आज मंगळवार, विद्यार्थ्यांशी संवादाचा वार असे म्हणत मंत्रालयात जाण्यासाठी निघालेले चंद्रकांतदादा खुशीत होते. कधी चर्चा तर कधी लालूच दाखवून या जेन-झीला सत्तेच्या सोबत ठेवायचेच. दोन हजार रुपये पॉकेटमनीची कल्पना त्यातलीच. सरकार लाडक्या बहिणींना खूश ठेवू शकते तर विद्यार्थ्यांना का नाही? उच्चशिक्षण घेणार्या राज्यातील ४० लाख विद्यार्थ्यांना हा ‘मनी’ एकदा सुरू केला की त्या राहुल आणि दिपकेचा प्रश्नच मिटला असा विचार करत ते दालनात शिरले तर तिथे विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी बघून खूश झालेले दादा स्थानापन्न होताच साहाय्यकाने एक टिपण समोर ठेवले. परीक्षा पद्धती, शुल्क आकारणीत सुधारणा असे विषय त्यात होते. त्यावर नजर टाकत दादांनी बोलायला सुरुवात केली तशी विद्यार्थ्यांमधील चुळबुळ वाढली. आम्ही अमुक करू असे ते सांगू लागताच एक विद्यार्थी थेट उभा राहिला.
‘सर, यावर नंतर कधीतरी चर्चा करू, आधी आम्हाला तुम्ही केलेल्या ‘पॉकेटमनी’च्या घोषणेविषयी बोलायचे आहे. त्यावर आमची मते मांडायची आहेत.’ हे ऐकताच दादांसकट सारे अधिकारी चकित झाले. तरीही चेहर्यावर हसू आणत दादा म्हणाले ‘बोला.’ त्यासरशी टाळ्यांचा कडकडाट झाला. मग तोच विद्यार्थी बोलू लागला. ‘माफ करा सर पण तुम्ही पॉकेटमनी म्हणून दोन हजार रुपये देण्याचे जे सूतोवाच केले आहे त्यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. तुम्ही शिकत असतानाच्या काळात ही रक्कम ठीक होती. आता जमाना बदललाय, महागाई वाढली. मुख्य म्हणजे सरकार आकारत असलेले शुल्क किती वाढले हे तुम्ही जाणताच. त्यामुळे ही रक्कम वाढवून मिळावी. ती किती असावी याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून आमचा होणारा खर्च तुम्हाला सांगतो. आजकाल कॉलेजच्या वेळा बदलल्याने अनेकदा आम्हाला बाहेरच खाणेपिणे करावे लागते. साधा डोसा घेतला तरी शंभर रुपये जातात. त्यात आम्ही एकटे खात नाही. मित्र-मैत्रिणी असतात. यातच हजार ते दीड हजार जातात. पेट्रोलचा खर्चही खूप होतो. नुसते घरून कॉलेजला जाणे एवढेच काम आमच्या वाहनांना नसते. आठवड्यातून दोनदा तरी मैत्रिणीबरोबर ‘राइड’ करावीच लागते. तिला खूश ठेवले तरच आमचे लक्ष अभ्यासात लागते, अन्यथा नाही. त्यामुळे इंधन खर्च आपसूकच वाढतो. सध्या आम्हाला एक जीबी डेटा मोबाइलवर फ्री मिळतो. त्यात एक- दोनच्यावर रिल्स बनवता येत नाहीत. किमान उच्चशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी तरी हा डेटा अनलिमिटेड हवा. वाटेल तर यासाठीचे पैसे आम्हाला देऊ नका. थेट मोबाइल कंपन्यांशी करार करा. डेटाचा पाहिजे तेवढा वापर करायला मिळाला तर आम्ही तुमच्याही रिल व्हायरल करू. तुमचे व्ह्यूज कसे वाढतील ते बघू. आम्ही कपडे कोणते घालावेत यावरून घरच्यांशी नेहमी वाद होतात. फॅशनेबल कपडे ही आजच्या काळाची गरज. तेव्हा किमान दोन हजार रुपये कपडाभत्ता या ‘मनीत’ समाविष्ट करावा. आठवडाभर कसून अभ्यास केल्यावर मेंदूला दिलासा देण्यासाठी ‘सॅटरडे नाइट आऊट’ आमच्यासाठी खूप गरजेचे असते. मित्र-मैत्रिणींबरोबर तेवढाच विरंगुळा. तिथे आम्ही टीटीएमएम (तुझे तू माझे मी) पद्धतीनेच खर्च करतो. त्याही खर्चाचा विचार व्हावा. हे खर्च बघता किमान १२ हजार रुपये तरी या मनीचे स्वरूप असावे’ ऐकून थक्क झालेले दादा व अधिकारी विद्यार्थ्यांकडे बघतच राहिले.
तेवढ्यात कुणीतरी त्यांना सांगितले. मंत्रालयासमोर दिपकेंनी आंदोलन सुरू केले. हजारो विद्यार्थी जमले आहेत. त्यांची एकच मागणी आहे. ‘नको पॉकेट मनी, व्यवस्था सुधारा.’ हे ऐकून दादा अभावितपणे उद्गारले, ‘अरे, हे तर लाडक्या बहिणींपेक्षा हुशार दिसतात.’
