भाजपचे नेते विनोद तावडेंची खासदार म्हणून नवी इनिंग सुरू झाली आहे. भाजपमध्ये त्यांनी संघटनात्मक कौशल्य दाखवलं आहे. मोदी-शहा दोघेही तावडेंवर खूश आहेत, असं दिसतंय. नाही तर त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली कशी असती? सध्या संसदेच्या सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ सुरू आहे, कोण काय बोलतंय हेही समजत नाही. त्यातही बोलायची संधी मिळताच तावडेंनी एक मुद्दा उपस्थित केलाच. विषय गंभीर होता. तावडेंच्या मातोश्रींच्या निधनानंतर हा मुद्दा लक्षात आला असं त्यांचं म्हणणं होतं. देशातील त्वचा दान आणि त्वचा बँकिंग मजबूत करण्याची गरज आहे. भाजलेल्या जखमांवर उपचारांसाठी दान केलेली त्वचा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे संसर्ग आणि शरीरातील द्रवपदार्थांचे नुकसान कमी होण्यास मदत होते, आणि जर कायमस्वरूपी उपचार शक्य नसतील, तर मानवी अवयव आणि उती (टिशू) प्रत्यारोपण कायद्याअंतर्गत (थोटा) त्वचा दान केले जाते. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत त्वचा दान केले जाऊ शकते. यासाठी रक्तगट किंवा उती जुळवण्याची गरज नसते; फक्त त्वचेचा वरचा थर घेतला जातो, ज्यामुळे शरीराच्या दिसण्यावर परिणाम होत नाही, आणि तो पाच वर्षांपर्यंत जतन करून ठेवता येतो. त्वचा संकलन व वाहतुकीचे एकात्मिक जाळे स्थापित करण्याचा मुद्दा तावडेंनी मांडला. पण, संसदेच्या गोंधळात तो विरून गेला. असो. तावडे सध्या जबरदस्त बॅटिंग करताहेत असं दिसतंय. ते खासदार झालेत. संसदेत बोलत आहेत. त्यांच्याकडं बिहार आहे. केरळमध्ये ते जाऊन आले. उत्तर प्रदेशाचाही काही भाग निवडणुकीदरम्यान त्यांच्या अखत्यारीत असेल. शुक्रवारी ते मराठी खासदारांना घेऊन पंतप्रधान मोदींकडं गेले होते. त्यासाठी सगळे खासदार आधी तावडेंच्या घरी जमले. तिथून मोठ्या बसमधून ते मोदींना भेटायला गेले. तावडे मराठी खासदारांचा केंद्रबिंदू होऊ लागले आहेत की काय?
दोन-तीन-चार दहा!
संसदेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये कामकाज झालंच नाही. काँग्रेसला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हवे होते, ते दिसत होते पण, हाताला लागत नव्हते. तीन आठवडे काँग्रेस आणि इतर ‘इंडिया’ आघाडीतील खासदार सकाळी दहा वाजता दिवसभर काय करायचं हे ठरवायचे. मग, ते मकरद्वारासमोर जमायचे. अमित शहा कुठं आहात, असा मोठा फलक हातात असायचा. समाजवादी पक्ष राम मंदिरातील देणगी अपहाराबद्दल निषेध करायचा. संसदेच्या आवारात निदर्शनं झाली की, विरोधक आपापल्या सभागृहांत जात. तिथं कामकाज सुरू झालं की गोंधळ होई. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला म्हणत, असा गोंधळ बरा नव्हे… तुम्हाला कामकाज व्हावं असं वाटत नाही का? चला, मग, मी कामकाज तहकूब करतो… मग सभागृहाचं कामकाज स्थगित व्हायचं. ते नंतर दिवसभरात क्वचितच सभागृहात येत असत. कारण काही कामकाज होतंच नव्हतं. याचं उघड गुपित असं होतं की, विरोधकांना सोडा, सरकारलाच कामकाज व्हावं असं वाटत नव्हतं. ते झालं की अमित शहांना सभागृहात यावं लागलं असतं. त्यापेक्षा गोंधळात विधेयकं मंजूर करणं सरकारला पथ्यावर पडलं. काही विधेयकं दोन-तीन-चार मिनिटांत मंजूर झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं विनियोग विधेयक कधी मंजूर झालं हे त्यांनाच कळलं नाही. त्या शेजारी बसलेल्या खासदाराला विधेयक संमत झालं का असं विचारत होत्या! लोकसभेत सर्वात जास्त चर्चा होऊन संमत झालेलं विधेयक म्हणजे वंदे मातरम्… ते दहा मिनिटांमध्ये मंजूर झालं. वक्ते होते मंत्री धरून चार. हा गोंधळ सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेच्या आपल्या दालनात बसून होते. ते संसदेत यायचे तुलनेत उशिरा. काही दिवस ते दुपारनंतर आलेले दिसले. पहिल्यांदा शहा मागच्या दारानं आत येताना दिसले. मग, मकरद्वारातून नेहमीप्रमाणं आले. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू म्हणतात ते खरं आहे, शहा संध्याकाळी उशिरापर्यंत संसदेत असत. शहांच्या बैठका चालत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आले. मिझोरामच्या मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ आलं. ख्रिश्चन संस्थांचं शिष्टमंडळ आलं. शहांनी या सगळ्यांबरोबर संसदेच्या वेगवेगळ्या दालनांमध्ये बैठका घेतल्या. काही बैठका तर संध्याकाळी साडेपाचनंतर झाल्या. शुक्रवारी शहा संसदेत आले आणि लगेच लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांच्या दालनात गेले. बराच वेळ ते तिथंच होते. पुढील आठवड्यामध्ये सरकारला ‘एफसीआरए’ विधेयक आणायचं आहे. त्यासाठी सभागृह चालवावं लागेल, या बैठकीत त्याची तयारी झाली असं म्हणतात. शहांनी ख्रिश्चन शिष्टमंडळाचं ऐकून घेतलं पण, हे विधेयक संसदेत आणणार असं त्यांना स्पष्ट केल्याची चर्चा होती. हे विधेयक आणण्यामागं दोन कारणं आहेत. एक. आंतरराष्ट्रीय दबावाला भारत बळी पडत नाही हे दाखवणं. दोन. अमित शहा विरोधकांना घाबरत नाही हे सिद्ध करणं. एका दगडात अमित शहांना दोन पक्षी मारायचे आहेत. असो. शहा लोकसभेत येत नसल्यानं त्यांचा धाक कमी झाला की काय अशी चर्चा आहे. विरोधी पक्षांचे सदस्य लोकसभाध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करतात. त्यातील कोणी तरी घोषणा दिल्या, तडीपार सदन में ‘आओ, जवाब दो जवाब दो…’ राज्यसभेत मध्यंतरी विरोधक देत असलेली ‘वेण्णम वेण्णम…’ ही तमिळ घोषणा गाजली. यावेळी लोकसभेत मराठी खासदाराने मराठीतून, ‘या मंत्र्याचं करायचं काय…’, अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. भोवती जमलेल्या अमराठी खासदारांना ते कळेना. फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मग ही घोषणा विरून गेली.
तारांबळ
दिल्लीतील पाऊस नव्या संसदेची परीक्षा बघतो असं दिसतंय. ही नवी इमारत आता जुनी झालेली असल्यामुळं या वास्तूतील दोष दिसायला लागलेले आहेत. कुठलं तरी तंत्र-मंत्र असतं ते केलं नाही की काय, असा उपरोधिक प्रश्नही विचारला जात आहे. समोर इतकी सुंदर भव्य वास्तू उभी असताना तिच्याकडं बघून त्या तोडीचं नवं काही उभं करावं असंही वाटू नये, इतका कर्मदरिद्रीपणा असेल तर तारांबळच उडणार! नवं संसद भवन हे संसदेच्या आवारातील अडगळ आहे हे मान्य करायला हवं. ते अचानक गायब झालं तर कोणालाही दु:ख वाटणार नाही हे नक्की. मागं या संसद इमारतीमध्ये गळती लागलेली होती. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. आता संसदेच्या बाहेरचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. मकरद्वारासमोर पोर्च नसल्यानं खासदार पावसात भिजत संसदेमध्ये जात आहेत, असे व्हिडीओ आहेत. राहुल गांधी छत्री न घेता पावसात भिजण्याचा आनंद घेताना एका व्हिडीओत दिसले. अलीकडं त्यांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत, ही सरकारसाठी नवी अडचण. असो. मुद्दा हा की, दोन दिवस दिल्लीत पावसाचा जोर आहे, अधिवेशनासाठी खासदार सकाळी संसदेत येतात, त्यांना कारमधून उतरून काही पावलं चालत जाऊन मग संसदेत प्रवेश करावा लागतो. समोर उभ्या असलेल्या जुन्या संसद भवनाच्या मुख्यद्वारातून खासदार आत जात. तिथं वर आडोसा उभा केलेला आहे, तिथंपर्यंत कार घेऊन जाता येत असे. तिथून थेट संसदेत प्रवेश करता येत असे. खासदारांना भिजावं लागत नसे. नव्या संसद भवनात तसं नाही. मकरद्वारावर आडोसाच नाही. शिवाय, पायर्याही जास्त. तिथला हिरवा गालिचा ओलाचिंब होतो. पाय घसरण्याची भीती. खासदारांची नुसती तारांबळ उडते. इथं आडोसा उभा करायचा म्हटला तरी समोर जुन्या संसदेचा आडोसा. घाईघाईने स्वत:च्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा अट्टहास केला की काय होऊ शकतं याचं दृश्यस्वरूप म्हणजे संसदेची नवी इमारत. आतमध्ये काय बट्ट्याबोळ सुरू आहे त्याबद्दल तर बोलण्याचीही गरज नाही. मुद्दा असा की, आता मकरद्वारावर आडोसा उभा केला जाणार आहे. त्यासाठी लोकसभाध्यक्षांनी फर्मान काढलं आहे.
भाजपमध्ये हे चाललंय काय?
दिल्लीमध्ये मोदी-शहा अडचणीत आलेले असताना उत्तर प्रदेशमध्ये भाजपअंतर्गत मारामार्या वेगळ्याच स्तरावर गेल्या आहेत. तिथं सहा-सात महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं काही खरं नाही असं दिसतंय. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल या योगींच्या गोरखपूरमध्ये गेल्या आणि तिथल्या विद्यापीठातील अनेक त्रुटी त्यांनी जाहीरपणे मांडल्या. एकप्रकारे आनंदीबेन यांनी थेट योगींवरच हल्लाबोल केला. हे सगळं कोणाच्या आदेशावरून झालं असावं हे माहीत नाही! दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापाठीच्या दीक्षांत समारंभात आनंदीबेन बरंच काही म्हणाल्या. काही लोकांना माझं बोलणं कदाचित आवडणार नाही, पण त्रुटी दाखवून द्याव्याच लागतील. या उणिवा पुढील तीन महिन्यांत दूर केल्या पाहिजेत. हे गोरखपूर आहे, जिथे आपले मुख्यमंत्री स्वत: राहतात. इथं अशा त्रुटी असतील, तर काय होईल?… मुलींच्या वसतिगृहात खानावळ आहे, पण मुलांच्या वसतिगृहात नाही. बाहेरून डब्यातून जेवण आणलं जातं. का? हे चांगलं आहे का?… डब्यातून जेवण येऊ शकतं, तर डब्यातून अमली पदार्थही येऊ शकतात. डब्यातून काहीही येऊ शकतं… असं सगळं आनंदीबेन म्हणाल्या. योगींच्या गोरखपूरमध्ये त्यांनाच आव्हान? हे भाजपमध्ये काय चाललंय?
