदाधिकारी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री टिफिन घेऊन डबे खायला जाताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी नोएडामध्ये नड्डा टिफिन बैठकीला गेलेले दिसले. या बैठकांमध्ये पोटोबा करता करता पक्षासाठी मत मागितलं जात आहे. टिफिन खाऊन झालं की, नेत्यांना नामवंतांच्या घरी जाऊन केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. काही लाख नामवंतांच्या कुटुंबांकडं जाऊन भाजपचं सरकार किती चांगला कारभार करतंय हे समजून सांगितलं जातंय. भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना उसंत मिळालेली नाही. विचार मंथन, चिंतन, चर्चा, प्रचार-प्रसार, जनसंपर्क, प्रवासी आढावा, अहवाल मांडणी असं सगळं एकाच वेळी केलं जात आहे.




हाय कमांड कोण?
राज्यात काँग्रेसची सत्ता असताना नेते हाय कमांडची भेट घेण्याच्या आशेने दिल्लीत येत असत. आत्ताही येतात, पण सत्ताधारी म्हणून पक्षश्रेष्ठींना भेटण्याचे महत्त्व वेगळंच होतं. आता राज्यातील भाजपचे नेते तसे येत असतात. पण भाजपचे नेते दिल्लीत कधी रेंगाळत नाहीत, ते राजधानीत येतात, थेट अमित शहांची वा नड्डांची भेट घेतात आणि आल्या पावली निघून जातात. शिंदे गटाचे प्रमुख दिल्लीत येऊन भाजपच्या वरिष्ठांची भेट घेत असल्यामुळे त्यांच्या गटातील मंत्र्यांना सरकारी कामाशिवाय येण्याचे कारण नसते. खासदारही संसदेच्या अधिवेशनाच्या काळात इथं असतात. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांनी शिंदे गटातील एक मंत्री दोन दिवस दिल्लीत होते. त्यांचा नियोजित सरकारी कार्यक्रमही नव्हता. त्यांचे पक्षश्रेष्ठी तर मुंबईत असतात, त्यांच्याशी संपर्कही होत असेल. असं म्हणतात की, ते भाजपमधील कोणा वरिष्ठांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांना भेट मिळाली की नाही, हे त्यांनी सांगितले नाही. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळं प्रश्न पडला की, शिंदे गटाचे सुपर हाय कमांड अस्तित्वात आहेत की, शिंदे गटातील सदस्यांनी भाजपच्या नेतृत्वाला हाय कमांड मानले आहे?
चाचपणी?
अनेकदा राज्या-राज्यांतील नेते दिल्लीत येऊन वेगवेगळय़ा गोष्टींची चाचपणी करत असतात. राज्यामध्ये पक्ष त्यांच्या ताब्यात असेलही, पण दिल्ली दरबारी काय चाललं आहे, याचा अंदाज ते पक्षाबाहेरील लोकांकडून घेत असतात. ते राज्यात प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतात तसा ते दिल्लीतही करतात. महाराष्ट्रात काही पक्षांचे नेते सध्या दिल्लीत येऊन चाचपणी करताना दिसू लागले आहेत. ते पक्षश्रेष्ठींना गुपचूप भेटूनही जात असतील, पण केंद्रात त्यांच्या पक्षातील स्पर्धक त्यांच्याबद्दल काय करताहेत हे समजत नाही. या नेत्यांची समांतर फीडबॅक यंत्रणा असते, ती त्यांना माहिती पुरवत असते. कदाचित राज्यातील काही नेत्यांना प्रतिमा सुधाराची गरजही असावी किंवा राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा अंदाज घ्यायचा असेल. पक्ष कधी कधी अचानक भाकरी फिरवतो, त्यामुळं सावध राहणं, आगाऊ माहिती मिळवणं या नेत्यांसाठी गरजेचं असतं. महाराष्ट्रात तर राजकीय अस्थिरता कायम आहे. भाजपनं शिंदे गटाला सोबत घेतलं असलं तरी, त्यांच्या जिवावर मुंबई पालिका जिंकता येत नाही. अन्यथा पालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्येच झाली असती. आता सर्वेक्षणे केली जाताहेत, वातावरणनिर्मिती केली जात आहे, थोडी जरी परिस्थिती बदलली तरी निवडणूक घेतली जाऊ शकेल. शिंदे गटातील काहींच्या मोदी-शहांकडे थेट भेटीगाठी होऊ शकतात. अशा वेळी दिल्लीवर नजर ठेवणं अनेक पक्षांतील नेत्यांसाठी गरजेचं झालेलं आहे. लोकसभा निवडणूक होईपर्यंत अशा चाचपण्या होत राहतील असं दिसतंय.
प्रचारासाठी धावाधाव
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी गुलबग्र्याला काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांची प्रचारसभा झाली होती. तिथं अगदी साध्या हॉटेलमध्ये त्या राहिल्या, त्या हॉटेलमध्येच त्यांनी जेवण घेतलं. दुसऱ्या दिवशी उठून प्रचारासाठी दुसऱ्या गावी निघून गेल्या. प्रियंकांचा साधेपणा कार्यकर्त्यांना भावला. त्यामुळं त्यांनी प्रियंकांच्या या निवासाचा उल्लेख आवर्जून केला. कर्नाटकमध्ये प्रियंका व राहुल गांधी यांनी दीड-दोन महिने घालवले, काँग्रेसला विजय मिळाला. आता तेलंगणा काँग्रेसमधून नेते दिल्लीत प्रियंका गांधी-वाड्रांकडे वेळ मागत आहेत. प्रियंकांनी तिथं लवकरात लवकर प्रचार सुरू करावा असा आग्रह त्यांना केला जात आहे. हे नेते दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात वा मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी भेटीगाठी घेत आहेत. मध्य प्रदेशमध्ये १२ जूनपासून प्रियंका गांधींचे दौरे सुरू होणार आहेत. त्यानंतर राजस्थान आणि छत्तीसगढमध्येही होतील. प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा विचार केला जात आहे. त्यांच्या प्रचारसभांना लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याने राहुल गांधींप्रमाणे प्रियंकादेखील आगामी काळात देशभर दौरा करू शकतील.