‘रोज दुपारी बारा वाजता उठून जगाला ज्ञान पाजणारे ते ठाकरे मला मूर्खात काढतात काय? थांब, आता दाखवतोच त्यांना दगडावरचे फिंगर प्रिंट काढून आधारशी कसे जोडायचे ते’ असे म्हणत चंद्रकांतदादांनी सर्व साहाय्यकांना आवाज दिला. ‘उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द करा, अभ्यागतांना प्रवेश बंद. सर्वांनी बंगल्याच्या मागच्या हिरवळीवर उद्या सकाळी ९ वाजता जमायचे. आपल्या विचाराचे चार ठसेतज्ज्ञ बोलावून घ्या, एक ट्रॉलीभर दगड हवेत. जेन-झीसारखे दिसणारे दोन-चार पुतळे हवेत. तंत्रशिक्षण खात्याचा मंत्री म्हणन जे बोललो ते वैज्ञानिकदृष्ट्या योग्य कसे हे आता जगाला दाखवून द्यायचेच.’

आदेश ऐकताच साहाय्यकांची पळापळ सुरू झाली. निरोप दिले गेले. बरोबर नऊच्या ठोक्याला केसातून कंगवा फिरवत दादा हिरवळीवर आले. आजूबाजूला ठेवलेले दगड व मधोमध त्यांची खुर्ची, ही रचना बघून ते खूश झाले. समोर दूर अंतरावर चार पुतळे उभे ठेवण्यात आले होते. त्याच्या पाठीमागे लाकडाची मोठी भिंत. मारलेले दगड शेजार्‍यांच्या बंगल्यात जाऊ नयेत

म्हणून!

पहिला दगड दादांनीच उचलला व जेन झीविषयीचा राग मनात आणत अगदी त्वेषाने पुतळ्यावर भिरकावला. लगेच एक ठसेतज्ज्ञ धावला व त्याने तो दगड उचलून त्यावरच्या बोटांच्या ठशाची पाहणी सुरू केली. तो काय सांगतो याकडे दादांचे लक्ष लागले होते. बराच काळ निरीक्षण केल्यावर त्याने जाहीर केले. ‘यावरचे ठसे एकाच व्यक्तीचे आहेत असा निष्कर्ष काढणे कठीण. सुरुवातीला याला दादांचे हात लागले, मग पुतळ्याचा स्पर्श झाला, नंतर हिरवळीवरील गवताचा.’ हे ऐकताच दादा भडकले. ‘मग तुम्ही आपल्या विचाराचे असून काय फायदा? आम्ही जे बोलतो तेच खरे हे सिद्ध करणे एवढेच तुमचे काम. तेही नीट करता येत नाही.’ हे ऐकून सन्नाटा पसरला. मग

दादांनी साहाय्यकांना दगड मारण्याची सूचना केली. त्यांच्याही बाबतीतला निष्कर्ष तसाच निघाला.

जेन झीला घाबरवण्यासाठी आपण बोललो. ते सहज खपून जाईल व ही पिढी भीतीने घरात दडून बसेल असे वाटले पण घडतेय ते उलटेच, असा विचार मनात येताच दादा अस्वस्थ झाले. जंतरमंतरवर भिरकावण्यात आलेले सर्वच दगड लोकांना लागले नाहीत. काही न लागताही खाली पडले असतील. त्यावरचे ठसे तर सुरक्षित असतील असा विचार मनात येताच ते पुन्हा उठले. एक दगड हाती घेऊन त्यांनी तो मुठीत घट्ट पकडला व न भिरकावताच ठसेतज्ज्ञांच्या हातात सोपवला. आता यावरचे ठसे बघ व ते माझ्या आधारच्या लिंकवर असलेल्या ठशांशी पडताळून बघ असे सांगून ते खुर्चीत बसले.

बराच काळ निरीक्षण केल्यावर तज्ज्ञाने निर्वाळा दिला, यावरचे ठसे स्पष्टपणे दिसतात. मग ते दादांच्या आधार लिंकशी जुळतात का याची पडताळणी सुरू झाली. खूप खटपट केल्यावर तज्ज्ञ म्हणाले ‘हे ठसे लिंकवर उपलब्ध असलेल्या दादांच्या ठशांशी अजिबात जुळत नाहीत. लिंकवर असलेले ठसे वयस्क व्यक्तीचे वाटतात तर दगडावरचे एखाद्या बालकाच्या बोटासारखे व अपरिपक्व दिसतात! हे ऐकताच दादांचा चेहरा खाड्कन उतरला.

मागे उभे असलेले साहाय्यक फिदीफिदी हसत असल्याचा भास त्यांना झाला. त्यांच्याकडे रागाने बघत एक दगड त्यांनी उचलला व ‘त्या दिपकेच्या नावाने’ असे पुटपुटत पुतळ्याकडे भिरकावून ते बंगल्यात परतले. मोबाइल हातात घेतल्यावर पहिलाच संदेश त्यांना स्क्रीनवर दिसला. ‘दगडांना बोलके करण्याच्या नादात स्वत: दगड होऊ नका म्हणजे मिळवले.’